अद्वैताचा काका सध्या एका सिनेमासाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतोय. त्या सिनेमात आफ्रिकेत बोलल्या जाणाऱ्या ‘स्वाहिली’ भाषेचा बराच वापर आहे. त्यामुळे सध्या काकाचंही एकीकडे स्वत: स्वाहिली शिकणं आणि घरी आल्यावर ती अद्वैताला शिकवणं हे दोन्ही सुरूअसतं! दारावरची बेल वाजल्यावर ‘काका आला असेल’ असं म्हणतच अद्वैता दाराकडे धावली आणि दार उघडून ‘जम्बो’ असं म्हणाली! काल शिकवलेलं स्वाहिलीतलं ‘जम्बो’ म्हणजे ‘हाय’ हे अद्वैताने लक्षात ठेवलेलं बघून काका खूश झाला; तर त्याने त्याच्या सॅकमधून काढलेला खोका बघून अद्वैता खूश झाली!
‘‘काय आहे याच्यात?’’ तिनं उत्सुकतेनं विचारलं तेव्हा काका म्हणाला, ‘‘तू बघ उघडून, तोपर्यंत मी हात-पाय धुऊन फ्रेश होऊन येतो.’’ खेळण्याचा खोका तिच्या हातात देऊन काका आत गेला. अद्वैताने खोका उघडून बघितला तर आत बरेचसे लाकडी लांबट ठोकळे होते. खोक्यावरच्या चित्रात ते ठोकळे एकमेकांवर रचून एक उंच टॉवर केलेला दिसत होता. हे नक्की काय असावं याचा विचार ती करत असतानाच काका तिथे आला आणि म्हणाला, ‘‘या खेळाचं नाव आहे ‘जेंगा.’ आमच्या सिनेमातल्या एका आफ्रिकन कलाकाराने हा खेळ सेटवर आणला होता. दोन शॉट्सच्या मध्ये वेळ असला की आम्ही सगळेजण हा खेळ खेळतो. मला ‘जेंगा’ खूप आवडला म्हणून म्हटलं तुझ्यासाठीपण आणूया!’’
‘‘असांटेसाना, काका!’’ अद्वैता म्हणाली. स्वाहिलीत ‘असांटेसाना’ म्हणजे ‘ळँंल्ल ‘ Thank you very much’ हे काकाच्याही लक्षात यायला काही सेकंदं जावी लागली! हसत हसत काकाने समोरचा टीपॉय पुढे ओढला आणि ते लाकडी लांबट ठोकळे एकमेकांवर रचायला सुरुवात केली. काका ते ठोकळे कसे रचतोय ते अद्वैता मन लावून बघत होती. तेवढय़ात तिची आजीही तिथे आली. काकाने ठोकळे रचून टॉवर पूर्ण केला आणि अद्वैताला म्हणाला, ‘‘हे बघ, हे एकूण ५४ ठोकळे असतात. एका वेळी तीन ठोकळे शेजारी ठेवून अठरा मजल्यांचा टॉवर सुरुवातीला रचायचा. आता या टॉवरमधून हळूच कोणताही एक ठोकळा काढायचा आणि अलगद अगदी वर ठेवायचा. पण असं करताना तोल जाऊन टॉवर पडणार नाही याची नीट काळजी घ्यायची. टॉवर जेवढा उंच बनेल तेवढं चांगलं!’’
अद्वैताने सांभाळून, जपून एक ठोकळा काढला आणि वर ठेवला. आजी म्हणाली, ‘‘मला काही हे जमेल असं वाटत नाही! हल्ली माझा हात स्थिर रहात नाही. या खेळासाठी तर हात स्थिर राहायला हवा.’’ काका म्हणाला, ‘‘तुझं बरोबर आहे. पण टॉवरला धक्का न लावता कुठला ठोकळा काढता येईल हे तर तू अद्वैताला सुचवू शकतेस!’’ आजीने मान डोलावली आणि बारकाईने अद्वैता काय करतेय ते पाहायला लागली. हातांची स्थिरता, अंदाज बांधण्याची क्षमता, निरीक्षणशक्ती आणि एकाग्रता अशा सगळ्याच गोष्टींचा जेंगा खेळताना कस लागतो. हा असा खेळ कुणाला सुचला असेल, असा प्रश्न अद्वैताला साहजिकच पडला. त्यावर काकाने सांगितलं, ‘‘तसा हा खेळ फार जुना नाहीये. सत्तरच्या दशकात आफ्रिकेत राहणाऱ्या लेस्ली स्कॉट या मुलीच्या कुटुंबात हा खेळ खेळला जात असे. मुलांच्या खेळण्यातले लाकडी तुकडे घेऊन ते लोक खेळत असत. इंग्लिश आणि स्वाहिली बोलणाऱ्या लेस्लीने या खेळाला नीट स्वरूप दिलं आणि ‘जेंगा’ असं त्याचं नामकरण केलं. स्वाहिलीमध्ये जेंगा म्हणजे ‘बिल्ड’ किंवा ‘बांधणं.’ १९८३ च्या जानेवारीत लंडन टॉय फेअरमध्ये तिने जेंगा लाँच केला.’’
काकाचं वाक्य जेमतेम संपत होतं तेवढय़ात अद्वैताने एक चुकीचा ठोकळा काढला आणि तोल डळमळल्याने टॉवर कोसळला! ‘‘सुरुवातीला असं होणारच,’’ असं म्हणत काकाने पुन्हा टॉवर रचत पुढे सांगितलं, ‘‘आता जेंगाची आणखी व्हरायटीसुद्धा मिळते. त्यात लाल, निळ्या किंवा पिवळ्या रंगांचे ठोकळे असतात आणि विशिष्ट प्रकारचा फासा असतो. त्याच्यावर सूचना लिहिलेल्या असतात. म्हणजे ‘पिवळ्या रंगाचा कुठलाही ठोकळा काढा किंवा शेवटी रंग असलेला ठोकळा काढा वगैरे. तशा सूचनांप्रमाणे खेळणं हे आणखी आव्हानात्मक असतं. जेंगाचे ‘ट्रथ ऑर डेअर’, ‘जेंगा एक्स्ट्रीम’, ‘जेंगा जायंट’ असे आणखीही काही प्रकार असतात. पण आपल्याला सुरुवातीला हा मी आणलेला जेंगा खेळायला जमला तरी पुष्कळ झालं!’’
बोलता बोलता त्याने अठरा माजली टॉवर रचला, तेवढय़ात त्याचा फोन वाजला. काहीतरी कामाचं बोलून झाल्यावर तो म्हणाला, ‘‘अद्वैता, काकाचा मोकळा वेळ संपला. उद्याचं शूटिंग शेडय़ूल बदललंय, ते मला सगळ्यांना कळवायला हवं. त्यामुळे मी आता आत जातो. तू आणि आजी बसा जेंगा खेळत.’’ काकाचं बोलणं ऐकून अद्वैता थोडी हिरमुसली, पण लगेच काकाला ‘क्वाहेरी’ म्हणाली. स्वाहिलीतलं ‘क्वाहेरी’ म्हणजे काय माहीत नाही? मग काढा शोधून!
अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा