प्राची मोकाशी

mokashiprachi@gmail.com

‘‘आई, जय येणार आहे. आम्हाला स्टॉलसाठी लागणारं थोडं सामान आणायचंय.’’ आईजवळ पैसे मागताना यश म्हणाला. त्यांच्या सोसायटीमध्ये दोन दिवस फन फेअर होणार होती. सोसायटी खूप मोठी असल्यामुळे दरवर्षी त्यांची फन फेअरही एकदम जंगी असायची. फन फेअरला बाहेरून स्पॉन्सरही खूप मिळायचे. त्यामुळे सोसायटीतील लोकांना अगदी माफक किमतीमध्ये त्यांचे स्टॉल लावता यायचे. यंदा यश आणि जयने मिळून स्टॉल लावला होता.

‘‘काल गेम्सचा स्टॉल झाला! आता आज काय?’’ आईने यशला पैसे देताना विचारलं.

‘‘कोल्डिड्रक्स आणि मॉकटेल्स.’’

‘‘अरे व्वा! झाली तयारी?’’

‘‘बेसिक झालीये. फक्त अजून थोडे पेपर ग्लासेस वगैरे लागतील. म्हणून आम्ही मार्केटला जातोय आत्ता.’’

‘‘स्टॉलवर कोण आहे मग?’’

‘‘अक्षय आहे!’’

‘‘बरं, बरं. पळा आता! नाही तर उशीर होईल. स्टॉल वेळच्या वेळी सुरू व्हायला हवा!’’ इतक्यात दारावरची बेल वाजली. जय आला होता. आईने दिलेले पैसे यशने खिशात ठेवले, दोन-तीन मोठय़ा कापडी पिशव्या घेतल्या आणि दोघे धाड-धाड जिना उतरत बिल्डिंगमधून उतरले.

‘‘ए जय, हे बघ काय!’’ जिना उतरल्या-उतरल्या ब्रेकलागल्यासारखा थांबत यश म्हणाला. जयही गचकन थांबला.

‘‘पन्नासची करकरीत नोट!’’ जयने खाली वाकून ती नोट हातात घेतली. तिथून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना त्यांनी ती कोणाची नोट होती याची विचारपूस केली. पण कुणीच ते पैसे घेतले नाहीत.

‘‘कुणाचेच कसे नाहीत हे पैसे?’’ यश आश्चर्याने म्हणाला.

‘‘ज्याचे पडलेत त्याला समजलं नसेल घाईत.’’ – इति जय.

‘‘हिचं करायचं तरी काय?’’

‘‘वडापाव खायचा? किंवा आईस्क्रीम?’’

‘‘नंतर आईचा मारही खावा लागेल! फ्री, फ्री, फ्री! दुसऱ्याच्या पशांनी नको असलं काही. मन खाईल आपलं नंतर. आणि अक्षयला सोडून कसं खायचं?’’

‘‘मग काय करायचं?’’

‘‘आईबरोबर गेलो असताना एकदा आम्हाला असेच पैसे मिळाले होते. तेव्हा आईने ते एका देवळाच्या दानपेटीत टाकले होते.’’

‘‘मग तेच करूया नं! सोसायटीबाहेरच्या मारुती मंदिराच्या दानपेटीत टाकूया हे पैसे!’’ असं म्हणत जयने ते पन्नास रुपये त्याच्या खिशात व्यवस्थित ठेवले.

‘‘डन डना डन!’’ यशलाही आयडिया पटली.

जय आणि यश मारुती मंदिरापाशी पोहोचतात तोच त्यांना मंदिराबाहेरच एका डोंबाऱ्याचा खेळ दिसला. त्या डोंबाऱ्याने दोन पोल्सला दोरी बांधली होती. एक चार-पाच वर्षांची लहान मुलगी दोन्ही हातांमध्ये घेतलेल्या काठीच्या साहाय्याने स्वत:चा तोल सावरत त्या दोरीवर एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत चालत होती. डोंबारी मुलगा जमिनीवर ढोलकी वाजवत तिला प्रोत्साहन देत होता. काही लोक  तो खेळ बघायला तिथे जमा झाले. जय आणि यशही त्या गर्दीत सामील झाले. पाच-दहा मिनिटांचा खेळ झाल्यावर जमलेल्या गर्दीने त्या डोंबाऱ्याने जमिनीवर ठेवलेल्या डब्यात पैसे टाकले. जयही त्याच्या खिशात चिल्लर शोधू लागला. इतक्यात यशने त्याला थांबवलं.

‘‘काय झालं यश?’’

‘‘जय, आपण मंदिराच्या दानपेटीत टाकण्याऐवजी हे पन्नास रुपये यांना दिले तर? ते गरजू आहेत आणि आई म्हणते की गरजू माणसाला मदत केली तर ती देवाला प्रसन्न केल्यासारखीच असते.’’

‘‘बेस्टच!’’ जयने त्याच्या खिशातले ते पन्नास रुपये डोंबारी मुलाच्या हातात दिले. तो मुलगा त्यांच्याकडे क्षणभर बघतच राहिला. मग कृतज्ञतेने त्याने ते पैसे घेतले. आपल्याकडून काहीतरी चांगलं काम झाल्यामुळे यश आणि जय आता भलतेच आनंदात होते..

‘‘काय मुलांनो, देणार का आम्हाला एखादं कोल्डिड्रक?’’ यशची आई त्यांच्या स्टॉलवर येत म्हणाली.

‘‘आई, तू आजची आमची पहिलीच कस्टमर आहेस! लोक  अजून जमताहेत हळूहळू. सांग, काय देऊ? पेप्सी, फॅंटा, ब्लू-लगून की व्हर्जनि मोहितो?’’

‘‘किमती कशा आहेत सगळ्यांच्या?’’

‘‘कुठलंही कोल्डिड्रक वीस रुपये. मॉकटेल पस्तीस रुपये!’’

‘‘मला एक ब्लू लगून दे!’’

‘‘काकू, तुला फ्री आहे!’’ जय म्हणाला.

‘‘अंहं! मी पण गिऱ्हाईक आहे. पैसे घेणार असाल तरच तुमचं कोल्डिड्रक घेते मी!’’

‘‘ओक्के!’’ म्हणत जय ब्लू लगून तयार करू लागला आणि यशने हिशेबाच्या वहीत त्यांची पहिली नोंद केली.

‘‘मुलांनो, तुम्ही दोघांनी त्या डोंबाऱ्यांना मदत केलीत त्याबद्दल अक्षयची आई आत्ता भेटल्यावर तुमचं कौतुक करत होती.’’ यशची आई दोघांना उद्देशून म्हणाली.

‘‘खरंच?’’ आईचं हे बोलणं ऐकून यशचे डोळे एकदम लकाकले.

‘‘पण तिला कसं समजलं?’’ आईचा प्रश्न.

‘‘आम्हीच सांगितलं अक्षयला!’’ यश सहजपणे म्हणाला.

‘‘अजून कुणाकुणाला सांगितलंत?’’

‘‘आमच्या सगळ्या ग्रुपला माहिती आहे!’’

‘‘मग आमच्या मत्रिणी आणि तुमच्या बाबांच्या मित्रांना पण सांगितलंत? आजी-आजोबांच्या ग्रुपला? आणि मामा, मामी, जयचे काका-काकू..’’

‘‘असं का म्हणतेस आई?’’ यशला आईच्या बोलण्याचा रोख समजेना.

‘‘आपण कुणाला मदत केली हे सगळ्यांना समजलंच पाहिजे का?’’ आई थोडय़ा चढय़ा आवाजात म्हणाली.

‘‘का नको? ही तर चांगली गोष्ट आहे नं काकू?’’ जयही बुचकळ्यात पडला.

‘‘मुलांनो, मदत करून त्याची जाहिरात केली तर त्या मदतीचा हेतूच मुळी नष्ट होतो. जर मदत घेणाऱ्याने कुणाला सांगितलं किंवा कुणाला आपोआप ते जर समजलं तर ती गोष्ट वेगळी. पण आपणहून त्याची जाहिरात करायची नसते.’’

‘‘आई, पण अशी मदत सगळ्यांनी करावी म्हणून आम्ही..’’

‘‘चूक! मदतीची भावना ही ज्याची त्याच्याजवळ; इतकी की एका हाताने केलेलं दान दुसऱ्या हाताला समजता कामा नये. मुळात तुम्ही केलेली मदतही तुमच्या स्वत:च्या पशांतून नव्हतीच. वाटेत मिळालेली एक पन्नास रुपयांची नोट देवळात न टाकता विचार करून तुम्ही त्या गरजू मुलांना दिलीत, ठीक आहे! पण त्यात तुमचं कर्तृत्व काय? समजा काल आणि आज कमावलेल्या पशातून तुम्ही कुणाची मदत केलीत तर ती तुम्ही केलेली खरी मदत ठरेल. पण त्याची वाच्यता व्हायलाच नको. समजलं?’’

‘‘काकू, असा विचार आम्ही केलाच नाही.’’ थोडय़ा अवधीने जय ओठांचा चंबू करत म्हणाला.

‘‘आई, आलं लक्षात तुला काय म्हणायचंय ते. आम्ही पुन्हा असं नाही करणार. एकदम सॉरी!’’ यश खजिलपणे म्हणाला. एव्हाना आईचंही ब्लू लगून पिऊन झालं होतं. तिने यशला पैसे दिले आणि दोघांच्या डोक्यावर हलका टप्पू मारत ती तिथून निघून गेली. इथे दोघे विचारात पडले. सकाळी झालेल्या आनंदातला फोलपणा आता त्यांना जाणवत होता..

‘‘किती जमले दोन्ही दिवसांचे मिळून?’’ जयचा प्रश्न. रात्रीचे दहा वाजून गेले होते. फन फेअरचे दोन दिवस संपले होते. स्टॉलवर आता दोघेच होते.

‘‘एक हजार चाळीस!’’

‘‘आता बसून जमा-खर्च मांडला पाहिजे!’’

‘‘जय, चांगला अनुभव मिळाला नं?’’

‘‘डेफिनेटली! यश, काय करूयात या पशांचं?’’

‘‘तूर्तास तरी आपापल्या पिगी बॅंकमध्ये ठेवू. मग ठरवू! काय?’’ स्टॉलचं सगळं सामान आवरून होईपर्यंत साडे-दहा वाजून गेले होते. दोघे बोलत घराच्या दिशेने जाताना यशला सोसायटीच्या गेटबाहेर एक लहान मुलगा आणि मुलगी भीक मागताना दिसले. ते दोघं येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांकडे जेवणासाठी पैसे मागत होते. यशने जयचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं. त्या मुलांची अवस्था पाहून दोघांना त्यांची कणव आली. दोघांनी स्वत:कडले वीस-वीस रुपये त्या मुलांना प्रत्येकी दिले. त्या दोघांचे आभार मानून ती मुलं तिथून निघून गेली. दोघे पुन्हा सोसायटीमध्ये शिरले.

‘‘यश, सकाळी ते डोंबारी आणि आता ही मुलं! आजचा दिवसच वेगळा आहे नाही?’’

‘‘त्याला पैसे देतानाचे आपण आणि आत्ता या मुलांना पैसे देतानाचे आपण.. वेगळे आहोत का रे?’’

‘‘डेफिनेटली! सकाळपेक्षा त्यांना आत्ता पैसे देताना जास्त छान वाटलं की नाही?’’

‘‘हो रे! पण या वेळी कुठे बडबड नको याची. आपली चूक सुधारायला लगेच चान्स मिळालाय आपल्याला!’’

‘‘घरी सांगू या नं?’’

‘‘हो! पण इतर कुणाला नको.’’

‘‘यश, जमा-खर्च मांडताना हे चाळीस रुपये कुठे मांडायचे?’’

‘‘अर्थातच- नफा! कारण आत्ताचं देणं फक्त पोकळ आनंद नव्हता, तर एक वेगळं समाधान होतं.’’

‘‘खरं तर कुठल्याही हिशेबापलिकडलं! करेक्ट?’’

‘‘एकदम करेक्ट!’’ आणि दोघांनी एकमेकांना हाय-फाईव्ह दिला.

देणाऱ्याचे हात आता परिपक्व  झाले होते..