रावणाने सीतेचे हरण करून तिला लंकेत अशोकवनात राक्षसांच्या पहाऱ्यात डांबून ठेवले होते. रामलक्ष्मण सीतेला मुक्त करण्यासाठी लंकेकडे निघाले होते. रामाने वानरसेनेची मदत घेऊन रावणाशी दोन हात करून सीतेला मुक्त करण्याचा निर्णय घेतलाच होता, पण एक शिष्टाचार म्हणून युद्धापूर्वीची बोलणी करावी आणि सीतेलाही रामलक्ष्मणाचे कुशल कळवावे, या हेतूने श्रीरामाने अंजनीपुत्र हनुमानाला आपला दूत म्हणून लंकेला रावणाकडे पाठविले. हनुमान रावणाच्या भेटीला गेला तेव्हा रावणाला त्याला ठार मारावे अशीच तीव्र इच्छा झाली होती. पण कोणत्याही दूताचा वध करणे हे राजनीतीसंमत नाही, हे त्याला माहीत होते. हनुमानाचा प्रत्यक्षरीत्या वध करणे त्याला शक्य नव्हते. म्हणून पूर्ण विचारांती त्याने एक डाव आखला. एकीकडे हनुमानाची गंमत केली असे भासवायचे, पण अप्रत्यक्षपणे त्याचा वध करायचा. त्याची गंमत करण्यासाठी आणि वधाचा डाव पूर्ण करण्यासाठी रावणाने सेवकांना आज्ञा दिली की, ‘या हनुमानाच्या शेपटीला भरपूर चिंध्या गुंडाळा आणि त्यावर तेल टाकून पेटवून द्या.’
आज्ञा होताच रावणाच्या राक्षसगणांनी रावणाच्या महालातून काही चिंध्या गोळा केल्या आणि हनुमानाच्या शेपटीला गुंडाळू लागले. पण जसजसे ते चिंध्या गुंडाळू लागले तसतसा मारुती शेपटी अधिकाधिक लांब करतच निघाला. त्यामुळे चिंध्या गुंडाळल्यावर शेपटी उरतच असे. परत चिंध्या आणा, परत गुंडाळा, तरी परत शेपटी उरलीच. त्यामुळे परत चिंध्या आणा, परत गुंडाळा असं करता करता शेपटी एवढी लांब झाली की रावणाच्या महालातील सर्व चिंध्याच काय वस्त्रेही संपून गेली तरी शेपटी बाकी होतीच. शेवटी रावणाने त्याच्या स्वत:च्या वस्त्रभांडारातील वस्त्रे शेपटीला गुंडाळण्याचा आदेश दिला. ते खाली झाले तरीही व्यर्थ! शेपटीचा काही भाग उरलाच होता. शेवटी गुंडाळली गेलेली तेवढी शेपटी तेलात बुडवून पेटवण्याचा निर्णय घेतला गेला.
ते काही का असेना, पण तेव्हापासून एखाद्या बातमीची अगर घटनेची लांबी अवास्तव वाढवून सांगितली जात असेल. किंवा अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले जात असेल तर तिला मारुतीच्या शेपटीसारखे वाढणे, असे म्हटले जाते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा