‘‘अय्या, कित्ती मस्त! ’’ माझ्या उजव्या कानात कोणीतरी कुजबुजलं. शाळेतलं ध्वजवंदन आटोपून मस्त मजेत एकटीच रमतगमत घरी निघाले असताना कोण बरं हे बोलतंय? मी चमकून इकडेतिकडे पाहिलं. रस्ता तर निर्जन होता. मी थोडीशी गोंधळले.  इतक्यात खुद्कन हसण्याचा आवाज आला. ‘‘ए, शुकशुक मी बोलतेय. इकडे. इकडे.’’ आवाज चक्क माझ्या उजव्या खांद्यावरून येत होता. एक इटुकली पिटुकली गुलाबाची पाकळी मला चक्क हाक मारत होती. मला फार गंमत वाटली. मी तिला तळहातावर घेतलं. ‘‘च्..च्.. सावकाश.’’ ती दुखऱ्या स्वरात म्हणाली. माझ्या धसमुसळेपणाचा तिला त्रास झाला होता. तिला हळुवारपणे कुरवाळत मी विचारलं, ‘‘ तू इथे कुठून आलीस गं?’’
‘‘अगं, सकाळपासून मी त्या तिरंग्यात बसले होते बरं ’’ थोडय़ा गर्वानेच ती उत्तरली. ‘‘तिरंगा फडकला आणि मी वाऱ्यावर विहरत निघाले. वारा थांबला आणि तुझ्या खांद्यावर पटदिशी बसले. पण तिरंग्यात विसावल्यामुळे केवढं समाधान मिळालं सांगू. माझं क्षणभंगूर का काय ते आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटलं. तिरंग्याचा एवढा निकटचा सहवास, त्याला फडकताना पाहणं यापेक्षा दुसरं सुभाग्य कोणतं सांग बरं?’’ बोलता बोलता तिला चांगलीच धाप लागली. पण ती भरभर बोलतच होती. मी तिला थोपवत म्हटलं, ‘‘अगं, हो. हो. जरा सावकाश. मला तुझा आनंद कळतोय. कारण तुझ्याप्रमाणेच आम्ही सारे भारतीय तिरंग्याचा अत्यंत आदर करतो. जगात कोठेही कोणताही भारतीय असू दे, त्याच्यासाठी तिरंगा अत्यंत आदराचा आहे. कवी वि. म. कुलकर्णी यांनी अचूक म्हटलंय, ‘लढले गांधी याच्याकरिता । टिळक नेहरू लढली जनता॥ समरधुरंधर वीर खरोखर । अर्पून गेले प्राण ॥ ’’ मी बोलत असताना मला थांबवत पाकळी म्हणाली, ‘‘तो ध्वजही तसंच म्हणत होता.’’  ‘‘काय, तो बोलला तुझ्याशी?’’ मी जोरात ओरडलेच. या ओरडण्याने ती उडूनच जाऊ लागली. कशीबशी तिला पकडत मी म्हटलं, ‘‘सॉरी. सॉरी यार. ए, पण तो काय म्हणाला ते सांग ना मला.’’ ‘‘सांगेन पण एका अटीवर’’ तिने मला अट घातली- ‘‘असं एकदम ओरडायचं नाही.’’ ‘‘नाही बाई ओरडणार नाही, मग तर झालं.’’  ‘‘आत्ता कसं! तर तो काय म्हणाला ते सांगू ना. तो म्हणाला, ‘पारतंत्र्याच्या काळात तिरंगा फडकवणं हे प्रत्येक भारतीयाचं स्वप्न होतं. ते सत्यात यावं म्हणून अनेकांनी अविरत प्रयत्न केले आणि १५ ऑगस्ट १९४७  रोजी भारतीयांचे स्वतंत्र्याचे स्वप्न साकार झाले. तो दिवस तर तिरंग्यासाठी अगदी अविस्मरणीय आहे, असंही त्यानं सांगितलं. त्याचबरोबर इतर अनेक क्षणही त्याच्यासाठी अभिमानाचे आहेत.. तो खंडावर फडकला तेव्हा, साहित्य-कला प्रांतात जागतिक स्तरावर फडकताना. चांद्रयानातून चंद्रावर गेला तेव्हा आणि क्रिकेट किंवा हॉकीच्या मदानावर भारतीयांसमवेत जल्लोष करताना, ऑिलपिकमध्ये.. असे अनेक क्षण सांगत होता तो.  त्याचबरोबर रोज संसदेसमोर फडकताना, सीमेवर डौलात उभा राहताना, वेगवेगळया कार्यालयांवर अथवा भारतीय दूतावासासमोर ताठ मानेने फडकतानाही त्याला खूपच अभिमान वाटतो म्हणे.’’  ..पाकळी आता थकली होती.  तिचा आवाजही थकलेला होता. पण सावकाशीने ती पुढे बोलतच होती. ‘‘परंतु त्याचं एक दु:खं आहे म्हणे, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दिवशी अनेक भारतीय कागदी किवा प्लास्टिकचे ध्वज वापरतात. ते लावून मिरवतात आणि दुसऱ्या दिवशी त्यांना विसरूनच जातात. खूप केविलवाणं वाटतं अगं त्याला अशा वेळी.’’ आता ती पाकळी फारच कोमेजली होती. तिला हळुवार कुरवाळत मी म्हटलं, ‘‘ अगं, आता आम्हा सर्वामध्ये खूप बदल होतोय, आम्ही ध्वजाला आदराने वागवतो आणि इतरांनाही तसं सांगतो.’’ पण हे ऐकता ऐकता पाकळी मलूल होऊन मिटलीच. माझे मात्र डोळे खाडकन उघडले. भराभर सगळ्या मित्रमत्रिणींचा नंबर फिरवला आणि पाकळीने सांगितलेलं तिरंग्याचं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचवलं.  हे करीत असताना ‘‘शान न इसकी जाने पाएॅं। चाहे जान भलेही जाएॅं। विश्वविजय करके दिखलाएॅं । तब होवे प्रण पूर्ण हमारा ॥ झँडा उँचा रहे हमारा..’’ या ओळी मनावर अधिकच कोरल्या गेल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा