उद्या शाळा. या विचारानेच टीना दचकली. शाळा म्हणजे दप्तर भरायचं. दप्तर म्हणजे कित्ती आणि कित्ती गोष्टी त्या. केवढं ते ओझं. असा विचार करत आदळआपट करतच तिने दप्तर भरायला सुरुवात केली. ‘‘दप्तर म्हणजे पुस्तक, वह्या, पेनं, पेन्सिली, कंपास हे आणि असं भरपूर सगळं. केवढा पसारा तो दप्तर म्हणजे!’’ bal-lअसं पुटपुटतच टीनानं दप्तर भरायला सुरुवात केली. आणि आता दप्तर भरण्याशिवाय तिला गत्यंतरही नव्हतं म्हणा! आता रात्रीचे आठ वाजले होते आणि उद्या सकाळी साडेसात वाजता तिची शाळा भरणार होती. दप्तर घेतल्याशिवाय शाळेत जाणं शक्यच नव्हतं. त्यामुळे कसंबसं कंटाळत तिनं दप्तर भरलं आणि झोपी गेली.
‘‘टीना, टीना,’’ कोणीतरी हाक मारत असलेलं तिला ऐकू येत होतं. टीनानं दचकून पाहिलं. दप्तर आणि त्यातल्या इतर वस्तू तिला हाक मारत होत्या. दप्तर गालातल्या गालात हसत होतं तिला पाहून. ते म्हणत होतं, ‘‘तुला माझा राग येतो म्हणून मी माझ्या मित्रांना घेऊन तुला भेटायला आलोय. ही बघ सगळी पुस्तकं तुला भेटायला आली आहेत.’’ टीना आश्चर्यचकित होऊन पाहत राहिली. अगदी झाडून सगळी पुस्तकं तिला भेटायला आली होती. सगळी तिच्याकडे पाहून मस्तपकी हसत होती. टीनाला मनातून एकदम वाटलं की, कित्ती सुंदर आहेत ही सगळी पुस्तकं! कित्ती गोड हसतायत आणि ही पुस्तकं कित्ती प्रकारचं ज्ञान देत असतात सगळ्यांना. बरं हे ज्ञान कुठेही मिळवता येतं. त्यासाठी ना इंधनाची गरज ना कोणत्याही प्रकारची बॅटरी त्यासाठी लागत. पुस्तकं कित्ती प्रकारच्या ज्ञानाचं खुलं भांडार आहे, असा  एकाएकी तिला साक्षात्कारच झाला. का बरं आपण या पुस्तकांवर एवढं रागावत होतो? असा विचार तिच्या मनात चमकून गेला. इतक्यात दप्तरासोबत हसत हसत उभ्या असणाऱ्या वह्या तिला दिसल्या. ‘‘अरे, ह्या वह्या ही माझीच निर्मिती आहे. मी कित्ती गृहपाठ, निबंध, प्रश्नोत्तरे आणि काही ना काही या वह्यांमध्ये लिहिते. कित्ती सुंदर चित्रं रेखाटते रंगीबेरंगी. कित्ती आकृत्या काढल्यात, कित्ती गमतीजमती लिहिल्यात. हे सगळं मीच लिहिलंय आणि मी का बरं रागावते एवढं या सगळयांवर?’’ असा विचार तिच्या मनात चमकून गेला. बाजूलाच कंपास पेटीतलं साहित्य तिला दिसलं. दप्तर म्हणत होतं, ‘‘टीना हे साहित्य वापरून तू किती रचना करत असतेस आणि हे साहित्य खरंच खूप काही शिकवतं बरं का! हे एकमेकांना किती मदत करत असतं आणि सगळेजण एकमेकांवर अवलंबून असतात आणि गुण्यागोिवदाने एकत्र नांदतात. ना रुसवा ना फुगवा. खरंच किती मदत करतात एकमेकांना म्हणूनच कंपास नि पेन्सिल एकत्र आल्यावर कित्ती सुंदर कमळ रेखाटता येतं. पट्टी किती सरळ बिचारी सतत मदतीला तयार. म्हणूनच कुणावर रोष न ठेवणाऱ्या व्यक्तीला सरळ स्वभावाचा म्हणत असावेत बहुतेक पट्टीसारखाच.’’ त्याच्याच शेजारी मोठ्ठी पट्टी होती. हिचा काय उपयोग? असं टीनाच्या मनात आलं, पण ती नसली तर आपलं कित्ती वेळा अडतं आणि आपण कसे बेचन होतो हेही तिच्या लक्षात आलं आणि ती गालातल्या गालात हसली. मग दप्तरानं तिचं लक्ष वेधलं आजूबाजूच्या असंख्य गोष्टींकडे जसे की चॉकोलेटचे कागद, रॅपर्स, स्टीकर्स, पेन्सिलचं टोक काढल्यावर येणारी फुलं एक ना अनेक गोष्टी. ममा, टीचर्स वगरे सगळ्या मोठ्ठय़ा लोकांना हा सगळा कचरा वाटतो, पण टीनाला कित्ती गंमत वाटते हे सगळं साठवताना. यातल्या काही वस्तू ती अगदी जिवापाड जपते. त्यांना अगदी पियु किंवा विराज जे तिचे एकदम जवळचे मित्र आहेत त्यांनाही हात लावू देत नाही. काही वस्तू अगदी जवळच्या मित्रमत्रिणीनांच देते. पण अगदी गुपचूप.
अरे बाप रे! हे दप्तर म्हणजे अगदी खजिनाच आहे. गोष्टीतल्या जादूच्या खजिन्यासारखा. हे दप्तर माझ्याबरोबर असतं म्हणून माझी प्रगती होत असते, हे पटून ती दप्तराच्या जवळ गेली आणि त्याला कवटाळत म्हणाली- ‘‘थँक यू! तुझं महत्त्व माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आता मी नाही कंटाळणार तुला. आणि तुला एक सांगायचंय बरं का? जे आत्ता माझ्या लक्षात आलं. शाळा चालू असताना जेव्हा तू जवळ असतोस तेव्हा तुझा कधीकधी कंटाळा येतो खरा, पण शाळेला सुट्टी असली की मात्र तुझी उणीव भासते. तुझी सतत आठवण येते. काहीतरी चुकल्याचुकल्यासाखं वाटतं. त्याचं खरं कारण मला आज समजलं. तूच माझा एक सुंदर सखा आहेस. तुझं माझं नातं अगदी टॉम अ‍ॅन्ड जेरीसारखं आहे.  जवळ असताना मला तुझा कंटाळा येतो, पण एकमेकांपासून दूर जाववत नाही.’’ असं म्हणून तिने दप्तराला कवटाळलं आणि एकदम जागी झाली. पहाते तर काय आजूबाजूला कुणीच नव्हतं. तिच्या लक्षात आलं की आपण स्वप्नात दप्तर पाहत होतो. पण या स्वप्नाचा  मस्तच परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी, एरवी शाळेत जाताना ओझं वाटणारं दप्तर एकदम हलकं हलकं झाल्यासारखं वाटलं आणि ती आनंदाने उडय़ा मारत मारत दप्तर घेऊन निघाली.

संजय जोशी – sanjayjoshi1805@gmail.com

Story img Loader