दीप प्रधान
अलीकडेच आम्ही आमच्या शाळेचं वार्षिक अंदाजपत्रक सादर केलं. आम्ही काही मुलांनी ‘आमची शाळा, आमचे आर्थिक नियोजन’ या प्रकल्पाअंतर्गत शाळेचा सुमारे नऊ कोटी, एकोणनव्वद लाख रुपायांचा अर्थसंकल्प सादर केला. हा अनुभव खरोखरच खूपकाही शिकवणारा होता. हे अंदाजपत्रक तयार करताना शाळेच्या विविध खर्चांची माहिती मिळाली आणि आर्थिक नियोजनाचं महत्त्व कळलं. सुरुवातीला हे काम आव्हानात्मक वाटलं, पण योग्य नियोजन आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे काम यशस्वीपणे पूर्ण करता आलं.
या संपूर्ण प्रक्रियेत आमच्या शाळेचे कार्यकारी विश्वस्त दिघे सरांनी आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं आणि ठाणे महानगरपालिकेचा अर्थसंकल्प समजावून सांगितला. त्यांनी बजेट तयार करताना कोणते निकष महत्त्वाचे आहेत, कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे लागते आणि खर्चाचे व्यवस्थापन कसे करावे, याबद्दल सखोल माहिती दिली. शाळेतील फर्निचर, संगणक, वीज, पाणी, प्रयोगशाळा साहित्य आणि इतर गरजांवर होणारा खर्च पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. प्रत्येक गोष्ट महाग असूनही त्याचा वापर काही वेळा निष्काळजीपणे होतो, याची जाणीव झाली. त्यामुळे प्रत्येक शालेय वस्तूंचा वापर काळजीपूर्वक आणि जबाबदारीने करणं आवश्यक आहे हे कळलं.
या उपक्रमातून आर्थिक नियोजन आणि जबाबदारी यांचा महत्त्वाचा धडा मिळाला. त्याचसोबत टीमवर्कचं महत्त्व कळलं. कितीही अडचणी आल्या तरी चर्चा करून आणि त्यावर उपाय शोधून आम्ही हा प्रकल्प पूर्ण केला. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक भरत खोटरा सर, शाळेच्या पर्यवेक्षिका डॉ. अमिता भागवत बाई, शरद बाविस्कर सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्यासोबत सृजन पाध्ये, कौस्तुभ सावंत, अर्चित माळी, गार्गी गोखले, सोहम जोशी, देव कोकाटे, नील महाजन, वरद दळवी, अमृत जाधव, ऋषिकेश पिंपळकर, विजूल गढरी, दृष्टी निपुर्ते, धन्वी चव्हाण, ध्रुव कोळी व श्रीराम परांजपे ही विद्यार्थी मंडळी होती. भविष्यात हे ज्ञान फक्त मलाच नाही तर या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाला नक्कीच उपयोगी पडेल. ( इयत्ता ९वी, सरस्वती सेकंडरी स्कूल, नौपाडा, ठाणे.)