परीक्षा संपून शाळेला सुट्टी लागली आणि अली अगदी खूश झाला, कारण त्याला अभ्यासाचा आणि शाळेत जायला अजिबात आवडायचे नाही. अली हा एक स्वप्नांच्या दुनियेत हरवलेला लहान मुलगा. तो नेहमी आपल्या स्वप्नात दूरच्या आणि अगदी वेगळ्या प्रदेशात गेल्याचे चित्र रंगवत असे. त्याला आपले घर, गाव आणि शाळेचा कंटाळा येत असे. त्याला वाटे, की आपण पक्ष्यांसारखे उंच उंच उडावे आणि ह्या सर्वापासून लांब कोठेतरी न बघितलेल्या दुनियेत जावे.
असाच एकदा तो खुर्चीत बसला असताना नेहमीप्रमाणे आपल्या स्वप्नात रंगून गेला होता. तेवढय़ात त्याच्या पायाला कोणी तरी गुदगुल्या केल्या. अलीने खाली बघितले तर तिथे अंथरलेला छोटासा गालिचा त्याच्याकडे बघून हसला. तो म्हणाला, ‘‘मला बाहेर घेऊन चल. मी तुला माझ्याबरोबर उंच आकाशात घेऊन जातो.’’
अली हे ऐकून अगदी गडबडून गेला. पण तेवढय़ात तो गालिचा त्याला म्हणाला, ‘‘चल लवकर. कोणाचे लक्ष नाही तोपर्यंत आपण एक फेरफटका मारून येऊ.’’
अलीने मग तो गालिचा बाहेर नेऊन अंथरला आणि त्यावर तो बसला. त्याबरोबर त्या गालिच्याने आकाशात उंच भरारी घेतली. अली आनंदाने टाळ्या वाजवायला लागला. तो स्वप्नात नाही, तर प्रत्यक्षात आकाशात पक्ष्यांसारखे उडत होता.
थोडय़ा वेळाने तो गालिचा एका गर्द जंगलाच्या वरती आला. अलीला तिथे खूप सारी माकडे, हत्ती, ससे आणि हरणे दिसली. अली खूश झालेला बघून गालिचा त्याला म्हणाला, ‘‘आता आपण आणखी वेगळे प्राणी बघू या.’’ गालिचा मग हळूच एका झाडामागे खाली उतरला. समोर एक सिंहाचा कळप बसला होता. तेवढय़ात दूरवरून वाघाची डरकाळी ऐकू आली आणि अली घाबरला. तो गालिच्याला म्हणाला, ‘‘मला ह्या प्राण्यांची भीती वाटतेय तू दुसरीकडे चल.’’
गालिच्याने परत आकाशात झेप घेतली आणि थोडय़ाच वेळात तो एका वाळवंटावरून उडायला लागला. सूर्य तळपत होता आणि गरम वारे वाहात होते. अली घामाघूम झाला. त्याला उन्हाचे चटके बसू लागल्यावर तो म्हणाला, ‘‘मला ह्या गरमीचा खूप त्रास होतोय, इथून दुसरीकडे चल.’’
गालिचा मग समुद्रावरून उडायला लागला. अलीने खाली बघितले तर समुद्र खवळला होता. त्यातून चाललेली मोठमोठी जहाजे हेलकावे खात होती. गालिचा पुढे जाऊन समुद्रातल्या एका बेटावर उतरला. अचानक विजांचा कडकडाट व्हायला लागला. कानठळ्या बसतील असा गडगडाट झाला आणि मुसळधार पाऊस पडायला लागला. अली चिंब भिजला. त्याला पावसाची भीती वाटू लागली. तो गालिच्याला म्हणाला, ‘‘इथे नको, मला दुसरीकडे ने. गालिचाने मग आपला मोर्चा दक्षिण ध्रुवाकडे वळवला. खाली बघितले तर बर्फच बर्फ. अलीला तिथे पेंग्विन दिसले. त्याला त्यांच्याशी खेळावेसे वाटले म्हणून गालिचा अलगद खाली उतरला. अली पेंग्विनला पकडायला गेला, पण तिथला गार वारा आणि बर्फामुळे त्याचे हातपाय गारठले. तो थंडीने कुडकुडायला लागला. तो गालिच्याला म्हणाला, ‘‘इथून चल, मला खूप थंडी वाजतेय. गालिचा अलीला घेऊन निघाला. आता तो एका जंगलावरून उडत होता. तिथली हवा गरमही नव्हती आणि फार गारही नव्हती, त्यामुळे गालिचा जरासा खाली आला. तेवढय़ात सोसाटय़ाचा वारा सुटला. जंगलातली उंच उंच झाडे त्या वाऱ्यामुळे जोरजोरात हलायला लागली. पाने आणि माती उडायला लागली. अलीच्या डोळ्यात धूळ जायला लागली. वाऱ्याच्या आवाजाची त्याला भीती वाटू लागली. त्याला वाटले, वाऱ्याच्या जोरामुळे आता आपण खाली पडणार. तो गालिच्याला म्हणला, ‘‘इथून दूर चल.’’ थोडे पुढे गेल्यावर अलीला पुढचेमागचे काही दिसेनासे झाले. दाट धुके पडले होते. अलीला वाटले, आता ह्या धुक्यात आपण हरवणार. तो रडकुंडीला आला आणि गालिच्याला म्हणाला, ‘‘मी खूप घाबरलो आहे. मला माझ्या घरी घेऊन चल.’’ गालिचा हसला आणि हळूहळू धुक्यातून बाहेर पडून अलीच्या घराजवळ उतरला. तो अलीला म्हणाला, ‘‘मला उचल आणि आत नेऊन ठेव. आता तुला स्वप्ने बघायची जरूर नाही. तुला परत कुठे जायचे असेल तर मला सांग. मी खरोखरच तुला तुझ्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाईन.’’ अलीचे स्वप्न गालिच्यामुळे प्रत्यक्षात उतरले होते. बर्फ, वारा, ऊन, पाऊस असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे हवामान आणि वेगळ्या प्रदेशातून िहडून आल्यामुळे अलीच्या लक्षात आले, की आपण राहात आहोत ते गाव आणि आपले घरच खूप छान आहे. तिथे राहून शाळेत जाऊन खूप अभ्यास करून मोठे व्हायला पाहिजे. उडणाऱ्या गालिच्यामुळे अली स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर आला होता.
 (अरेबिक कथेवर आधारित.)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा