अन्वीच्या वाढदिवसाला जाऊन आल्यामुळे स्वरा एकदम खूश होती. सगळे मित्र-मैत्रिणी भेटले, आवडीचा खाऊ आणि केक मिळाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘रिटर्न गिफ्ट’सुद्धा मिळालं! वाढदिवसाला मिळणाऱ्या रिटर्न गिफ्ट्सविषयी स्वराला आणि तिच्या आजीलाही नेहमीच खूप उत्सुकता असायची. ‘आमच्या वेळी असलं काही नव्हतं,’ असं नाक मुरडून म्हणणाऱ्या लोकांपैकी स्वराची आजी नव्हती. उलट आत्ताचे आई-बाबा किती कल्पकतेने रिटर्न गिफ्ट्स निवडतात याचं तिला कौतुकच वाटायचं. कधी क्रेयॉन्स, कधी पेन्सिल, शार्पनर-खोडरबर-पट्टी आणि चॉकलेट्स असं कॉम्बिनेशन, कधी रंगीबेरंगी फ्रिज-मॅग्नेट्स असं काय काय मिळत असे. पण अन्वीच्या वाढदिवसाची परतीची भेट मात्र वेगळीच होती. एका छोटय़ाशा सुबक खोक्यात ‘टिक-टॅक-टो’ नावाचा एक खेळ होता. स्वराने उत्सुकतेने, पण जपून तो खेळ खोक्यातून बाहेर काढला. एका लाकडी बोर्डवर छोटे छोटे लाकडी चौकोनी ठोकळे होते आणि ठोकळ्यांवर ‘X’ आणि ‘O’ अशी चिन्हं लाल आणि निळ्या रंगात रंगवलेली होती. तो खेळ बघून आजीच हरखून गेली आणि ‘‘अरे वा! हा खेळ असाही मिळतो का आता? आम्ही तर वही नाहीतर पाटी-पेन्सिल घेऊन खेळायचो!’’ असं पटकन म्हणाली. स्वरा तर आजीकडे बघतच राहिली. मग आजीच पुढे म्हणाली, ‘‘अगं, शाळेत एखाद्या तासाच्या बाई आल्या नाहीत तर आम्ही मैत्रिणी हाच खेळ खेळायचो. पण याचं हे ‘टिक-टॅक-टो’ नाव मात्र मला आत्ताच कळतंय हो! आम्ही आपले याला ‘फुल्ली गोळा’च म्हणायचो.’’
‘फुल्ली-गोळा!’ स्वराला तर हे नाव जामच आवडलं. अगदी खेळाला साजेसं नाव!
‘‘पण आजी, तुम्ही हा खेळ खेळायचात कसा?’’ स्वराचा हा प्रश्न आजीला अपेक्षितच होता. तिने पटापट त्या चौकोनावरचे ठोकळे बाजूला काढले आणि म्हणाली, ‘‘स्वरा, आता मी यातल्या फुल्या या बोर्डवर लावणार आणि तू हे गोळे लावायचेस. पण लक्षात ठेव की हे फुल्या-गोळे आपण एकाच रेषेत लावायचा प्रयत्न करायचा. समजा मी आधी तीन फुल्या एका रेषेत लावल्या तर मी जिंकले आणि तू आधी तीन गोळे एका रेषेत लावलेस तर तू जिंकलीस! आपण अर्थातच एकमेकींना तसं करण्यापासून रोखायचं!’’ स्वराने मान डोलावली आणि हातातला ठोकळा बोर्डवर लावला.
आजी खूप वर्षांनी हा खेळ खेळत होती, पण एके काळी ती फुल्ली गोळा खेळण्यात एक्स्पर्ट असल्याने स्वराला तिने सहज हरवलं! हळूहळू अंदाज आल्यावर स्वरानेही आजीला हरवलं. त्यांचा हा खेळ सुरूअसतानाच बाबा ऑफिसमधून आला. आपल्या लहानपणी खेळलेल्या खेळाचं नवीन रूप पाहून तोही खूश झाला. इतक्या पिढय़ांपासून खेळला जाणारा खेळ खेळण्याची सुरुवात नेमकी कधी झाली हे त्याला शोधावंसं वाटलं म्हणून त्याने इंटरनेटवर बघितलं तर त्याला कळलं, की या खेळाचा इतिहास शोधायला आपल्याला पार रोमन साम्राज्यात जायला हवं! कारण फुल्ली गोळ्यासारखा काहीसा खेळ रोमन साम्राज्यात पहिल्यांदा खेळला गेला होता आणि तोही साधारण इसवीसन पूर्व पहिल्या शतकात! जुन्या इजिप्तमध्येही या खेळाचे धागेदोरे सापडतात. अर्थात तेव्हाच्या काळी त्यांची नावंही वेगळी होती.
‘टिक-टॅक-टो’ ला ‘नॉट्स अ‍ॅण्ड क्रॉसेस’ असंही म्हटलं जातं. या ब्रिटिश नावाचा लेखी उल्लेख १८६४ मध्ये झाल्याचं आढळतं. ‘टिक-टॅक-टो’ या नावाचा उल्लेख १८८४ साली झाला होता, पण तेव्हा डोळ्यांवर पट्टी बांधून हातात पेन्सिल घेत आणि ती पाटीवरच्या किंवा कागदावरच्या ज्या आकडय़ावर पडेल तो आकडा खोडत असत. काहीसा अशा पद्धतीनेही हा खेळ खेळला जाई. ‘नॉट्स अ‍ॅण्ड क्रॉसेस’चं ‘टिक-टॅक-टो’ असं नामकरण मात्र साधारण विसाव्या शतकात झालं. माहिती शोधता शोधता बाबाच्या असंही लक्षात आलं की ‘थ्री मेन्स मॉरीस’, ‘नाइन मेन्स मॉरीस’, ‘क्यूबिक’, ‘कनेक्ट फोर’, ‘टॉस अक्रॉस’ हे बोर्ड गेम्सही साधारण याच प्रकारातले आहेत. वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून त्यातला ‘कनेक्ट फोर’ हा खेळ स्वराला आणून द्यायचं बाबाने कबूल केलं आणि तो पुन्हा आजी आणि स्वराचा खेळ बघण्यात रमून गेला!
अंजली कुलकर्णी-शेवडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा