घरटय़ाजवळ उडताना, शिकार शोधताना, अन्न मिळविताना पक्षी जवळच्या खुणांचा संदर्भ ठेवून आपला मार्ग लक्षात ठेवतात. उदा. वृक्ष, नदी इत्यादी. परंतु स्थलांतर करताना ते त्यांचे लक्ष्य व दिशा कशी ठरवितात, याचे शास्त्रज्ञांना अजूनही गूढ आहे. यासंदर्भात खालील तर्क मांडण्यात आले आहेत.
१. सूर्याच्या समांतर येणाऱ्या किरणांना विशिष्ट कोन करून पक्षी उडतात. जे पक्षी रात्रीदेखील स्थलांतरण चालू ठेवतात ते प्रमुख तारकासमूहाच्या ज्ञानावरून मार्गक्रमण करतात.
२. काही शास्त्रज्ञांच्या मते, पक्ष्यांच्या मेंदूत अंतर्गत चुंबकीय होकायंत्र असते. जे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या अनुरोधाने काम करते. वातावरणातील दाब, हवामान व पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्रातील बदल जाणून घेण्याची क्षमता पक्ष्यांमध्ये असते. याच सहाय्याने पक्षी दिशा ठरवितात. कुठलाही अनुभव नसताना तेवढय़ाच अचूकतेने पक्ष्यांची पिल्ले आपले लक्ष्य गाठतात. यावरून असे सिद्ध होते की, त्यांचे ठरविण्याचे ज्ञान जन्मजात असते. जसे कुठलाही अनुभव नसताना पक्षी पहिल्यांदा घरटे बांधतो तसेच तो दिशा ठरवितो.
’ ’ ’
हाता-पायांची बोटे लहान-मोठी का असतात?
या प्रश्नाचे उत्तर देताना हाता-पायांच्या या अशा रचनेचा आपणास काय फायदा आहे, या अंगाने विचार करावा लागेल.
हाताची बोटे एकाच लांबीची असण्यापेक्षा ती निरनिराळ्या लांबीची असल्यामुळे बोटांची हालचाल करून वस्तूवरची पकड अधिक घट्ट करता येते. विशेषत: वस्तूचा आकार कसाही असला तरी हाताने वस्तू पकडता येते. पायाच्या बाबतीत बोलायचे तर जमिनीवर निरनिराळ्या लांबीची बोटे ज्या पद्धतीने टेकतात त्यामुळे अधिक स्थैर्य येते. दाराच्या मोठय़ा बिजागऱ्यावर ज्या वेळेस चार-पाच स्क्रू असतात तेव्हा ते एका सरळ रेषेमध्ये नसतात. हे निरीक्षण आपण अवश्य करा. म्हणजे या रचनेमागचा यांत्रिक फायदा लक्षात येईल.
’ ’ ’
मुंग्या कायम एका रांगेत शिस्तीने का जातात?
मुंग्यांच्या लांबच लांब रांगेचे आपणास कायमच अप्रूप वाटत असते. कधीही पाहा, मुंग्या रांग न मोडता शिस्तीत आपले काम करीत असतात. याचे कारण म्हणजे मुंगी ही माणसाप्रमाणेच समाजप्रिय आहे. अन्नाच्या शोधासाठी मुंग्या गटाने वारुळातून बाहेर पडतात. सुरुवातीला कामकरी मुंग्या अन्नासाठी बाहेर पडतात. एकदा का मुंगीला अन्नाचा साठा मिळाला की ती त्याचे सॅम्पल घेऊन धावत वारुळाकडे परत फिरते. या वेळी मात्र ती तिचे पोट आणि स्टिंग जमिनीला घासत घासत येते. यामुळे आपण पेनने जशी रेषा काढतो अगदी तशाच प्रकारची रेषा जमिनीवर तयार होते.
आणखी मजेशीर बाब म्हणजे जेव्हा स्टिंग जमिनीवर घासली जात असते, तेव्हा त्यातून ‘ट्रायल फर्मोन’ नावाचे रसायन बाहेर सोडले जाते. अशा प्रकारे ही मुंगी अन्नाच्या ठिकाणापासून ते वारुळापर्यंत अदृश्य अशी रसायनांची रेष आखते. वारुळात येताच अन्नाची शहानिशा होते आणि अनेक कामकरी मुंग्या त्या रेषेवरून अन्नापर्यंत पोहोचतात. परतताना त्यादेखील अशीच रेष मारतात. यातून एक अदृश्य राजमार्गच आखला जातो आणि त्यावरून शेकडो मुंग्या ये-जा करतात. मुंग्यांनी सोडलेले रसायन लगेच उडून जाते. त्यामुळे रसायन सोडण्याची प्रक्रिया प्रत्येकीकडून सतत सुरू असते. अर्थात हा मार्ग सोडला तर भरकटण्याची भीती मुंगीला कायम सतावत असते. त्यामुळेच ती रांग सोडण्याचे धाडस करीत नाही.