सातवा तास संपल्याची घंटा वाजली. आता आठवा तास.. शेवटचा..
पी. टी.चा..
मुली लगबगीने वर्गातून शाळेसमोरच्या मैदानावर जायला निघाल्या. इतक्यात इतिहासाच्या बाई वर्गावर आल्या. मुली पुन्हा वर्गात जाऊन बसल्या. गावातल्या कन्याशाळेतला हा आठवीचा वर्ग. गावातली ही त्या मानाने लहान शाळा होती. प्रत्येक इयत्तेची एक तुकडी. प्रत्येक वर्गात ४०-५० मुली. इथले शिक्षकही आसपासच्या गावातल्या मुलींना चांगलं शिक्षण मिळावं याकरिता खूप झटणारे!
‘‘बसून घ्या.’’ बाई सगळ्या मुलींना शांत करत म्हणाल्या.
‘‘बाई, आज पी. टी.चा तास नाही का?’’ एका विद्यार्थिनीनं विचारलं.
‘‘नाही. आज आपल्याला येत्या २६ जानेवारीकरिता काही कार्यक्रम सादर करण्यासाठी थोडी चर्चा करायची आहे. तुमच्या पी. टी.च्या बाई सुट्टीवर गेल्या आहेत. त्यामुळे मुख्याध्यापिका बाईंनी मला ही जबाबदारी दिली आहे.’’
‘‘म्हणजे काय करायचंय आपण या वर्षी?’’ अजून एकीनं उत्साहानं विचारलं.
‘‘सांगते. पण त्याआधी एक माहिती म्हणून विचारते, तुमच्यापैकी २६ जानेवारी या दिवसाचं महत्त्व कोण सांगू शकेल?’’
‘‘२६ जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन.’’ तिसरी विद्यार्थिनी म्हणाली.
‘‘हो! पण त्याचा अर्थ काय?’’ आता बाई आणि विद्यार्थिनींमध्ये खेळीमेळीची प्रश्नमंजूषा सुरूझाली होती.
‘‘बाई, १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान झाले पंडित नेहरू.’’
‘‘बरोबर!’’
‘‘२६ नोव्हेंबर १९४९ ला आपल्या देशाचा कारभार चालवण्याकरिता राज्यघटना मंजूर झाली आणि ती २६ जानेवारी १९५० ला अमलात आली. अनेक ठिकाणी पूर्वापार चालत आलेली राजेशाही राजवट संपून आपण सार्वभौम प्रजातंत्र झालो. म्हणून या दिवसाचं खूप महत्त्व आहे.’’ वर्गातल्या एका हुशार विद्यर्थिनीने उत्तर दिलं.
‘‘सार्वभौम प्रजातंत्र म्हणजे काय गं?’’
‘‘लोकांचं लोकांसाठी लोकांनी स्थापन केलेलं सरकार, म्हणून हे आपलं प्रजातंत्र आणि त्यामुळेच या प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व.’’
‘‘आणि हे सगळं कुणाच्या प्रयत्नांमुळे घडू शकलं?’’
‘‘विखुरलेल्या देशाला संपूर्ण भारत बनवण्याचं श्रेय जातं सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे. जुनागढचा नवाब, हैद्राबादचा निझाम, काश्मीरचा राजा यांच्यासारख्या शेकडो संस्थानांमधील राजेशाही राजवटीला संपवून त्यांनी अखंड भारत निर्माण केला. आणि त्यानंतर आपली राज्यघटना अमलात आली- जिचे शिल्पकार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.’’
‘‘मग आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती कोण?’’
‘‘डॉ. राजेंद्र प्रसाद.’’
‘‘छान! इतकी माहिती कुठून मिळाली गं तुला?’’
‘‘टी.व्ही.वर एक कार्यक्रम पाहिला होता.’’ ती विद्यार्थिनी लाजत म्हणाली.
‘‘बाई, दिल्लीमध्येही २६ जानेवारीला खूप कार्यक्रम होतात नं? मी टी.व्ही.वर पाहते दर वर्षी.’’ शेजारच्या बाकावर बसलेल्या एका मुलीनं कुतूहलानं सांगितलं.
‘‘हो तर! दिल्लीच्या राजपथावर दर वर्षी देशाच्या तीनही फौजा- सैन्यदल, नौदल आणि वायुदल यांची शानदार परेड असते. त्याचबरोबर विविध क्षेपणास्त्रे, रणगाडे असा शानदार सोहळा असतो. आपले राष्ट्रपती या सर्वाची मानवंदना स्वीकारतात.’’
‘‘बाई, वायुदलातील मिग विमानं, जेट्स, नौदलाची विमानं ही सर्व त्यांच्या हवाई कवायतींची किती देखणी प्रात्यक्षिकं करतात नं! हेलिकॉप्टर्समधून तर अखंड पुष्पवृष्टी होत असते.’’ तीच मुलगी पुढे म्हणाली.
‘‘तसंच आपल्या देशाच्या विविध राज्यांचे चित्ररथही तिथे असतात. त्यामुळे सगळ्यांना एकाच वेळेस आपल्या देशाच्या विविधतेमधील एकतेचे दर्शन घडते. आपल्या महाराष्ट्रालाही या चित्ररथाकरिता बऱ्याचदा पहिला क्रमांक मिळाला आहे. १९८० मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दर्शवणाऱ्या चित्ररथाला पहिल्यांदाच प्रथम क्रमांक मिळाला होता. गेल्या वर्षीही ‘पंढरीची वारी’ या आपल्या राज्याच्या चित्ररथाला सहाव्यांदा प्रथम क्रमांक मिळाला.’’
‘‘बाई, खूप छान वाटत असेल नं हे सगळं बघायला?’’ एकीनं विचारलं.
‘‘हो गं! सुदैवाने मला एकदा हा सोहळा प्रत्यक्ष पाहायला मिळाला होता. प्रत्येक भारतीयानं एकदा तरी प्रत्यक्ष पाहावा असा तो सोहळा असतो; अगदी डोळे दिपवून टाकणारा!’’
‘‘बाई, तुम्ही तो रेकॉर्ड केला असेलच नं?’’ खिडकीजवळ बसलेल्या एका मुलीनं विचारलं.
‘‘नाही गं! तेव्हा कुठले होते मोबाइल वगैरे. हल्ली सगळं खूप सोप्पं झालंय. बरं, आता २६ जानेवारीच्या निमित्ताने दरवर्षी काही पुरस्कार जाहीर होतात. कोणते-कोणते पुरस्कार, हे कोणी सांगू शकेल?’’ बाई म्हणाल्या.
‘‘विविध क्षेत्रे जसं- कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा याकरिता पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार जाहीर होतात.’’ एक मुलगी हात वर करत म्हणाली.
‘‘बाई, त्याचबरोबर अर्जुन आणि राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारही जाहीर होतात. २०१५ चा खेल रत्न पुरस्कार सानिया मिर्झाला टेनिसकरिता प्रदान केला होता. सध्या ती आणि मार्टिना हिंगिस मिळून वुमन्स टेनिस डबल्सचं मैदान मस्त गाजवत आहेत.’’ खेळांची आवड असलेल्या एका मुलीनं नव्या माहितीची जोड दिली.
‘‘बाई, अलीकडेच सचिन तेंडुलकरलाही भारतरत्न दिलं होतं नं?’’
‘‘हो, पहिल्यांदाच एका खेळाडूला भारतरत्न दिलं गेलं.’’ बाईंनी माहिती पुरवली.
‘‘बाई, गेल्या वर्षी पंडित मदन मोहन मालवीय आणि अटलबिहारी बाजपायी यांना भारतरत्न दिलं होतं.’’ मुलींना बरीच माहिती होती. बाईंना बरं वाटलं.
‘‘अगदी बरोब्बर. आणि इतिहासातलं पहिलं भारतरत्न दिलं होतं सी. राजगोपालाचारी, सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी.व्ही. रामन यांना. तुम्हाला माहीत आहे का, की एकंदर ४५ भारतरत्न मिळालेल्यांपैकी फक्त ५ स्त्रिया आहेत. पण आता सगळ्याच क्षेत्रांतील स्त्रियांचे वर्चस्व पाहता ही संख्या इथून पुढे नक्कीच वाढेल यात शंका नाही!’’
‘‘बाई, याच वेळी अशोक चक्र, वीर चक्र, परमवीर चक्र, सेना-नौसेना-वायुसेना मेडल्स, शौर्य मेडल्सही दिली जातात. २६ जानेवारीच्या परेडच्या सुरुवातीला आपले पंतप्रधान इंडिया गेट येथील अमर जवान ज्योतीला फुलांचा हार वाहून शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर राष्ट्रपती आपला राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गायलं जातं. मग राष्ट्रध्वजाला बंदुकीच्या २१ फैरी झाडून मानवंदना दिली जाते.’’ एक विद्यार्थिनी म्हणाली. तिचा मोठा भाऊ नौदलात, गोव्याला तैनात होता.
‘‘अगदी बरोबर! बरं, आता मला सांगा, गेल्या वर्षीच्या २६ जानेवारीच्या परेडचं विशेष आकर्षण काय होतं?’’ बाईंनी विचारलं.
‘‘बाई, ‘नारीशक्ती’ हे मुख्य आकर्षण होतं. सशस्त्र सैन्याच्या तीनही दलांची परेड करणाऱ्या सर्व स्त्रिया होत्या आणि स्त्री-अधिकाऱ्यांनी ती संचलित केली होती.’’ शेवटच्या बाकावर बसलेल्या एका मुलीनं मोठय़ा अभिमानानं सांगितलं.
‘‘कॅप्टन दिव्या अजित, स्क्वॉड्रन लीडर स्नेहा शेखावत, लेफ्टनंट कमांडर संध्या चौहान यांनी अनुक्रमे सैन्यदल, वायुदल आणि नौदल यांच्या परेडचं संचलन करून आपल्या देशाच्या नारीशक्तीचं दर्शन घडवलं. त्याचप्रमाणे माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या सशस्त्र दलाच्या स्त्री-योद्धय़ांच्या चित्ररथाने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलं.’’ बाईंनी अजून तपशील दिला.
‘‘बाई, गेल्या वर्षी आपण राणी लक्ष्मीबाई यांची शौर्यगाथा नाटक रूपात सादर केली होती. मग या वर्षी काय करायचं २६ जानेवारीला?’’
‘‘माझा असा विचार होता की, या वर्षी आपण लेझीमच्या प्रात्यक्षिकांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करूया. प्रत्येक प्रांत जसं- महाराष्ट्र, तामिळनाडू, बंगाल, पंजाब यांचे पोशाख परिधान करून लेझीम नृत्यातून आपण राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देऊ या. आपल्याला साथ करायला आपल्याच संस्थेच्या ज्युनियर कॉलेजमधल्या मुलींचं ढोल-ताशे पथकही येणार आहे.’’
‘‘मस्त कल्पना आहे बाई.’’ पहिल्या बाकावर बसलेली एक मुलगी म्हणाली.
‘‘तुमच्या वर्गातल्या मुली लेझीमच्या राज्यस्तरीय स्पर्धा यापूर्वीही अनेक वेळा जिंकून आल्या आहेतच. त्यामुळे तयारीला दिवस जरी कमी उरले असले, तरी आपल्याला हा कार्यक्रम यशस्वी करायचा आहे.’’
‘‘हो बाई!’’ सगळ्या मुली एकाच सुरात म्हणाल्या. बाईंनी मग लेझीमच्या तयारीसाठी मुलींची निवड केली.
‘‘बाई, या वर्षी प्रमुख पाहुणे कोण आहेत? गेल्या वर्षी आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी- स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा देसाई आल्या होत्या नं? किती सुंदर भाषण केलं होतं त्यांनी!’’
‘‘या वर्षी शैलाताई देशमुख येणार आहेत. शैलाताई आपल्या गावातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात मुलींच्या शिक्षणासाठी खूप कार्य करत आहेत. त्यांनी मुलींसाठी कितीतरी शाळा, कॉलेज सुरू केली आहेत. ‘मुलगी सक्षम तर देश सक्षम’ हे तर शैलाताईंचं घोषवाक्यच आहे. विशेष म्हणजे त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी राष्ट्रपतींकडून त्यांना सन्मानितही केलं गेलं आहे. त्यादेखील आपल्याच संस्थेच्या माजी विद्यार्थिनी आहेत.’’ बाई अभिमानानं सांगत होत्या.
‘‘आणि हो! त्यांचं स्वागत करण्यासाठी गेल्या वर्षी बारावीला, कला शाखेतून राज्यात पहिल्या आलेल्या, आपल्याच कन्याशाळेच्या राधा दिवटेला आपण बोलावणार आहोत. आणि तिचाही सन्मान करणार आहोत.’’ बाई पुढे सांगत होत्या. हे ऐकून सगळ्याच मुलींच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं हसू उमटलं. कारण राधा दिवटे ही ऊस तोडणी मजुराची मुलगी होती. खूप अवघड परिस्थितीतून शिक्षण घेत ती इथवर पोहोचली होती. शाळा दरवर्षी २६ जानेवारीला अशा गुणी विद्यार्थिनींचा सन्मान करत असते आणि त्यांना पुढील शिक्षणाकरिता मदतदेखील करत असते.
‘‘चला तर मग!’’ बाई एकदम म्हणाल्या, ‘‘तालीम करायची नं सुरू? थोडेच दिवस उरले आहेत आता २६ जानेवारीला..’’ असं म्हणत बाई मुलींना घेऊन लेझीमच्या तालमीसाठी मैदानावर निघाल्या.
प्राची मोकाशी – mokashiprachi@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा