मेघना जोशी
‘‘आजी एक गोष्ट सतत सांगत असते, ज्यानं समाधान वाढतं.’’ रोहन सांगत होता. याआधी रोहननं सांगितलेल्या गोष्टी पटल्यामुळे किशोर लक्षपूर्वक ऐकू लागला. पण त्याच्या मनात शंका आली ती त्यानं लगेचच बोलून दाखवली.
‘‘कोणती गोष्ट? अवघड आहे का ती?’’
‘‘अवघड नाही, पण कोणत्याही गोष्टीची अवघड शिक्षा होऊ नये म्हणून असते ती.’’ रोहन म्हणाला.
‘‘असं कोड्यात बोलू नकोस रे, स्पष्ट सांग जरा.’’ किशोर.
‘‘अरे, कोड्यात नाही बोलत. थांब, तुला समजत नसेल तर सांगतो समजावून. आजी म्हणते, एकदम मोठ्ठी चूक झाल्यावर लक्ष देण्यापेक्षा छोट्या छोट्या चुका होऊ नयेत म्हणून काळजी घ्यावी. त्यावर बारीक लक्ष द्यावं.’’ रोहननं सांगितलं.
हेही वाचा : बालमैफल: नवचैतन्याचा पाडवा
‘‘अजूनही समजलं नाही.’’ किशोरच्या चेहऱ्याकडे पाहत रोहन म्हणाला, ‘‘आपण नाही का गणिताच्या उत्तरपत्रिकेत अनेक पायऱ्या सोडवत गणिताच्या उत्तरापर्यंत पोहोचतो. उत्तर चुकल्यावर प्रत्येक पायरीचा विचार करण्यापेक्षा आजी म्हणते, उत्तर लिहिताना प्रत्येक पायरीत चूक होऊ नये म्हणून बारीक लक्ष द्यायचं म्हणजे चुका होणारच नाहीत.’’ यावर किशोर लगेचच म्हणाला, ‘‘ते गणितात खरं आहे रे, बाकी आयुष्यात कसं काय वापरायचं.’’
‘‘अरे, हाच प्रश्न मी आजीला विचारला, त्यावर तिनं खूप छोटी छोटी उदाहरणं दिली. जसं की, रोज रात्री झोपण्याआधी दप्तर व्यवस्थित भरायचं म्हणजे मग शाळेत काही न्यायचं राहत नाही. नावडती भाजी जेवणाच्या सुरुवातीलाच थोडीशी खायची आणि हो, आजी माझ्याकडून कायम सायकलचे ब्रेक्स तपासून घेते. ती म्हणते, त्यामुळे कुठे थांबायचं ते कळतंच, पण किती वेगानं जायचं तेही कळतं. अख्ख्या सायकलपुढे ब्रेक्स ही छोटीशी गोष्ट आहे, पण आजीच्या म्हणण्याप्रमाणे ती खूप महत्त्वाची आहे.’’
‘‘अनेक छोट्या गोष्टींमध्येही खूप आनंद आहे असंही म्हणते आजी. इतरांना सहज केलेली मदत, इतरांशी हसून बोलणं, जाणूनबुजून कुणावर टीका न करणं, शारीरिक हालचाली करणं… अशी अनेक उदाहरणं आजी देते.’’ रोहन म्हणाला.
‘‘मीही अशा गोष्टी शोधून काढतो आता.’’ किशोर त्याच्याशी सहमत होत म्हणाला.
मोबाईल पूर्णपणे डिस्चार्ज होण्याआधीच तो चाजिर्गंला लावणं महत्त्वाचं असतं नाही का!
joshimeghana.23@gmail.com