नेहमी सांगितलं जातं की, तुम्हाला सतत प्रश्न पडले पाहिजेत. काहीही ऐकताना, पाहताना, वाचताना, करताना.. अगदी तीन वर्षांच्या मुलासारखे- का? केव्हा? कधी? कुठे? कसं? कुणी? कुणाला? यांसारखे प्रश्न विचारत राहा; म्हणजे आपोआपच तुम्हाचा बौद्धिक, सामाजिक, मानसिक विकास होत राहील. हे सारं पूर्ण सत्य आहे. जे हे जाणीवपूर्वक करतात ते यशस्वी होतातच. पण.. हा पण खूप महत्त्वाचा आहे. तो सतत आढळतो म्हणूनच त्याबाबत इथे लिहावंसं वाटलं.

प्रश्न विचारणं ही चांगली सवय म्हणून काहीजण विनाकारण प्रश्न विचारत जातात. आपल्याला प्रश्न पडतात म्हणजे आपण अभ्यासू आहोत असा आभास निर्माण करण्यासाठीचा तो एक प्रयत्न असतो. पण या प्रयत्नामुळे ते बापुडवाणे नि हास्यास्पद ठरतात. विनाकारण प्रश्न विचारणे हा इतरांच्या चेष्टेचा विषय ठरू शकतो. या लोकांवर ‘बाळबोध’ असा शिक्का बसल्यावर मग त्रागा करून काही फायदा नसतो. तर काहीजण इतरांना उघडे पाडण्यासाठी प्रश्न विचारायचं नाटक (?) करतात. शेंडा ना बुडखा असे प्रश्न विचारून वर्गात शिकवणाऱ्या शिक्षकाला नाहक त्रास देणारे याच वर्गवारीत येतात. किंवा समूह-अभ्यासात असे प्रश्न विचारून इतरांना अभ्यासात अडथळा करणारेही यातले. तेव्हा मित्रांनो, तुम्ही जर अशी सवय असेल तर वेळीच ती घालवून टाका नि पहिली सवय विकसित करा. ती- अचूक प्रश्न विचारायची. दुसरं म्हणजे प्रश्न हा कोणावर ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी नको तर स्वत:ला विकसित करण्यासाठी असावा. प्रश्नाचं उत्तर इतरांनी देण्याची अपेक्षा बाळगण्यापेक्षा ते स्वत: शोधण्याचा प्रयत्न करा. गरज असेल तेव्हा योग्य ती व्यक्ती (पालक, शिक्षक, मित्र) किंवा साधन (पुस्तक, मोबाइल, लॅपटॉप) यांची मदत घ्या.

खरंच एकदा करून तर बघा! एखादा प्रश्न स्वत:ला विचारा, त्याबाबतची माहिती गोळा करा आणि उत्तराप्रत पोहोचा. तयार उत्तरापेक्षा असं उत्तर मिळायला कदाचित वेळ लागेल; पण या सगळ्यामधून वाढलेली तुमची सहनशीलता, तुम्ही दाखवलेली चिकाटी, विस्तारलेला सामाजिक परीघ, विचारांना फुटलेले पंख आणि सरतेशेवटी मिळालेली आत्मिक शांती अवर्णनीय असेल. तेव्हा आता लगेचच एखादा प्रश्न विचारून मोकळं व्हा बरं!

मेघना जोशी joshimeghana.23@gmail.com

Story img Loader