छोटय़ा मित्रांनो, नमस्कार! आता प्रत्येक महिन्यात आपण ‘बालमफल’मध्ये भेटणार आहोत आणि मी तुम्हाला प्राणी, पक्षी, झाडं आणि आपल्या आसपासच्या सुंदर निसर्गातील गोष्टी सांगणार आहे, तुमच्याशी गप्पा मारणार आहे. कधी कधी आपण जंगलातही जाऊ! आहे की नाही मज्जा!
आज मी तुम्हाला काही नवीन मित्रांना भेटवणार आहे. हळूहळू थंडी पडू लागली आहे आणि ही वेळ आहे स्थलांतरित पक्षी येण्याची. मुंबईजवळ शिवडी, विक्रोळी, उरण, निळजे अशा ठिकाणी हे उडणारे मित्र जमू लागले आहेत. पुण्याजवळ भिगवण, नाशिकजवळ मधमेश्वर, औरंगाबादजवळ जायकवाडी आणि नागपूरजवळ नवेगाव आणि नागझिरा अशा ठिकाणीसुद्धा ही मित्रमंडळी येतात. दूरदूरच्या अतिथंड प्रदेशात या ऋतूमध्ये पक्ष्यांना पुरेसं खायला मिळत नाही. अशा वेळी महाराष्ट्रासारख्या उबदार हवामान असलेल्या व भरपूर खायला मिळेल अशा प्रदेशात ते येतात. तुम्ही गुलाबी रंगाचे रोहित किंवा फ्लेिमगो पाहिले आहेत का? लांब पाय आणि मान, मोठे पंख आणि वळलेली चोच अशा रूपात ते खूप सुंदर दिसतात. चिखलातील किडे आणि वनस्पती हा त्यांचा खाऊ! लांबच्या कच्छमधून ते इथे उडत येतात.
याच सुमारास लडाखमधून काळ्या डोक्याचे व तपकिरी डोक्याचे समुद्रपक्षी आपल्या किनारी भागात येतात. पांढरे शुभ्र अंग, पंखांच्या खाली काळ्या रंगाचे चट्टे व शेंद्री-लाल चोच असे त्यांचे मनोहारी रूप असते. त्यांच्या डोक्यावरील काळा किंवा तपकिरी रंग पाहायचा असेल तर मात्र आपल्याला उन्हाळ्यात त्यांच्या लडाखमधील घरी जायला हवं!
अशाच प्रकारे विविध जातींचे क्रौंच, करकोचे, सुरय, चक्रवाकसारख्या बदकांच्या जाती आणि शेकाटय़ा असे पाणपक्षी याच ऋतूमध्ये आपल्या प्रदेशांत येतात. फिकट गुलाबी रंगाच्या पळसमनांचे मोठे थवे आपल्याला दिसतील. शेकडो पळसमना एका दिशेला, एकाच वेगाने लयबद्ध उडतात. दिशा बदलायची तर सगळ्या एकदम बदलतात! अधेमधे तारेवर बसलेले अमूर ससाणेसुद्धा याच ऋतूत दिसू शकतात. यांतील काही प्रकारचे पक्षी भारताच्या इतर भागांतून येतात, तर काही असतात परदेशी पाहुणे- सायबेरिया, रशिया, मंगोलिया, इराण आणि मध्य आशियातून आलेले. या थंडीतल्या मित्रांना तुम्ही आई-बाबांबरोबर पाहून या.