श्रीपाद
माझ्या छोटय़ा वाचकांनो, आत्तापर्यंत तुम्ही कितीतरी पदार्थ नव्याने तयार करायला शिकला आहात. पण पाककलेचं एक कौशल्य दडलेलं आहे- जुन्यातून नवं काही साकारण्यात. रात्रीच्या उरलेल्या आमटी-भाजीचं सकाळच्या न्याहारीला थालीपीठ होतं. उरलेल्या पोळीचा लाडू होतो. दिवाळीत फराळ खाऊन कंटाळा आला की एका उसळीच्या उकळीसोबत उरलेल्या चिवडा-शेव-चकलीची मिसळ होते. एक ना अनेक उदाहरणं देता येतील. त्यातलाच एक सोप्पा प्रकार म्हणजे फोडणीचा भात. मात्र या फोडणीच्या भातापेक्षा आपल्याला चायनीज फ्राइड राईस अधिक आवडतो; बाहेर जाऊन तो खाण्याकरता आपण आपल्या घरच्या मोठय़ांकडे आग्रह धरतो. हाच भात आपण घरच्याघरी केला तर? कृती तशी सोप्पी आहे, शिवाय मी तुमच्याकरता ती अधिकच साधी-सरळ केली आहे.
पुढे कोणतीही तयारी करण्याआधी एक गोष्ट करा. स्वयंपाकघरात तरबेजपणे वावरणाऱ्या कुणाला तरी मदतीला आणि देखरेखीला घ्या. तापल्या भांडय़ामध्ये हा पदार्थ करायचाय तेव्हा त्यांची देखरेख हवीच हवी. शिवाय किती शिळा भात उरलाय त्याचाही अंदाज घ्या. शिळा भात असेल तर तो एका ताटामध्ये काढून घ्या. त्याची ढेकळं मोडा. भात थोडा चिकट असेल तर हाताला किंचितसं तेल आणि पाणी लावून भात मोकळा करा.
भात तयार नसेल तरी आपल्याकडे उपाय आहे. पटकन् एक-सव्वा वाटी तुम्हाला आवडतो तो तांदूळ धुऊन त्यामध्ये जेवढय़ास तेवढं किंवा दीडपट पाणी घालून तो कुकरात शिजायला ठेवा. शिजायला ठेवतानाच त्यामध्ये पाव चमचा मीठ घाला.
साहित्य : माणशी मोठी एक वाटी शिजलेला भात. बारीक चिरलेला मध्यम आकाराचा कांदा, लसूण आणि आलं. मोड आलेले मूग किंवा चणे. ढोबळी मिरची, फरसबी, कोबी, फुलकोबी, गाजर, काकडी, किंवा तुम्हाला आवडतील त्या करकरीत भाज्या. दोन मोठे चमचे सोया सॉस, एक ते दीड मोठा चमचा सिरका अर्थात व्हिनेगर. चवीनुसार लाल तिखट, मीठ आणि साखर. दोन मोठे चमचे तेल.
उपकरणं : भाज्या चिरण्याकरता विळी किंवा सुरी-पाट. मापाकरता वाटी. भात शिजवण्याकरता योग्य मापाचं आणि प्रेशर कुकरमध्ये बसेलसं भांडं. प्रेशर कुकर. फ्राइड राईस बनवण्याकरता जाड बुडाची मोठी कढई आणि भात हलवण्याकरता मोठा चमचा किंवा झारा. आचेकरता गॅस किंवा इंडक्शन शेगडी.
सर्वप्रथम कढई किंवा मोठं भांडं तापवायला ठेवा. भांडं तापलं की त्यामध्ये पसरून तेल घाला. लागलीच तेलामध्ये लसूण, आलं आणि कांदा घालून अर्धा मिनिटभर मोठय़ा ते मध्यम आचेवर परता. त्यानंतर फरसबी, गाजर, मोड आलेले चणे यांसारख्या शिजायला वेळ घेणारे जिन्नस घालून परतत राहा. क्रमाक्रमाने शिजायला कमी वेळ लागतो असे जिन्नस घाला. कोबी, फुलकोबी, काकडी आणि सर्वात शेवटी ढोबळी मिर्चीचे तुकडे घाला. आता या भाज्या परतत असतानाच, त्या साधारण शिजल्या म्हणजे त्यामध्ये शिजलेला भात घाला. भात घालण्याआधी एक करा, की भाज्यांचा कच्चेपणा गेला पाहिजे. त्या पूर्ण शिजवायच्या नाहीत. भाज्यांचा करकरीतपणा तस्साच राहील हे पाहा. मऊ शिजलेल्या भातासोबत भाज्यांचा करकरीतपणाच या फ्राइड राईसची खरी लज्जत वाढवतो हे लक्षात ठेवा.
भात घातल्यानंतर आता खरी गंमत सुरू होईल. भातावरच चवीनुसार सोया सॉस, सिरका, मीठ, साखर, तिखट हे जिन्नस घाला. या साऱ्यांचा रंग भाताला यायला हवा. भाज्यांचा रंग या जिन्नसांनी बदलू नये याकरता ही खबरदारी महत्त्वाची आहे. सोया सॉस, लाल तिखट, सिरका हे जिन्नस भाज्यांवर घातलेत तर त्यांचा रंगीबेरंगी ताजातवाना रंग बदलून संपूर्ण भातच मलूल पडल्यासारखा दिसू लागेल, ते होता कामा नये. मीठदेखील बेतानेच घाला. सोया सॉसमध्ये खारटपणा असतो, तेव्हा अंदाज येईतोवर चव घेत घेत थोडं थोडं मीठ घाला.
भात घातल्यानंतर आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. ती म्हणजे, आचेवरच्या गरम भांडय़ामधलं संपूर्ण मिश्रण खालपासून सतत दोन-तीन मिनिटं हलवत ठेवा. त्यामुळे भात खाली भांडय़ाला लागून करपणार नाही. शिवाय भात हलवताना एक खबरदारी जरूर घ्या. हलक्या हाताने हे मिश्रण परता, जेणेकरून भाताची शितं मोडणार नाहीत. सुरुवातीला शक्यतो लहान दाणा असलेला भात वापरलात तर प्रश्नच यायचा नाही. एकदा तरबेज झालात की मग सोनसुरी, बासमतीसारखा लांब दाण्याचा भात वापरून तुम्ही तुमचा फ्राइड राईस अधिकच देखणा करू शकता.
एक गंमत सांगतो, फ्राइड राईसची एक ठरावीक अशी पद्धतच नाहीए. आपल्याला आवडेल असा फ्राइड राईस आपण करून खाऊ शकतो. तीच पद्धत आपली. तेव्हा तुम्हाला फ्राइड राईसमध्ये काय आणि कोणत्या प्रमाणात घालायला आवडतं ते हळूहळू अंदाजाने ठरवा आणि तुम्हाला हवा तसा फ्राइड राईस करा. मला आल्याचा तिखटपणा आवडतो, तेव्हा माझ्या भातामध्ये कांद्याइतकंच आलं असतं. कधी मी भातामध्ये भाजलेले शेंगदाणे घालतो. कधी भात घालण्यापूर्वी परतताना त्यामध्ये अंडं फोडून घालतो. कधी सजावटीला कोिथबीर वापरतो, कधी शेपू, तर कधी कांद्याची बारीक चिरलेली पात. कधी कांद्याऐवजी पातीच्या कांद्याला असलेल्या छोटय़ा कांद्याच्या चिंगळ्या वापरतो. फ्राइड राईस करायचा तर आपण आपल्या मर्जीचे मालक. बाकी कोणी काहीही म्हणो. आपल्याला हवी ती चव, रंग, रूप साधून हा पदार्थ झटपट करा आणि फटाफट फस्त करा.
contact@ascharya.co.in