शुभांगी चेतन – shubhachetan@gmail.com
आपण सर्वच सध्या एका कठीण काळातून जात आहोत. करोना विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलंय. प्रत्येक जण त्यातून बाहेर कसं यायचं याचाच विचार करतंय. तुमच्याही परीक्षा रद्द झालेल्या आहेत. सुट्टी आहे, पण सक्तीची! बाहेर पडायचं नाही, मित्रांना भेटायचं नाही, खेळ बंद, पॉकेमोन कार्डचं ट्रेडिंग बंद, गप्पा बंद, सायकल बंद.. सारंच बंद, हो ना! पण आताच्या घडीला हे खूप आवश्यक आहे- आपल्यासाठीही आणि आपल्या मित्रांसाठीही. असे वाईट, कसोटीचे प्रसंग येत राहतात आणि माणूस म्हणून त्यातून शिकण्याची, वाढण्याची संधी सोडायची नसते. तुम्ही प्रत्येक जण मोठे व्हाल, अनेक प्रश्न तुम्हालाही असतील, तेव्हा हा काळ लक्षात ठेवायचा. काय शिकलो या कठीण दिवसांतून?
आपल्यातला माणूस हरवू द्यायचा नाही. तुमच्या एक लक्षात आलं का, की मित्रांसोबतची स्पर्धा किती खोटी आणि नगण्य असते. मित्र महत्त्वाचे, त्यांच्या सोबतचा खेळ महत्त्वाचा, ती मजा महत्त्वाची. तीच उरते आणि लक्षात राहते.
असाच आपला अजून एक मित्र आहे- निसर्ग. आपण चुकतोय का त्याच्यासोबतच्या वागणुकीत?.. हेही तुम्हा-आम्हाला तपासून पाहायला लागेल; आणि ते किती महत्त्वाचं आहे ते या एका विषाणूने दाखवून दिलंय. आपण घरात बंदिस्त आहोत, पण निसर्ग मात्र मुक्त आहे, स्वतंत्र आहे. त्यात बदल होतायत, त्याचे रंग बदलतायत, नवीन सुंदर चकचकीत पानं झाडांना दिसतायत, हिरव्या रंगाच्या छटांनी निसर्ग नवा होतोय, पहाटे मधेच कोकीळ गातोय, हो.. तो सांगतोय की वसंत आलाय. माझ्या घराच्या बाल्कनीतून झाडांचा गुच्छ दिसावा अशी झाडं बहरली आहेत, मधेच एक झाड मात्र लालसर, गुलाबी पानं घेऊन त्यातही वेगळं दिसतंय. वसंतात निसर्ग रंगीबेरंगी रूप धारण करतो. पळस, काटेसावर, पांगारा, बहावा अशी सुंदर उन्हाशी नातं सांगणारी फुलं निसर्गाचं रूप आणखी मोहक करतात.. आज आपण याच वसंताचं स्वागत करणार आहोत..
वसंत हा ऋतू रंगांची उधळण करत येतो. पानांच्या विविध छटा, रंगीबेरंगी फुलं, सारा निसर्ग नुकत्याच रंगवलेल्या कॅन्व्हाससारखा दिसतो. उन्हाची झळही चांगलीच जाणवत असते. सूर्य अधिकच उष्ण झाला की काय असंही वाटत राहतं. वातावरणात होणारा हा बदल आणि घरातच थांबण्याची सक्ती यातून आपल्यालाच मार्ग काढायचा आहे.
तुम्ही जर या काळात आजूबाजूलाच असणाऱ्या निसर्गाकडे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की, बहुतांश रंग उष्ण असतात. उन्हाच्याच विविध छटा. तुमच्याकडे शाळेसाठी लागणारे घोटिव कागद, रंगीत कागद असतील. नसतील तर घरी असलेल्या कोऱ्या कागदाला- एका बाजूने छापील असेल तर मागची बाजू कोरी असणाऱ्या कागदांना- पिवळा, लाल, नारंगी या आणि यांच्या विविध छटांनी रंगवायचं. रंगीत खडूही वापरायचे, पण उष्ण रंगाचे. दुसऱ्या मोठय़ा कागदावर किंवा लहान कागद जोडून केलेल्या कागदावर सूर्याचा आकार काढायचा आणि त्याला हा वर दिलेल्या साहित्याने रंगीबेरंगी सजवायचा. आता ते करताना तुम्हाला वाटलं की, त्या कापलेल्या आकारात कोणतं चित्र काढायचं आहे तर तेही काढा; पण रंगसंगती उष्णच वापरायची. इथे सोबत काही छायाचित्र दिलेली आहेत, त्यावरून तुम्हाला अंदाज येईलच काय करायचं आहे ते.
आपण वसंताचं स्वागत करू या. त्याला सांगू या की, आम्ही तयार आहोत तुझ्या स्वागतासाठी. कोकीळच्या त्या पहाटेच्या हाकेसोबत आपणही रोज उत्साहाने दिवसांची सुरुवात करू या. तुम्हाला हे सक्तीचं आत बसणं आवडणार नाहीए हे मान्य; पण हेच सध्या आपल्या सर्वाच्या हिताचं आहे, म्हणून सगळेच मिळून हे करू या. घरी राहू या, छान चित्र काढू या. खिडकीतून तुकडय़ाएवढा दिसणारा का असेना, पण तो निसर्ग पाहू या. त्याच्यासोबत संवाद साधू या. आपण बाहेर नसताना तो जितका मुक्त आहे, आपण बाहेर पडल्यावर त्याचं तेच स्वातंत्र्य जपण्याचा निर्धार करू या.. कारण तो आहे म्हणून आपण आहोत.. आणि तो राहिला तरच आपण असणार आहोत…