अलकनंदा पाध्ये
‘‘राधा ए राधा, सांग पाहू काल आईच्या बर्थडेला बाबांनी काय सरप्राईज आणलं असेल. ओळख पाहू?’’ शाळा सुटल्यावर आपल्या बसमध्ये बसायला जाणाऱ्या राधाला जयनं अडवून विचारलं. छोटय़ा शिशूत शिकणाऱ्या राधाला आपला मामेभाऊ जयदादाला पाहून प्रचंड आनंद झाला. ‘‘काय बरं आणलं असेल? मला नाही ओळखता येत. जयदादा तूच सांग ना!’’ त्याबरोबर ‘‘तुला माहितेय आमच्याकडे काल भूभूचं छोटंस्सं पिल्लू आणलंय बाबांनी. त्याचा मस्त चॉकलेटी रंग पाहिल्यावर आईला पटकन् कॉफीचीच आठवण आली, म्हणून आम्ही तिचं नाव आता ‘कॉफी’च ठेवलंय. तिचे लांब लांब कान तर असले क्यूट दिसतात ना की त्याचे दोन पोनीटेलपण बांधता येतील. मग कधी येशील आमच्या कॉफीला बघायला, की असं करतेस अत्ताच येतेस का माझ्याबरोबर? तुलापण खूप मज्जा वाटेल तिच्याशी खेळायला. काल आल्यापासून ती सारखी माझ्या मागे मागे कूं.. कूं करत पायात येत असते आणि बसल्यावर मांडीत बसायला बघते. खू..प गोड आहे ग कॉफी.. आपण असं करू या, आत्ता तू माझ्याबरोबर चल आणि संध्याकाळी आम्ही सोडायला येऊ तुला.’’ जयबरोबर कॉफीला बघायला जायच्या कल्पनेनं राधाचे डोळे एकदम चमकले. अनायसे जयच्या स्कूलबसमधून जायला मिळतेय तर आजच्या आजच कॉफीला बघता येईल. तिच्याशी खेळता येईल या विचारात ती जयदादाच्या घरी मनाने पोचलीसुद्धा. राधानं मान डोलावल्यावर जयनं मोठय़ा भावाच्या जबाबदारीनं तिचं दप्तर स्वत:कडे घेतलं, कारण तो तिच्यापेक्षा मोठा- दुसरीमध्ये शिकणारा दादा होता ना.. तिचा हात धरून जय तिला त्यांच्या कॉलनीत जाणाऱ्या बसकडे घेऊन गेला. बसमधेसुद्धा तिला आपल्या शेजारी बसायला व्यवस्थित जागा करून दिली. आठवून आठवून कॉफीच्या कालपासूनच्या गमतीजमती सांगण्यात जय पार रंगून गेला होता.
परंतु तिकडे शाळेच्या गेटपाशी मात्र वेगळाच गोंधळ चालू होता. बसवाल्या काकांची काळजीनं धावपळ चालली होती. प्रत्येक विभागात जाणाऱ्या बसेसमधली मुलांची मोजणी करताना सहकारनगरच्या बसमध्ये एक मूल कमी भरत होतं. शाळा नुकतीच सुरू झाल्यानं सर्व मुलांचे चेहरे आणि नावं अजून त्यांच्या ओळखीचे झाले नव्हते. पण यादी तपासल्यावर शिशुवर्गातली राधा बसमध्ये चढली नाही एवढं लक्षात आलं. क्लिनरनं शाळेत चक्कर मारून पाहिले तर सर्व वर्ग रिकामे दिसले. तोही हात हलवत परत आल्यावर काकांना तर दरदरून घामच फुटला. एवढय़ात बसमधल्या एक-दोन मुलांनी केजीचा गणवेश घातलेल्या छोटय़ा मुलीला जयबरोबर जाताना पाहिल्याचं सांगितलं. जयचं नाव ऐकल्यावर काकांना जयचा पूर्वीचा पराक्रम आठवला. अतिशय हुशार, पण अत्यंत धडपडय़ा जयनं पूर्वीही असंच घाबरवून सोडलं होतं. शाळा सुटल्यावर जय डोंबाऱ्याचा खेळ बघण्याच्या उत्सुकतेपोटी त्याच्या कॉलनीच्या म्हणजे आनंदनगरच्या बसमध्ये चढलाच नाही. तेव्हाही त्या बघ्यांच्या गर्दीतून त्याच्या गणवेशावरून त्यांनी ओळखून काढले होते. आताही काका धावतपळत आनंदनगरच्या बसकडे निघाले. जय आणि राधाच्या नावानं मोठय़ानं पुकारा करत बसमध्ये चढून पाहतात तर काय.. राधाला आपल्या शेजारी बसवून बसमधल्या सगळय़ा दोस्तांना जय कॉफीच्या गमतीच्या गोष्टी सांगण्यात रंगून गेला होता. कॉफीच्या गोष्टींमध्ये त्यानं सर्वाना एवढं गुंगवून टाकलं होतं की राधाबरोबर सगळय़ानीच बसमधून उतरल्यावर जयच्या घरी कॉफीला बघायला जायचा बेत ठरवला होता. ते पाहून काकांना हसावं की रडावं समजेना. अखेर काकांची टप्पल डोक्यावर बसल्यावर जयच्या तोंडाची टकळी थांबली.
‘‘ए पोरी.. राधा ना तू.. तू या बसमध्ये कशी आलीस. तुझी सहकारनगरची बस तिकडे सर्वात पहिली असते माहितेय ना तुला मग?’’ काका घाम पुसता पुसता वैतागून म्हणाले. त्यावर काकांना समजावताना बहिणीची बाजू घेत जय म्हणाला, ‘‘नाही नाही ती तिथेच जाणार होती, पण मीच तिला माझ्याबरोबर यायला सांगितलंय. कारण राधा माझी छोटी बहीण आहे आणि आज मी तिला आमची कॉफी बघायला आमच्याकडे बोलावलंय. तुम्ही काळजी करू नका. आम्ही संध्याकाळी सोडू तिला तिच्या घरी.’’
कपाळावर हात मारत काका म्हणाले, ‘‘आता कसं सांगावं रे बाळा तुला? तू म्हणशील तसं इथं नसतं रे बाबा. इथं आमचे बसचे काही नियम असतात. तुम्हा मुलांना तुमच्या घरातून शाळेपर्यंत आणि शाळा सुटल्यावर प्रत्येकाला तुमच्या आईबाबांनी सांगितलेल्या पत्त्यावरच पोचवायची मोठी जबाबदारी असते आमची. आता राधाच्या घरी तिची आजी वाट बघत असेल ना? ती जयच्या घरी गेली असं सांगून त्यांना पटलं पाहिजे ना? आणि मुळात असं तुझ्यासारखं प्रत्येक मूल आपल्या मनानं वागायला लागलं तर आम्हाला किती कठीण होऊन बसेल सांग पाहू? याआधी पण तू एकदा असाच बस सोडून खेळ बघायला गेला होतास ना.. अरे तू शहाणा मुलगा आहेस ना.. आपल्या मनाला येईल तसं वागायचं नाही. तुमच्या घरात. शाळेत. रस्त्यातून चालताना आणि तुमच्या खेळातसुद्धा काही नियम ठरलेले असतात ते पाळावे लागतात ना. तस्संच आमच्या बसमधून जायचे-यायचेसुद्धा नियम असतात. ते नाही पाळले तर गोंधळ होईल. आताच पाहा ना.. राधा दिसत नाही म्हटल्यावर केवढी धावपळ झाली आमची काळजी वाटते रे पोरा.’’ जयच्या डोक्यावर हात फिरवत काका म्हणाले. आपली चूक समजलेला जय खाली मान घालून गप्प झाला. ते पाहून त्याला पुन्हा टपली मारून दरवाजाशी जात काका म्हणाले, ‘‘आजच्या आज जय.. राधा आणि सगळय़ा पोरांनी शपथ घ्या की, यापुढे आपापल्या ठरलेल्या बसमधूनच सगळेजण घरून शाळेत आणि शाळेतून घरी जाणार. आणि कुणी शपथ मोडली तर त्याला माझ्या बसमध्ये प्रवेश नाही. राहील ना लक्षात? आणि ए राधा चल गं पोरी तुमच्या सहकारनगरमध्ये.. संध्याकाळी जा त्या जयकडे कॉफी की चहा काय ते प्यायला.’’
त्यावर ‘‘अहो काका, कॉफी काय प्यायची नाहीये, ते भूभू पिल्लू आहे. काकांना समजलंच नाही,’’ म्हणत सर्व मुलं हसायला लागली.
alaknanda263 @yahoo.com