‘‘कुत्ते कमीने.. मैं तेरा खून पी जाऊंगा’’असे धमेर्ंद्रने गब्बरसिंगला म्हटले म्हणून भारतातील तमाम कुत्रे आमच्या भावना दुखावल्या म्हणून रस्त्यावर टोळ्या-टोळ्यांनी येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांवर भुंकत असतात. पाठलाग करत असतात.

भारतीय कुत्रे तसे साधे. त्यांना आपण रस्त्यावरचे कुत्रे (स्ट्रीट डॉग) असे म्हणतो. दत्तगुरूंच्या फोटोत हमखास दिसणारे तसेच मल्हारी खंडोबाच्या चित्रात राक्षसाला चावा घेणारा कुत्राही दिसतो. या दोन्ही दैवतांना कुत्रा प्रिय होता असे म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या शिवाजी महाराजांचा ‘वाघ्या’ कुत्रा इतका इमानी होता की त्याचे गडावर समाधी-शिल्पदेखील आहे. मुंबई-ठाण्यातील पालकांना जंजिर नावाचा कुत्रा व त्याचे कार्य माहीत असेलच. पोलिसी कुत्रे आपले खरे संरक्षक सोबती आहेत. तरीदेखील भारतात ‘कुत्ते कमीने’ म्हणून डायलॉग आल्यावर भावना भडकणार नाहीत तर काय? असो.

आपले शाहू महाराज शिकारीला निघताना होऊंड जातीचे कुत्रे घेऊन जायचे. हे फोटो व शिकारीच्या लघुचित्रात दिसतं. असेच केवळ कुत्र्याचे मुघलकालीन लघुचित्र या इथं पाहायला मिळतं. त्याची शेपूट फारच छोटी आहे. एका लघुचित्रात एक संन्यासी उंच अशा कुत्र्यावर बसून चाललाय. बहुतेक तो ग्रेट-डेन जातीचा असावा. आधुनिक चित्रकार दिलीप रानडे यांनी कुत्रा आणि त्याचा मनुष्यमित्र यांच्यातील मूकसंवाद चितारलाय. मनजीत बावा यांनी देखील दात दाखविणारा कुत्रा चितारलाय. कुत्र्याला असे समोरून पाहणे फारच डेंजर. पण चित्र खूप वेळ पाहता येते. पुढील भागात विदेशी कुत्र्यांची चित्रं पाहूयात.

shreeniwas@chitrapatang.in

Story img Loader