शुभांगी चेतन

shubhachetan@gmail.com

मी लहान होते तेव्हा माझ्या घरापुढे मोठं अंगण होतं.. अंगण म्हणजे मोकळी जागा. आजूबाजूच्या सर्वच घरांना तसं अंगण होतं, मोठ्ठं आणि मोकळं. त्या प्रत्येक अंगणात जणू त्या घराचंच असल्यासारखं एक झाड. पिंपळ, गुलमोहर, जांभूळ, लाल चाफा आणि बरीच. माझ्या अंगणात गुलमोहर होता. उन्हाळ्यात सुंदर लालबुंद बहरायचा. हळूहळू त्याची एक एक पाकळी खाली पडायची. माझ्या प्रत्येक पुस्तकात याची पाकळी असायची.

तुमच्या घराच्या, शाळेच्या आवारात आहेत झाडं? कधी निरखून पाहिलंय त्यांना? नसेल तर यानंतर त्यांच्यासोबत मैत्री करू या. खरं तर केवळ झाडंच नाहीत तर संपूर्ण निसर्गच आपला मित्र असतो. झाडं, माती, डोंगर-दऱ्या, फळं, फुलं, नदी, ओढे हे सारे मित्रच. मला नेहमीच वाटतं, यांच्यासोबत मैत्री झाली ना, की ती अखंड सोबत राहते. निसर्गाला पाहणं, त्यातले सूक्ष्म (लहान) बदल अनुभवणं यातून आपणही वाढत असतो. निसर्गात होणाऱ्या या बदलांचं निरीक्षण करणं हा एक सोहळाच असतो.  आनंदाचा, अभ्यासाचा, जाणून घेण्याचा, स्मरणात ठेवण्याचा एक वेगळा उत्सव!

अजूनही हवा तशी चांगली आहे. फार उकाडा नाहीए आणि हलका गारवा आहे. झाडांची पानगळ सुरू आहे. त्यामुळे मातकट रंगाची, चॉकलेटी रंगाच्या विविध छटा असलेली पानं तुम्हाला अवतीभवती दिसतील. आपण त्याच पानांसोबत आणि इतरही घटक सोबत घेऊन एक छान मुखवटा कसा तयार करता येतो हे आज पाहणार आहोत. आपल्या घरी एखादा कार्यक्रम झाला की त्यासाठी आणलेली कागदी ताटं (पेपर प्लेट्स) असतात. रंग तर आहेतच, पण केवळ रंगच नाही तर आपल्याच आजूबाजूचा मूठभर निसर्ग आपण गोळा करून आणणार आहोत. एक कापडी पिशवी घ्यायची आणि मोहीम सुरू कारायची. राहता त्या इमारतीतच झाडं असतील तर एकटंच किंवा थोडं दूर जायचं असल्यास मोठय़ांसोबत जायचं. अनेक पानं, पिसं, फुलांच्या पाकळ्या, वाळलेल्या लहान काडय़ा गोळा करून आणायच्या. तुम्ही पाहिलं की कळेल, अनेक गोष्टी सापडतात. या गोष्टी गोळा करताना प्लास्टीकच्या पिशव्या दिसल्याच तर त्याही उचलून सुक्या कचऱ्याच्या डब्यात टाकायच्या. आपला परिसर तेवढाच स्वच्छ!

पिशवीतून हा खजिना घरी आणला की त्या कागदी थाळीवर तुम्हाला हवा तसा चिकटवा. आता तुम्ही मला म्हणाल की, मी कधीच कसं करायचं, कसं रंगवायचं का सांगत नाही? तर मुळातच आपण वेगवेगळे आहोत ना. मग आपलं चित्र आपण तयार करत असलेल्या कलाकृती आपण आहोत तशाच असायला हव्यात.. हो, तर मग चिकटवण्याचं काम झाल्यानंतर रंगकाम करू शकता. दोन्ही बाजूला दोरा लावून हा मुखवटा चेहेऱ्यावर मागे बांधता येईल. किंवा मग आईस्क्रीमच्या काठीवर चिकटवता येईल. काहीच नाही तर तो जपून ठेवता येईल, पुस्तकातल्या पाकळीसारखा!