आठवीची चाचणी परीक्षा सुरू होती. शेवटचा पेपर- गणित. वॉर्निग बेल झाली. सत्तूने सप्लिमेंट्स बांधल्या आणि सगळी उत्तरपत्रिका एकदा तपासून घेतली. त्याला एक गणित सोडवायला जमत नव्हतं. त्याने शांतपणे विचार केला. थोडं रफ वर्क केलं आणि मोकळ्या ठेवलेल्या जागेत गणित सोडवायला घेतलं. इतक्यात त्याच्या पायांवर जोरात लाथ बसली. मागच्या बाकावर बसलेल्या मनीषने लाथ मारली होती. सत्तूने दचकून मागे पाहिलं.
‘‘पुढे बघ, पुढे बघ.’’ मनीष हळू आवाजात म्हणाला.
‘‘काय आहे?’’ सत्तू वैतागला.
‘‘हळू बोल. तिसरा प्रश्न, दुसरं गणित.’’
‘‘त्याचं काय?’’
‘‘कसं सोडवलंस दाखव.’’
‘‘मीपण तेच सोडवतोय!’’
सत्तू पुन्हा पेपर लिहू लागला. मनीषने पुन्हा लाथ मारली.
‘‘झालंय तेवढं मलापण दाखव.’’
‘‘नाही, तू तुझं सोडव.’’
सत्तूचं गणित सोडवून होतंय-न-होतंय तोच शेवटची घंटा झाली. बाईंनी पेपर गोळा केले. मनीष सत्तूच्या बाकाजवळ येऊन त्याला म्हणाला, ‘‘गणित दाखवायला काय झालं होतं तुला?’’
‘‘मला नाही असलं काही जमायचं. आणि तूसुद्धा करायला नकोयस.’’
‘‘सत्तू, मला नको शिकवूस! तेवढं एकच गणित येत नव्हतं मला, म्हणून विचारलं. गेले नं माझे तीन मार्क्स!’’
‘‘अरे, पण कॉपी करून मार्क्स मिळवण्यात काय अर्थ आहे?’’
‘‘ओ राजा हरिश्चंद्र! खूप बोललात हं.’’
मनीष फारच फटकळपणे बोलत होता. सत्तू पुढे काही म्हणणार इतक्यात शिपाई घाईघाईने वर्गावर आला, ‘‘सत्यजीत-मनीष, तुम्हाला बाईंनी स्टाफ-रूममध्ये बोलावलंय लग्गेच.’’ त्यांच्या वर्गाला लागूनच स्टाफ-रूम होती. दोघे तिथे गेले. बाई चिडलेल्या दिसत होत्या.
‘‘सत्यजीत-मनीष, काय चाललं होतं तुमचं?’’ सत्तूच्या हृदयाचा ठोकाच चुकला.
‘‘काही नाही बाई,’’ मनीषने काहीच न झाल्याचा आव आणला.
‘‘खोटं नका बोलू. कॉपी कोण करत होतं?’’
‘‘मी नाही बाई,’’ मनीष खांदे उडवत म्हणाला.
‘‘मग काय, सत्तूने केली कॉपी?’’
‘‘काय माहीत, असेलही! त्यालाच विचारा!’’ हे ऐकून सत्तूने मनीषकडे चमकून बघितलं.
‘‘नाही बाई, देवा शप्पथ. मी नाही कॉपी केली. मनीष खोटं बोलतोय. त्यानेच मला गणित विचारायला पायावर लाथ मारली.’’
‘‘हे बघा, मला माहीत आहे कोण काय करत होतं ते! तुम्ही हुशार विद्यार्थी नं शाळेचे? तुम्हीच असं करून कसं चालेल? यावेळी मी सोडतेय तुम्हाला, पण पुन्हा असं झालं नं तर तुमच्या घरी तक्रार जाईल. लक्षात ठेवा!’’
‘‘सॉरी बाई,’’ सत्तू खाली मान घालून म्हणाला.
देखल्या देवा दंडवत केल्यासारखं मनीषही बाईंना ‘सॉरी’ म्हणाला आणि स्टाफ-रूममधून बाहेर गेला. सत्तू धावत त्याच्या मागे गेला आणि दोघांमध्ये थोडी झटापट झाली. आजूबाजूच्या मुलांनी त्यांचं भांडण सोडवलं. मनीष तिथून तरातरा निघून गेला. वर्गातल्या मुलांनी सत्तूला काय झालं ते विचारायचा प्रयत्न केला, पण तोही काहीच नं बोलता घरी गेला.
खरं तर, मनीष आणि सत्तू जिवलग मित्र होते. वर्गात एकाच बाकावर बसायचे. राहायचेही एकाच सोसायटीत. त्यामुळे एकत्र शाळेत जाणं-येणं, डबा खाणं, खेळणं, अभ्यास करणं, हे ठरलेलं. तसा त्यांचा चार-पाच मित्रांचा ग्रुप होता, पण ते दोघे एकमेकांच्या सगळ्यात जवळ होते.
मनीषला नेहमीच सगळ्यांपेक्षा जास्त मार्क असायचे, त्यामुळे तो वर्गात फारच भाव खायचा. मात्र गेल्या सहामाहीत सत्तूला सगळ्यात जास्त मार्क पडले आणि तेव्हापासून मनीषचा पापड मोडला. बाईंनी सत्तूचं खूप कौतुक केलं. त्याने लिहिलेला सुंदर निबंध वर्गात वाचून दाखवला. तेव्हापासून मनीष सत्तूशी एकदम विचित्र वागायला लागला. त्याच्याशी नीट बोलायचा नाही. खेळायचा नाही. वर्गात बाकावरसुद्धा नाइलाज म्हणून बसायचा. यामुळे सत्तू खूपच दुखावला गेला होता.
‘‘काय हा तुझा अवतार सत्तू? भांडलास की काय कुणाशी? पेपर कसा होता?’’ घरात शिरताच सत्तूकडून दप्तर घेत आईनं विचारलं.
‘‘आई, किती गं तुझे प्रश्न! चांगला होता पेपर.’’
‘‘तुसे कपडे असे खराब का झालेत?’’
‘‘घरी येताना मनीषबरोबर भांडण झालं का?’’ सत्तूने शाळेत सगळं घडलेलं आईला सविस्तर सांगितलं.
‘‘सत्तू, यात तुझी काहीच चूक नव्हती. फक्त तू भांडायला नको होतंस.’’
‘‘सॉरी आई. पण आज मनीषने हाईटच केली! मला नाही सहन झालं. तो कॉपी करेल आणि माझ्यावर आळ आणेल, असं मला कध्धीच वाटलं नव्हतं,’’ सत्तू चिडून म्हणाला.
‘‘बरं, बरं, ठीक आहे. तू त्याला कॉपी करू दिली नाहीस नं, हेच महत्त्वाचं!’’
‘‘तो हल्ली कसा वागतो ते ठाऊक आहे नं तुला?’’
‘‘तो त्याचा प्रॉब्लेम आहे सत्तू!’’
‘‘माझा जिवलग मित्र असं वागतो, वाईट वाटतं गं,’’ सत्तू हताशपणे म्हणाला.
चाचणी परीक्षेतही सत्तूला सगळ्यात जास्त मार्क मिळाले. मनीषचं विचित्र वागणं सत्तूला आता आणखीनच जाणवू लागलं होतं..
०**
एक दिवस सोसायटीत फुटबॉल खेळताना सत्तू घसरून पडला. त्याचा उजवा पाय मुरगळला. डॉक्टरांनी त्याला तीन आठवडय़ांची सक्तीची विश्रांती सांगितली. मनीषला जेव्हा हे कळलं तेव्हा तो सत्तूला भेटायलासुद्धा आला नाही. त्याच्या ग्रुपमधल्या एक-दोन मित्रांनी फोन केले, इतकंच. वार्षिक परीक्षेला अजून महिना-दीड महिना होता, पण सत्तूचा बराच अभ्यास बुडणार होता..
सत्तूला घरी राहून तीन-चार दिवस झाले होते. त्याने नोट्सकरिता आज पुन्हा मनीषला फोन केला. पण मनीषने त्याला तशीच उडवा-उडवीची उत्तरं दिली.
‘‘आई, मनीष नोट्स देईल असं वाटत नाही.’’
‘‘जाऊ दे नं. तूही का सारखा त्याला फोन करतोयस?’’
‘‘मग काय करू?’’
‘‘अजून कुणी नाहीये का? त्या चिन्मयला का नाही विचारत? तो जवळच राहतो नं?’’
‘‘हो! पण माझ्याकडे नंबर नाहीये त्याचा.’’
‘‘ठीक आहे, आपल्याला जाऊन आणता येतील नोट्स त्याच्याकडून!’’
चिन्मय सत्तूच्याच वर्गात होता; दोन सोसायटय़ा सोडून राहायचा. तो टेबल-टेनिसचा इंटर-स्कूल चॅम्पियन होता. त्याने बनवलेली सुंदर ड्रॉइंग्ज, कविता नेहमी शाळेच्या नोटीस बोर्डवर झळकायची. स्वभावाने शांत, सगळ्यांना मदत करणारा असल्यामुळे, तो वर्गबाईंचाही लाडका विद्यार्थी होता. त्यामुळे मनीषला चिन्मय मुळीच आवडत नव्हता. म्हणून मग सत्तूचीही त्याच्याशी फारशी दोस्ती नव्हती. समोरा-समोर आले की थोडं हसले-बोलले, इथपतच.
संध्याकाळी सत्तू हॉलमध्ये अभ्यास करत बसला होता. बेल वाजली. आईने दार उघडलं. दारात शाळेच्या युनिफॉर्ममध्ये चिन्मय उभा होता, हातात मोठ्ठालं दप्तर घेऊन.
‘‘काकू, सत्तू आहे?’’
‘‘हो! ये, आत ये.’’
‘‘हाय सत्तू! कसा आहेस?’’, घरात येत चिन्मयनं विचारलं.
‘‘चिन्मय? तू? आणि इकडे कसा?’’ सत्तू आश्चर्यचकित होऊन म्हणाला.
‘‘हो! डायरेक्ट शाळेतूनच आलोय.’’
‘‘सत्तू, बसू तरी दे त्याला!’’ आई चिन्मयला पाणी देत म्हणाली.
‘‘तू दोन-तीन दिवस शाळेत दिसला नाहीस नं, म्हणून मी आज मनीषला विचारलं तुझ्याबद्दल, पण त्याला काहीच माहीत नव्हतं.’’
‘‘मी कळवलं होतं त्याला.’’
‘‘काय माहीत. आत्ता येताना तुझ्या ग्रुपमधला सोहम म्हणाला, की तुझ्या पायाला फ्रॅक्चर झालंय. मग वाटलं घरी जाता-जाता भेटून जावं तुला.’’
‘‘थॅंक्स यार.’’
‘‘बस काय? येही है दोस्ती?’’ सत्तूने आश्चर्याने चिन्मयकडे बघितलं.
‘‘माझा बराच अभ्यास बुडला आहे रे?’’
‘‘अरे, डोंट वरी. मी तुला झालेल्या अभ्यासाच्या वह्या आज देऊन जातो.’’ चिन्मय बॅगेतून वह्या काढत म्हणाला. ‘‘तू त्या उतरवून घे. आता दोन दिवस सुट्टी आहे नं, तुझं होईल सगळं लिहून. तोपर्यंत मी दुसरा अभ्यास करेन. एक दिवसाआड मी येईन तुला वह्या द्यायला. आणि काही शंका असतील नं, तर केव्हाही बिनधास्त फोन कर किंवा बोलव. मला जमेल तितके मी सांगण्याचा नक्की प्रयत्न करेन.’’ चिन्मयने सत्तूला त्याच्या घरचा फोन नंबर दिला.
‘‘चिन्मय, आज सकाळीच तुझा विषय निघाला होता. मला विचारायचं होतंच तुला नोट्सबद्दल, पण नेमका तुझा नंबर नव्हता माझ्याकडे. आणि बघ, तू आजच आपणहून मला भेटायला आलास.’’
‘‘टेलीपथी, दुसरं काय?’’
‘‘थॅंक्स मित्रा.’’
‘‘परत तेच? दोस्ती में नो सॉरी, नो थँक यू.’’ चिन्मयने हात पुढे केला. सत्तूने जोरात टाळी दिली.
थोडा वेळ गप्पा, खाणं-पिणं वगैरे झाल्यावर, चिन्मय घरी गेला. आई टेबलावर ठेवलेल्या वह्या उचलायला गेली तेव्हा उपडय़ा पडलेल्या पेपराच्या शेवटच्या पानाकडे तिचं लक्ष गेलं.
‘‘एवढं काय वाचतेस आई?’’
‘‘सत्तू, हा चिन्मय कालची इंटर-स्कूल फायनल हरलाय!’’
‘‘काय? बघू?’’
सत्तूनेही बातमी वाचली – ‘‘चिन्मय चिपळूणकरला नमवून आदित्य पाटील विजयी.’’
‘‘सत्तू, बघ. आपलं हरण्याचं दु:खं विसरून चिन्मय तुझ्या मदतीला आला. आता सांग, खरा मित्र कोण?’’
सत्तूला आईच्या म्हणण्याचा अर्थ बरोब्बर लक्षात आला. तो मोकळेपणाने हसला आणि त्याने आपल्या खऱ्या दोस्ताला मनापासून हेट्स ऑफ केलं..
प्राची मोकाशी
दोस्ती
‘‘मग काय, सत्तूने केली कॉपी?’’ ‘‘काय माहीत, असेलही! त्यालाच विचारा!’’ हे ऐकून सत्तूने मनीषकडे चमकून बघितलं. ‘‘नाही बाई, देवा शप्पथ. मी नाही कॉपी केली. मनीष खोटं बोलतोय. त्यानेच मला गणित विचारायला पायावर लाथ मारली.’’
आणखी वाचा
First published on: 29-03-2015 at 01:21 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Friendship