ग्रीस देशातली प्राचीन काळची गोष्ट. अथेन्स नगरीत अलेक्झांडर नावाचा राजा राज्य करीत होता. तो कर्तबगार व पराक्रमी, पण काहीसा लहरी होता. एखाद्यावर कोणत्या कारणानं त्याची गैरमर्जी होईल याचा नेम नव्हता. राजाच्या वाढदिवसानिमित्त अथेन्स नगरीत कार्यक्रम आयोजित केले होते. त्यात मुष्टियुद्ध, कुस्त्या, भालाफेक, अश्वारोहण असे विविध क्रीडाप्रकार होते. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं.
अलेक्झांडरनं सरदार, मानकरी, नगरीतील प्रतिष्ठित यांच्याकरिता एका भव्य मेजवानी समारोहाचं आयोजन केलं होतं. आपापल्या अधिकाराप्रमाणे सगळे आमंत्रित स्थानापन्न झाले. स्वत: अलेक्झांडर प्रत्येकाचं अगत्यानं स्वागत करीत होता. शेवटी तो सरदार अब्रॅहमजवळ आला. अब्रॅहम हा स्वामीनिष्ठ सरदार होता. तो नि:स्पृह, प्रामाणिक आणि स्वभावानं निर्भीड होता. अडीअडचणीच्या प्रसंगी अलेक्झांडर त्याचा सल्ला घेत असे. अनेक तोंडपुज्या सरदारांना ते आवडत नव्हतं. ते अब्रॅहमचा द्वेष करीत. अलेक्झांडरनं अब्रॅहमला विचारलं, ‘‘आपली तब्येत बरी नाही का?’’
‘‘महाराज देवतेच्या आशीर्वादानं आणि आपल्या कृपेनं सगळं काही ठीक आहे.’’ अब्रॅहम म्हणाला.
‘‘मग आपण मेजवानीचा आस्वाद का घेत नाही?’’ अब्रॅहम काही उत्तर देणार तेवढय़ात सेनापती राजाकरिता स्वत: स्वादिष्ट पदार्थानी भरलेलं सोन्याचं ताट घेऊन आला आणि म्हणाला, ‘‘महाराज! आपण सकाळपासून प्रत्येकाची वास्तपुस्त करीत फिरत आहात. आपल्याला काही खाण्यापिण्याचीसुद्धा आठवण झाली नाही. आपल्या
खास आवडीचे पदार्थ मी जातीनं लक्ष घालून खानसाम्याकडून तयार करून घेतले आहेत. आपण त्यांचा आस्वाद घ्यावा.’’
राजाला भूक लागलेली होतीच. ताटातील वाफाळलेले गरमागरम पदार्थ पाहिल्यावर त्याची भूक अधिकच प्रज्वलित झाली. अलेक्झांडर आता भोजनाला सुरुवात करणार तोच इतका वेळ शांत बसून राहिलेला अब्रॅहम ताडकन उठला आणि त्याने राजाच्या हातातलं ताट खसकन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या धडपडीत ते ताट खाली पडलं. ताटातले सगळे पदार्थ जमिनीवर सांडले.
या प्रकारामुळे राजा कमालीचा संतापला. राजाचे शिपाई धावून आले. त्यांनी अब्रॅहमच्या मुसक्या बांधल्या आणि त्याला तुरुंगात नेऊन डांबलं. राजाचं काही तेवढय़ानं समाधान झालं नाही. थोडय़ाच वेळात शिपायांनी अब्रॅहमची पत्नी आणि दोन मुलांना आणून त्याच्याच कोठडीत डांबून टाकलं. अलेक्झांडरनं शिपायांना आज्ञा दिली. ‘‘या खादाड अब्रॅहमला आणि कुटुंबातील सगळ्यांना मिळून दररोज फक्त एकच ब्रेड देत जा.’’ राजाज्ञाच ती. शिपाई त्या आज्ञेचं काटेकोरपणे पालन करू लागले.
अब्रॅहमची पत्नी त्या एका ब्रेडचे चार भाग करायची. प्रत्येकाच्या वाटय़ाला एक लहानसा तुकडा यायचा. त्यामुळे ते चौघेही दिवसेंदिवस अशक्त होऊ लागले. ते पाहिल्यावर अब्रॅहम त्या तिघांना उद्देशून म्हणाला, ‘‘आपण सगळ्यांनी उपाशी राहून मरण्यापेक्षा आपल्यापैकी कोणीतरी एकानंच पूर्ण ब्रेड खावा. निदान ती व्यक्ती तरी जिवंत राहील.’’
त्या तिघांनाही अब्रॅहमचं म्हणणं पटलं. अब्रॅहम पुढे म्हणाला, या आपत्तीमुळेदेखील माझी स्वामीनिष्ठा अजिबात कमी झालेली नाही.’
अब्रॅहमच्या पत्नीला काही राहावलं नाही. ती म्हणाली, ‘राजेसाहेबांचे स्वामीनिष्ठ सेवक असल्याचे तुम्ही सांगता. मग त्या दिवशी तुम्ही राजेसाहेबांच्या हातातलं ताट का हिसकावून टाकलं?’ ‘अगंऽऽ! त्याला महत्त्वाचं कारण आहे. मला तहान लागली म्हणून मी मुदपाकखान्यात गेलो. तेव्हा सेनापती स्वयंपाक्याला राजेसाहेबांच्या ताटातल्या अन्नात विष मिसळायला सांगत होता. ते मी ऐकलं आणि ठरविलं, कोणत्याही परिस्थितीत राजेसाहेबांना त्या ताटातले पदार्थ खाऊ द्यायचे नाहीत. राजेसाहेब ते पदार्थ खाणार तोच मला झडप मारून ते ताट हिसकावून घ्यावं लागलं. त्यामुळे पदार्थ जमिनीवर सांडले. शिपाई मला पकडून नेत होते. त्या वेळी मी मागे वळून पाहिलं तेव्हा राजेसाहेबांचा आवडता कुत्रा ते पदार्थ खात होता. बहुधा तो त्या पदार्थामधील विषानं मेला असावा.’
‘‘असा होता त्या मेल्या दुष्ट सेनापतीचा डाव?  बरं झालं तुम्ही त्याचा डाव हाणून पाडला ते.’’ अब्रॅहमची पत्नी म्हणाली.
‘‘बरंऽऽ! मी यापुढे ब्रेड खाणार नाही, असं ठरवलंय. मी आनंदाने मृत्यूला सामोरा जाईन. मी तुमच्यापेक्षा वयानं मोठा आहे. मी खूप सुख उपभोगलं आहे. आता तो तुमचा अधिकार आहे.’’ अब्रॅहमची पत्नी थोडीच मागे राहणार. ती म्हणाली, ‘‘हीच का तुम्ही माझ्या प्रेमाची पारख केलीत? मीही तुमच्या सगळ्यांच्या आधी देवाकडे जाऊन त्याच्याजवळ तुमची तक्रार करणार आहे. त्याकरिता मीदेखील उपाशीच राहायचं ठरविलं आहे. मी ब्रेड खाणार नाही.’’
त्या चौघांचंही संभाषण शिपायांनी ऐकलं. त्याचं मन हेलावलं. त्यांनी राजाला ती हकीकत सांगितली. त्या प्रसंगानंतर आपल्याला आपला कुत्रा दिसला नाही, हे राजाच्या लक्षात आलं. राजाच्या मनात सेनापतीविषयी संशय निर्माण झालेला होताच. राजानं सेनापतीला अटक केली. सेनापतीनं गुन्हा कबूल केला. राजानं अब्रॅहमची सन्मानानं सहकुटुंब मुक्तता केली आणि त्याचा दरबारात सत्कार केला. त्याला कृतज्ञतापूर्वक सोन्याचा रत्नजडित ब्रेड  भेट दिला.
(ग्रीक कथेचा भावानुवाद)

Story img Loader