माझ्या बालदोस्तांनो, तुम्हाला मागल्या लेखातला कन्व्हेअर आठवतो नं? आजच्या लेखात हा कन्व्हेअर आपल्याला महासागरातील विविध निर्मितीप्रक्रियांची ओळख करून देईल. महासागरातील क्लोरोफिलने समृद्ध जीव प्रकाश संश्लेषणाच्या माध्यमातून, सूर्यप्रकाशाचा वापर करून सेंद्रिय संयुगाच्या रूपात अन्ननिर्मिती करतात. ही प्रक्रियाच सागरी जीवांना अन्न पुरवते. त्यामुळे ती महत्त्वाची ठरते. अन्ननिर्मितीच्या या प्रक्रियेला खीळ बसली तर सारे सागरी जीवनच कोलमडून पडेल. जमिनीवर ही अन्ननिर्मिती निरनिराळ्या वनस्पती करतात हे तुम्हाला ठाऊकच असेल. मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की, पृथ्वीवरील अदमासे निम्म्या सेंद्रिय संयुगांची व अन्ननिर्मिती महासागरांमध्ये होते.
महासागरातील निर्मितीमध्येदेखील जवळजवळ निम्मा वाटा सूक्ष्मतम् प्लवकांचा असतो. काही सागरी मोठे प्राणी सूक्ष्म प्लवकांना आपले अन्न बनवतात, तर त्या मोठय़ा प्राण्यांना त्यांच्यापेक्षा मोठे प्राणी आपले अन्न बनवतात. उदाहरणार्थ, मासे प्लवकांना खातात, तर आपण मानवप्राणी माशांवर ताव मारतो! या अन्नसाखळीमार्फतच प्लवकांपासून सुरू झालेला अन्नऊर्जेचा प्रवास आपल्यापर्यंत व इतर प्राणिमात्रांपर्यंत पोहोचतो. डायॅटम प्रकारातील प्लवक सिलिका, अर्थात वाळूच्या अंशापासून बनलेले असतात. डायॅटमच्या मृतावशेषांचा उपयोग गाळणयंत्रं, शोषकयंत्रांमध्ये होतोच, शिवाय खरखरीत पदार्थ म्हणून टूथपेस्ट अर्थात दंतमंजनामध्येही होतो.
उष्णकटिबंधीय महासागरांमध्ये संपूर्ण वर्षभर साधारणपणे एकसारखी सेंद्रिय संयुगांची निर्मिती होते, मात्र उत्तर धृवानजीकच्या सागरांमध्ये फेब्रुवारी-मार्चदरम्यान ही निर्मिती शिगेला पोहोचते. माझ्या छोटय़ा दोस्तांनो, यापुढच्या लेखामध्ये आपण कन्व्हेअरवर, अर्थात महासागरी महामार्गावर स्वार होऊन सागरकिनारी जीवनाचा वेध घेणार आहोत.
ऋषिकेश चव्हाण – rushikesh@wctindia.org
शब्दांकन : श्रीपाद