आजी बाहेरून आली. दारात नेहमीप्रमाणे चपलांचा ढीग दिसत होता. परीक्षा संपल्यामुळे सगळी वानरसेना सध्या इथेतिथे बागडत होती. इतके शांत कसे काय बसलेत सगळेजण, आजी विचारात पडली. हॉलमध्ये वेगवेगळ्या ‘पोझ’ घेऊन मध्ये बसून सगळेजण काहीतरी लिहीत होते.
‘‘आजी, तूपण नं अगदी कमाल करतेस. आम्ही काही अभ्यास नाही करत आहोत. आम्हाला तीन बालनाटय़ं बघायची आहेत. आणि नंतर एसी बग्गीतून तळ्यावर फेरी मारायची आहे. आई पाठवणार आहे, पण त्यासाठी तिने अट घातली आहे, की रोज पाच ओळी शुद्धलेखन काढायचं. तेच आम्ही काढत बसलो होतो. माझं अक्षर कसं आलंय बघ ना!’’ रति लाडीगोडी लावत आजीला चिकटली.
‘‘छान आलंय, पण अजून छान येऊ शकेल हं. आपण असं करू या का? हे तुमचे सगळे नमुने बघून आपणच ठरवू अक्षर कसं काढायला हवं ते, चालेल?’’ – आजी.
‘‘आता ओळी कशा काढाल सांगा बघू?’’
‘‘आजी, वहीत ओळी काढलेल्या असतात.’’ ओंकारची शंका रास्त होती.
‘‘हो ते माहिती आहे मला. पण काढायची वेळ आली, कोरा कागद दिला तर चांगल्या ओळी काढता यायला हव्यात.’’
‘‘दोन ओळींमध्ये व्यवस्थित अक्षरं येतील असं अंतर हवं ना! शिवाय कागदावर वरपासून खालपर्यंत दोन ओळींतलं अंतर एकच हवं. कमी-जास्त होता कामा नये,’’ वैभवने नियम घालून दिले.
‘‘प्रत्येक अक्षर काढलेल्या ओळीला चिकटून काढावे, त्याला अधांतरी ठेवू नये, हँगरसारखं.’’ इति गौरांगी.
‘‘हँगरसारखं..’ विराजला हसू आवरेना.
‘‘दोन अक्षरं अगदी चिकटून काढू नयेत. या रति आणि गौरांगी बसल्या आहेत ना गळ्यात गळे घालून, तशी. त्यापेक्षा थिएटरमध्ये खुच्र्या कशा शेजारी-शेजारी असतात तशी अक्षरं काढायची. शेजारी, पण न चिकटता, न ढकलाढकली करता.’’ दोघी मैत्रिणींना वेगळंवेगळं करण्यासाठी विराजची मस्ती चालू झाली.
‘‘अक्षर खूप बारीकही काढायचं नाही. कारण ते नीट दिसत नाही आणि मोठ्ठं काढलं तर ओळींमध्ये मावत नाही,’’ रतिने स्वानुभव सांगितला.
‘‘समर्थ रामदासांनी ‘लेखनक्रिया निरूपण’ असा समास दासबोधात लिहिला आहे. म्हणजेच याचं किती महत्त्व आहे बघा. त्यात हीच गोष्ट सांगितली आहे. बहु बारीक तरुणपणी। कामा नये म्हातारपणी। मध्यस्त लिहिण्याची करणी। केली पाहिजे।’’ इति आजी.
‘‘आपल्या वैभवचं अक्षर किती छान आहे! वाटोळे, सरळ, मोकळे अगदी मोत्याच्या माळांसारखे तो लिहितो,’’ रतिने मनापासून दाद दिली. वैभवने लगेच कॉलर ताठ करून घेतली. विराजने त्याच्याकडे मोर्चा वळवत गुद्दा घातला.
‘‘शिवाय मात्रा, वेलांटय़ा, अनुस्वार बरोबर त्या त्या अक्षराच्या डोक्यावर आल्या पाहिजेत. वरच्या ओळीतले उकार आणि त्याच्या खालच्या ओळीतले रफार, मात्रा, वेलांटय़ा एकमेकांत घुसता कामा नयेत. रफाराला ‘आकुर्ली’ हा एक छान शब्द समर्थानी वापरलाय तो लक्षात ठेवा.’’
‘‘मी सुरुवातीला मस्त कोरून काढते, पण शेवटपर्यंत तसं अक्षर टिकत नाही गं माझं,’’ चित्रकला बोटात असलेल्या गौरांगीने सांगून टाकलं.
‘‘लिहिताना चुकलं तर तिथल्या तिथे गिरवत बसू नये. रबर असेल तर खोडावं नाहीतर सरळ काट मारून पुन्हा तो शब्द लिहावा, हा नियम आयुष्यभर लक्षात ठेवायचा हं.’’
‘‘अक्षर छान असलं की पेपर तपासताना बाईंनापण छान वाटेल ना.’’ रति कल्पनेत रममाण झाली.
‘‘केव्हाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत खाडाखोड न करता, स्वच्छ, नीट, सुरेख वळणदार अक्षरातला पेपर बघून मन प्रसन्न होते. लिहिणाऱ्याविषयी चांगलं मत, उत्सुकता निर्माण होते. पेपर न कंटाळता आवडीने शेवटपर्यंत वाचला जातो; खरं की नाही? ‘ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा। प्राणिमात्रास उपजे हेवा। ऐसा पुरुष तो पाहावा। म्हणती लोक। ज्याचं अक्षर सुंदर आहे त्या व्यक्तीला बघण्याचा मोह पडायला हवा. त्यासाठी लहानपणीच अक्षर चांगलं होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच तुमच्या आईनं रोज शुद्धलेखन काढायला सांगितलंय.’’
‘‘कधी घाईघाईत लिहिताना, अक्षरातल्या गाठी काढताना ‘ल’चा ‘ळ’ होतो, ‘भ’ चा म होतो, ‘र’ चा ‘व’ होतो, ‘न’ चा ‘त’ होतो आणि मग अर्थ केवढा तरी बदलतो. ‘काल’चा ‘काळ’, ‘भास’चा ‘मास’, ‘रंग’चा ‘वंग ‘नाक’च ‘ताक’ होतं.’’ वैभवने निरीक्षण नोंदवलं.
‘‘बरं का मुलांनो, ‘स्तोत्र मंत्रांचे विज्ञान’ या पुस्तकात असं लिहिलं आहे की, जर्मनीतल्या वैज्ञानिकाने एक प्रयोग केला. जगातील काही मुख्य भाषांची जी वर्णलिपी आहे तसे वर्णाक्षर स्टीलचा पोकळ पाइप वापरून तयार केले. त्यानंतर त्या पोकळ पाइपमधून एका बाजूने हवा आत सोडली तेव्हा दुसऱ्या बाजूने बाहेर येताना ‘स्स’ आवाज करीत ती बाहेर आली. फक्त आपल्या देवनागरी लिपीच्या बाबतीत बाहेर पडणारी हवा त्या वर्णाक्षराचा ध्वनी करीत बाहेर पडायची, म्हणजे ‘म’ असेल तर ‘म’, ‘स’ असेल तर स. आहे की नाही वैशिष्टय़पूर्ण, समृद्ध देवनागरी लिपी. मग ती छानच लिहायला हवी. ‘अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, बोलणे सुंदर, चालणे सुंदर’ व्हायला हवे. पण त्यासाठी समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘बालके बाळबोध अक्षर। घडसुनी करावे सुंदर। जे देखतांचि चतुर। समाधान पावती।’ स्वत: समर्थानी वाल्मिकी रामायणाची मूळ संस्कृत संहिता पंधराव्या वर्षी लिहून काढली होती. केशवस्वामी यांनी अठरा वेळा दासबोध लिहिला. ‘आधी केले मग सांगितले’ तसे आहे ना! मग आता चालू दे तुमचा घोटून घोटून शुद्धलेखन काढण्याचा सराव. लवकर आटपा, जायचंय नं एसी बग्गीत बसायला.’’
‘‘मी बग्गीत एकटा खिडकीत बसणार.’’ वैभवदादाच्या मांडीवर वेडय़ावाकडय़ा ओळी आखण्यात रमलेल्या विराजने जाहीर करून टाकले.’’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा