माधवी वागेश्वरी
ससा आणि कासवाची शर्यत ही गोष्ट प्रसिद्ध झाली. ‘‘ससा तो ससा की कापूस जसा..’’ हे गाणं तोंडपाठ करून मुलामुलींची बक्षिसं मिळवून झाली. कौतुक करून घेतलं, पण त्या ससा-कासवाचं काय झालं? त्यांना काय वाटत होतं, हे विचारायला कोणी गेलं नाही. गोष्ट नुसती गोष्ट म्हणून ऐकायची, त्यानुसार वागायचं नाही, असं माणसांनी ठरवून टाकलं.
खरं तर त्या प्रसंगाच्या दुसऱ्या दिवशी ससा कुठं दिसेना म्हणून कासव कासावीस झाला होता. त्याला शोधून शोधून पार संध्याकाळ व्हायची वेळ आली. कासवाला कळेना काय करावं. त्यानं आपले चारी पाय आत ओढून घेतले आणि नुसताच पडून राहिला. नेमका टणक झालेला कासवाचा चेंडू लागला म्हाताऱ्या हत्तीला. तसं त्यानं आपल्या सोंडेनं त्याला कुरवाळलं. त्या मायेच्या स्पर्शानं कासवानं हळूच डोकं बाहेर काढलं. मग हळूहळू पाय बाहेर काढले.
‘‘काय रे राजा, काय झालं? चेहरा असा का उतरलाय? बरं वाटत नाही का?’’ हा हत्ती सगळय़ांना ‘राजा’ म्हणून हाक मारायचा. चिमुकलं फुलपाखरू असू दे किंवा सिंह किंवा खार. तो सगळय़ांना राजा म्हणायचा. खूप प्रेमानं आणि आदारानं वागवायचा.
‘‘नाही मला बरं आहे.. ठीक आहे मी.. तुम्ही माझ्या मित्राला पाहिलं का हो?’’
‘‘मित्र कोण रे? कोल्हा की तरस की लांडगा की तो कोकीळ? तो कोकीळ विचारत होता बघ सकाळी तुझ्याबद्दल..’’
‘‘नाही, हे सगळे आहेतच मित्र.. ते मी सशाबद्दल विचारत होतो.’’
‘‘तो राजा का..’’
‘‘हां हां..’’
‘‘तो दुपारी दिसलेला मला.. एकटाच बसला होता.. मी हाक मारली तर पळून गेला. मला वाटलं असेल घाईत.. त्याची आई सांगत होती, आज काही त्यानं चरलंच नाही.. सकाळपासून कुठं गेला काय की..’’
‘‘हो का.. मी तर दिवसभर शोधलं त्याला, पण दिसलाच नाही.’’
‘‘कुठं शोधत होतास त्याला तुझ्या आत का बाहेर?
‘‘म्हणजे.. मी बाहेरच शोधत होतो.’’
‘‘तू आत आत्ता स्वत:ला दडवून घेतलं होतंस ना म्हणून विचारलं.. खरा मित्र आपल्या आतही असतो आणि बाहेरही.’’ हे ऐकून कासवाला दिवसभरात पहिल्यांदा बरं वाटलं.
‘‘बरं राजा, मला सांग तरी काय झालंय ते?’’ हत्तीनं विचारलं.
‘‘तुम्ही कुठं पाहिलं होतं त्याला, आपण त्याच्याकडे जाऊ या का, मला त्याला बघायचं आहे.’’
‘‘हो हो, लगेच जाऊ.’’ मग तो म्हातारा हत्ती आणि कासव निघाले सशाकडे. थोडय़ा वेळानं वाटेत त्यांना खुसपूस ऐकू आली, तसा कासव एकदम थांबला आणि त्यानं ओळखलं की ससा मागे आहे, आपल्याला कळलं म्हणून पटकन् लपून बसला. काय झालं ते हत्तीच्याही लक्षात आलं.
‘‘ये रे माझ्या राजा, बाहेर ये.. लपायचं काय आहे त्यात? इकडं ये..’’
हत्तीचा मायाळू आवाज, त्यानं नेहमी लावलेला जीव याच्यामुळे सशाला राहावलं नाही आणि तो हळूहळू बाहेर आला. तसा कासव भरकन त्याच्या जवळ गेला.
‘‘काय रे कासवा, आत्ता किती पटकन् चाललास.. काल काय झालं होतं तुला..’’ ससा म्हणाला.
‘‘तुला चांगलंच माहिती आहे सशा, काल काय झालं ते..’’
‘‘अरे, मला सांगाल की नाही काय झालंय ते.’’ दमलेला हत्ती फतकल मारून बसला.
ससा आणि कासवानं एकमेकांकडे पाहिलं. ‘तू सांग, तू सांग’ असे भाव दोघांच्याही डोळय़ात होते. शेवटी ससा बोलू लागला..
‘‘काल नाही का.. ते माणसं करतात ते केलं त्यांनी आमच्यात.’’
‘‘काय?’’
‘‘ते ओ ते..’’ हत्तीनं स्वत:च्याच डोक्यावरून सोंड फिरवली आणि म्हणाला, ‘‘माणसं काय बरं करतात.. ते एक तर रागराग करतात, द्वेष करतात, युद्ध करतात, कधी कधी त्यांच्याच लहान पिलांना आणि बायकांना रडवतात, निसर्गावर मात करतात.. म्हणजे असं त्यांनाच वाटतं आणि जंगल तोडतात आणि.. प्रेम करतात म्हणे..’’
‘‘नाही हे सगळं तर आहेच. ते अजून ते करतात ना.. श पासून.. अवघड आहे तो शब्द काय रे.. सांग की कासवा..’’
‘‘शर्यत.’’
‘‘हां शर्यत..’’
तसा हत्ती म्हणाला, ‘‘हो हो, बरोबर राजा, पण शर्यत तर ते सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करतच असतात, पार अगदी काय त्यांच्या त्या शाळेपासून ते कॉलेजात ते नोकरीवर ते व्यवसायात ते..’’
‘‘घरीपण.’’ मध्येच कासव बोलला.
मोठय़ांच्या मध्ये लहानग्यांनी बोलायचं नसतं हा नियम त्यांच्यात नव्हता. त्यामुळे हत्तीला राग वगैरे काही आला नाही.
‘‘बरं राजाहो, मला सांगा.. हे तर माणसं आपापसात करतात, मग त्यांनी तुमचं नेमकं केलं काय?’’ असं म्हणून उठून हत्तीनं चालायला सुरुवात केली.
‘‘अहो कुठं चाललात?’’ ससा-कासव एका सुरात म्हणाले.
‘‘चला तळय़ाशेजारी बसू.’’ हत्ती मागे न बघता म्हणाला. म्हातारा हत्ती मध्येच चालायला लागतो ही त्याची सवय ससा आणि कासवाला माहिती असल्यानं त्यांनी त्याच्या मागे चालायला सुरुवात केली.
‘‘तर काय झालं..’’ सशानं उडय़ा मारत बोलायला सुरुवात केली. ‘‘मी आपला काल असाच अगदी आत्ता उडतोय तसा..’’
‘‘उडय़ा रे..’’ कासव मध्येच म्हणाला.
‘‘हो, उडय़ा मारत चालत होतो आणि हा माझा दोस्त कासव आपला आत्ता चालतोय तसा चालत होता. आम्ही आपलं मस्त आपलं आपलं जंगल बघत याला भेट, त्याला भेट करत जात होतो बरं का! सध्या जंगल किती फुलून गेलंय आणि आपल्या जंगलातला तो डोंगर आहे ना तिथलं गवत नक्की खाऊन ये, असं आई म्हणालेली म्हणून मी आपला चाललेलो.’’
‘‘आणि मीपण आपला नेहमीसारखा चाललेलो. वाटेत ससा भेटला तर मला छानच वाटलं. आम्ही मस्त गप्पा मारल्या.’’
‘‘तर लगेच त्या माणसांना वाटलं की मी याला म्हणालो की चल डोंगरापर्यंत शर्यत लावू.’’ सशानं लाल डोळे मोठे केले.
‘‘तेच ना. यांना काय माहिती आमची भाषा. उगीच काही तरी माहीत नसताना द्यायचं आपलं ठोकून.’’
‘‘अरे राजा, असा एक व्यवसाय असतो माणसांमध्ये ‘ठोकून लिहायचा आणि ठोकून द्यायचा.’ हत्ती आकाशाकडे पाहत म्हणाला. मावळतीचे रंग सुंदर दिसत होते.
‘‘आम्ही झालो ना याचे शिकार. आमच्यात काही शर्यत नव्हती. ससा मस्त उडय़ा मारत चालतो ते मला आवडतं आणि मी असा छान माझ्या गतीनं चालतो ते मला आवडतं.’’
‘‘मला तर जाम आवडतं.’’ सशाचे आनंदाने कान ताठ झाले.
‘‘मग झालं तर, चला..’’
‘‘नाही ना. आम्ही हे एकमेकांना बोललोच नाही. आत्ता तुमच्या समोर बोलतोय.’’ कासव सशाकडे बघत म्हणाला. सशालाही कळलं आपण हे एकमेकांशी बोलायला पाहिजे होतं. हत्तीनं त्यांना जवळ बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावरून सोंड फिरवली आणि म्हणाला, ‘‘वाटू दे माणसाला काय वाटायचं ते. दोन एकसमान शक्ती नसणाऱ्या नैसर्गिक घटकांमध्ये ते अशीच स्पर्धा लावतात आणि हा कमी तो जास्त, ती चांगली ही वाईट असं काही तरी ठरवत बसतात आणि दु:खी होतात. पण म्हणून खरं काय ते लपून बसतं का, नाहीच. आता अंधारून येईल. काळोख जंगलाला कुशीत घेऊन झोपी घालील. तेवढय़ापुरते कोणी कोणाला दिसणार नाही, पण म्हणजे आपण असणार नाहीत असं थोडीच असतं. खरं तसंच असतं. आपण आपल्या खऱ्यासोबत राहायचं आणि ते राहण्यासाठी एकमेकांना मदत करायची.’’
‘‘माझं चुकलं मी कासवाशी बोलायला हवं होतं. त्यानं दिवसभर मला शोधलं असणार आणि मी उगाच नाराज होऊन लपून बसलो. आईलासुद्धा काळजी लागली असणार. पण मी हे असं कधी केलेलं नाही खरंच नाही. आत्ताच मी असा का वागलो?’’
‘‘कारण तुझ्यावर ‘न केलेल्या शर्यतीचा’ परिणाम झाला.’’
‘‘कसं असतं ना..’’ सशाला जरा भीतीच वाटली.
‘‘सशा राजा, अरे तुमच्या कुटुंबाच्या तर पाठीवर पान पडलं म्हणून आभाळ पडलं म्हणून घाबरणाऱ्या सशा पासून विहिरीत सिंहाला त्याचं प्रतिबिंब दाखवून मारून टाकणारा शूर ससा ते.. अजून काय काय केलं गेलं आहे. मला खरं तर प्रश्न पडतो, एवढय़ा गोष्टी रचल्या आपल्यावर माणसांनी तरी फरक कसा पडत नाही? आता हेच बघा ना, ही गोष्ट लिहिणारी मुलगी.. ती ही एक माणूसच आहे.. मुलगी माणूस असते बरं का हे तुम्ही लक्षात घ्या, ते पुरुष समजत नसले तरी.. हे एक सांगून ठेवतो मध्येच. .. तर ती तिला काय वाटतं ते ती लिहितेय.. प्रत्येकाला जसं दिसतं तसं ते लिहितात. जे वाटतं ते.. काही तरी आरोपित करतात.’’
‘‘पण मग आम्ही काय करू?’’ कासवानं विचारलं.
‘‘तुमच्या शर्यतीची गोष्ट आणि त्यानंतरची हीदेखील गोष्ट माणसांसाठी आहे, आपल्यासाठी नाही. आपण आपलं नैसर्गिकरीत्या राहायचं.. एकमेकांना सांभाळायचं, एकमेकांच्या सगळय़ा वेगळेपणासकट..’’ ससा आणि कासव एकदम खूश झाले आणि मग ससा उडय़ा मारत, कासव हळूहळू चालत आणि हत्ती डुलत डुलत जंगलाच्या काळोखात नाहीसे झाले.
madhavi.wageshwari@gmail.com