तेजसला डिसेंबर महिना अतिशय आवडतो. कारण या महिन्यात त्याच्या शाळेत स्पोर्ट्स डे, गॅदरिंग, वेगवेगळ्या स्पर्धा असं खूप काही असतं. आणि महत्त्वाचं म्हणजे याच महिन्यात त्याच्या जिवश्चकंठश्च मित्राचा- ओजसचा वाढदिवस असतो. ओजसच्या वाढदिवसाला मोजक्याच मित्रमैत्रिणींना बोलावतात, पण त्याची बर्थडे पार्टी मात्र एकदम धमाल असते. कारण त्याच्या वाढदिवसाला फक्त केक, गाणी, नाच आणि खाऊ एवढंच नसतं, तर त्याची आई दरवर्षी काहीतरी नवीन खेळ खेळायला शिकवते. तो खेळही फक्त टाइमपास या कॅटॅगरीतला नसतो. मुलांची बुद्धिमत्ता, विचारशक्ती, निर्णयक्षमता या सगळ्याचा कस पाहणारा असतो. त्यामुळे तेजस आणि मित्रमंडळी ओजसच्या वाढदिवसाची आतुरतेने वाट बघत असतात.
या वर्षीही नेहमीप्रमाणे ओजसच्या वाढदिवसाचं आमंत्रण आलं आणि तेजस खूश झाला. वाढदिवसाच्या पार्टीला वेळेआधीच पोचला. फुगे लावायला, घर सजवायला त्याने ओजसच्या आई-बाबांना मदतही केली. पार्टीची वेळ झाली तसे एकेकजण यायला लागले. सगळ्यांना वेलकम ड्रिंक देऊन झाल्यावर ओजसच्या आईने खेळाची तयारी करायला सुरुवात केली. तिथे ओजस धरून एकूण सहा मुलं होती. आईने तीन तीन जणांचे दोन ग्रुप्स केले. एक ओजसचा आणि दुसरा तेजसचा ग्रुप. त्यांना एकमेकांकडे तोंड करून, पण एकमेकांपासून बऱ्यापैकी लांब अंतरावर बसवलं. मग जमिनीवर एका ग्रुपकडे तोंड करून चोवीस कार्डस आणि दुसऱ्या ग्रुपकडे तोंड करून चोवीस कार्ड्स मांडली. या कार्ड्सचा रेडीमेड स्टॅण्डच होता. त्या कार्ड्सवर काही कॅरेक्टर्सचे चेहरे होते, त्यांची नावंही खाली लिहिलेली होती. तसेच चेहरे असलेल्या कार्ड्सचा आणखी एक सेट होता. ती कार्ड्स पिसून तिने एकत्र केली आणि दोन्ही ग्रुप लीडर्सना त्यातून एकेक कार्ड काढायला सांगितलं. मग ओजस आणि तेजसने एकेक कार्ड काढलं आणि आपापल्या ग्रुप मेंबर्सना दाखवून आपल्या जवळच ठेवलं. ओजसची आई म्हणाली, ‘‘या खेळाचं नाव आहे ‘गेस हू’- ॅ४ी२२ ६ँ. आता प्रत्येक ग्रुपने एकमेकांना प्रश्न विचारून दुसऱ्या ग्रुपचं कार्ड कुठलं आहे ते ओळखायचं. पण एका वेळी एकच प्रश्न विचारायचा आणि त्या प्रश्नाचं उत्तर ‘हो किंवा नाही’ असंच देता येईल याची काळजी घ्यायची. समजा ‘त्या कॅरेक्टरचे केस काळे आहेत का?’ या प्रश्नाचं ‘नाही’ असं उत्तर असेल तर समोरच्या स्टॅण्डमध्ये काळे केस असलेली जी सगळी कॅरेक्टर्स असतील ती मिटून ठेवायची.’’
ओजसच्या आईने सांगितलेलं खरं म्हणजे कुणालाच फारसं कळलं नव्हतं, पण खेळायला सुरुवात केल्यावर कळेल असं म्हणून सगळ्यांनी मान डोलावली आणि हळूहळू खेळ चांगलाच रंगायला लागला. शेवटी प्रश्न विचारता विचारता ओजसच्या ग्रुपच्या स्टॅण्डमध्ये एकच कार्ड राहिलं, त्यावरून तर तेजसच्या ग्रुपकडे कोणतं कार्ड आहे ते त्यांनी ओळखलंच. या खेळात मुलांना इतकी मज्जा येत होती, की पुन्हा पुन्हा कार्ड्स शफल करून बराच वेळ सगळे हा खेळ खेळले. मग मात्र ओजसला अजून औक्षणसुद्धा करायचं राहिलंय याची आजीने आठवण करून दिली आणि सगळ्यांनी खेळ बाजूला ठेवला.
औक्षण, केक, खाऊ वगैरे सगळं आटोपल्यावर ओजसच्या बाबाने सांगितलं, ‘‘आम्हीपण असाच खेळ लहानपणी खेळायचो, पण त्यात ही अशी कार्ड्स वगैरे नव्हती. त्या खेळाचं नाव आहे ‘वीस प्रश्नांचा खेळ’ किंवा ‘३६ील्ल३८ ०४ी२३्रल्ल२ ॠंेी’. त्यात आपण जगातली कुठलीही प्रसिद्ध व्यक्ती मनात धरायची आणि दुसऱ्या टीमने ती व्यक्ती स्त्री आहे का, ती व्यक्ती जिवंत आहे का, तरुण आहे का.. असे कोणतेही, पण फक्त वीसच प्रश्न विचारून ओळखायची. हे प्रश्नही असे असले पाहिजेत की त्याची उत्तरं ‘हो किंवा नाही’ अशीच देता येतील. अचूक प्रश्न विचारून उत्तर ओळखण्यासाठी निरीक्षण, विचार, स्पष्टता, प्रश्न तयार करण्यातली अचूकता असे सगळेच गुण असावे लागतात.’’
ओजसच्या बाबाने सांगितलेला हा खेळही सगळ्यांना खूपच आवडला. पुन्हा भेटल्यावर तो खेळायचा आणि तो खेळण्यासाठी लवकरच पुन्हा भेटायचं असं ठरवून, ओजसला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन सगळे आपापल्या घरी गेले.
अंजली कुलकर्णी-शेवडे anjalicoolkarni@gmail.com