आज रविवार असूनही रेणू बरोब्बर सकाळी सहा वाजता उठली. तशी तिला उशिरापर्यंत झोपायची मुळी सवयच नव्हती. कारण तिची रोज सकाळची आठची शाळा असायची. आणि सुट्टीच्या दिवशीसुद्धा तिचे बाबा तिला सकाळी सात वाजल्यानंतर कध्धीच झोपू द्यायचे नाहीत. त्यांचं नेहमी म्हणणं असायचं की, सकाळी लवकर उठलं की दिवस कसा मोठ्ठा मिळतो, खूप ताजंतवानं वाटतं आणि सगळी कामंही प्रसन्न मनाने होतात.
पण आज रविवारच्या मानाने मात्र रेणू खरोखरच लवकर उठली होती. तिने पांघरुणाची व्यवस्थित घडी करून ठेवली. पटकन दात घासले आणि धावतच ती बाल्कनीमध्ये गेली. तिच्या लाडक्या मोगऱ्याला भरपूर फुलं आली होती. तिला मोगऱ्याची पांढरीशुभ्र फुलं खूप आवडायची. म्हणून आई-बाबांनी तिला काही दिवसांपूर्वी तिच्या वाढदिवसाला मोगऱ्याचं एक रोप भेट दिलं होतं. रेणू त्याला नित्यनेमाने सकाळ-संध्याकाळ पाणी घालायची, नीट ऊन मिळतंय का ते पाहायची, त्याच्या कुंडीमध्ये खत घालायची, त्याची भरपूर काळजी घ्यायची. टपोऱ्या पांढऱ्या फुलांमुळे आज झाड खरंच खूप सुरेख दिसत होतं.
रेणू खूश झाली. ती उडय़ा मारत हॉलमध्ये आली. आई-बाबा, आजी-आजोबा चहा घेत, पेपर वाचत बसले होते. रविवार असल्यामुळे सगळेच एकदम निवांत होते.
‘‘बाबा, प्रॅक्टिस करायची?’’ रेणू उत्साहाने म्हणाली. आई रेणूसाठी दूध घेऊन आली.
‘‘अगं हो! दूध तर घेशील की नाही? आणि प्रॅक्टिस करायला सगळं आवरून बसायचं. गाणं ही विद्या आहे नं! मग असं पारोसं नाही बसायचं गायला.’’ बाबांनी समजावलं. रेणू दूध प्यायला टेबलापाशी बसली.
‘‘मला सांग रेणू, आजचा कार्यक्रम कशाकरता आहे गं?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘दोन दिवसांनी गुरूपौर्णिमा आहे नं, म्हणून.’’ रेणू पटकन म्हणाली.
‘‘अगं, पण गुरूपौर्णिमा म्हणजे काय?’’ बाबांनी विचारलं. रेणूला याबद्दल फारशी माहिती नव्हती. ती गेले दोन-तीन आठवडे फक्त ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम’, ‘गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम’ एवढा एकच जप करत होती. त्यामुळे घरच्यांनाही तिला याची माहिती करून द्यायचीच होती.
‘‘रेणू, पूर्वीच्या काळी म्हणजे हजारो वर्षांपूर्वी आपल्या देशात गुम्रू-शिष्य परंपरा होती. तुमच्या आज जशा टीचर्स असतात नं, ते म्हणजे तेव्हाचे गुरू आणि तुम्ही सगळी मुलं म्हणजे शिष्य. मुलं सात-आठ वर्षांची, म्हणजे साधारण तुझ्या वयाची झाली, की त्यांना त्यांच्या गुरूंकडे शिक्षणासाठी पाठवायचे. त्यांच्या या शाळेला ‘गुरुकुल’ असं म्हणायचे. आपलं घर सोडून शिक्षण संपेपर्यंत ते त्यांच्या गुरुजींच्याच घरी राहायचे. गुरुजी सांगतील ती सगळी कामं करायचे आणि त्याचबरोबर खूप अभ्यासपण करायचे. आपले गुरू आपल्याला खूप काही नवीन-नवीन शिकवतात, ज्ञान देतात म्हणून त्यांना ‘थँक यू’ म्हणण्यासाठी ‘गुरुपौर्णिमा’ साजरी करतात. महाभारत लिहिणाऱ्या महर्षी व्यासांना आपण श्रेष्ठ गुरूमानतो. म्हणून या पौर्णिमेला ‘व्यास पौर्णिमा’असंही म्हणतात. समजलं?’’ आजोबांनी सांगितलं. रेणू मन लावून ऐकत होती.
‘‘तुझ्या रूममध्ये तो श्रीकृष्णाचा फोटो आहे नं, त्याचे गुरू होते मुनी सांदिपनी. असं म्हणतात की, श्रीकृष्णाने त्यांच्या घरी लाकडेही वाहिली होती. एकदा कृष्णाला असं कळलं, की शंकासुर नावाच्या एका राक्षसाने सांदिपनींच्या मुलाला बरेच दिवस त्याच्याजवळ कैद करून ठेवलंय. गुरुदक्षिणा म्हणून मग त्याने त्या राक्षसाच्या कैदेतून सांदिपनी मुनींच्या मुलाची सुटका केली.’’ आजोबांनी पुढे माहिती दिली.
‘‘गुरुदक्षिणा म्हणजे काय आजोबा?’’ रेणूचा प्रश्न.
‘‘म्हणजे शिक्षण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी गुरुजींना दिलेली ‘फी’. पण ती पैशांच्या रूपांतच असायला लागत नाही.’’ बाबा म्हणाले.
‘‘तुला मध्ये मी अर्जुन-द्रोणाचार्याची गोष्ट सांगितली होती, आठवतंय?’’ आजीने विचारलं.
‘‘हो! आणि एकलव्याची पण!’’ रेणू म्हणाली. तिला आजीकडून गोष्टी ऐकायला खूप आवडायचं.
‘‘तर त्या गोष्टीमधले द्रोणाचार्य हे अर्जुनाचे गुरू होते, ज्यांनी त्याला धनुर्विद्या शिकवली. एकलव्यलाही त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकायची होती. पण ते एकलव्यला धनुर्विद्या शिकवायला तयार झाले नाहीत. तेव्हा एकलव्याने द्रोणाचार्याची एक मूर्ती बनवली, तिलाच गुरू मानलं आणि धनुर्विद्य्ोचं शिक्षण स्वत:च घेतलं. जेव्हा द्रोणाचार्याना हे समजलं तेव्हा ते घाबरले. कारण त्यांनी अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धर बनवण्याचं वचन दिलं होतं. गुरुदक्षिणा म्हणून मग त्यांनी एकलव्यचा अंगठा कापून मागितला, म्हणजे त्याला धनुष्य-बाण चालवताच येणार नाही.’’ आजी सांगत होती.
‘‘पण हे चुकीचं आहे!’’ रेणू कळवळून म्हणाली.
‘‘हो! चुकीचंच आहे. पण एकलव्यानेही कुठलाही विचार न करता त्याचा अंगठा कापून देऊन टाकला. म्हणून एकलव्याला एक श्रेष्ठ शिष्य मानतात. कधीकधी गुरूपेक्षा शिष्य श्रेष्ठ ठरतो, हे त्याचं उत्तम उदाहरण आहे.’’ आजी म्हणाली.
‘‘पण मग मलाही कुणी गुरू आहे?’’ रेणूचा निरागस प्रश्न.
‘‘तुझ्या टीचर्स, तुझे आई-बाबा, हे तुझे गुरूच आहेत की! कारण ते तुला वेगवेगळ्या प्रकारे ज्ञान देत असतात, शिकवत असतात.’’ आजोबा म्हणाले.
‘‘आणि आजी-आजोबासुद्धा! आजोबा दररोज तुझा अभ्यास घेतात. आजी तुला छान-छान गोष्टी सांगते, स्तोत्रं शिकवते, कविता शिकवते. गुरू कोणीही असू शकतो. संत ज्ञानेश्वरांचे गुरू त्यांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथ होते. आपली आजी वाचते नं त्या ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी निवृत्तिनाथांचं गुरू म्हणून वंदन केलंय.’’ आई म्हणाली.
‘‘मुळात लहान-मोठा, गरीब-श्रीमंत असा भेद न ठेवता, जो कोणी आपलं ज्ञान वाढवेल तो आपला गुरू. त्याला आपण मनातून नेहमी ‘थॅंक यू’ म्हणायचं. म्हणजे आपणही कधी गर्विष्ठ होत नाही.’’ बाबा म्हणाले.
‘‘तशी मग योगिता मावशीपण माझी गुरू आहे. ती मला गाणं शिकवते.’’ रेणू म्हणाली. योगिता मावशी म्हणजे रेणूच्या आईची बहीण.
‘‘आहेच मुळी! आपल्या योगिता मावशीनेच तर रेणूमधली संगीताची लय ओळखली आणि तिने गाणं शिकावं असा सल्ला दिला. आणि आज बघा आमची रेणू गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात स्टेजवर बसून एक अख्खं गाणंसुद्धा म्हणणार आहे.’’ आजी कौतुकाने म्हणाली.
‘‘हो! ‘मोगरा फुलला’. ज्ञानेश्वरांनी लिहिलंय नं? मला आई सांगत होती.’’ रेणू म्हणाली.
‘‘बरोब्बर! रेणू, जर तू मनापासून गाणं शिकलीस नं, तर अजून थोडी मोठी झालीस की तुला समजेल की हे तुझ्यासाठी किती उपयोगाचं आहे ते! तुझ्या बाबाला विचार की त्याला तबला पूर्ण शिकता आला नाही म्हणून किती वाईट वाटतं ते! लहानपणी खूप छान वाजवायचा तो!’’ आजोबा म्हणाले.
‘‘हो बाबा?’’ रेणूने आश्चर्याने बाबांकडे पाहिलं. बाबांनी होकारार्थी मान डोलावली.
‘‘पण हे गाणं का गाणार आहेस गं?’’ आजोबांनी मुद्दाम विचारलं.
‘‘योगिता मावशीने याच गाण्याची तयारी करून घेतली आहे.’’ रेणू म्हणाली.
‘‘अगं, परवा आषाढी एकादशी झाली नं, म्हणून तिने तुम्हांला हे गाणं शिकवलंय. मी तुला मध्ये चैत्र, वैशाख.. हे मराठी महिने शिकवले होते. तसंच अमावास्या-पौर्णिमा वगैरे काय असतं हेही सांगितलं होतं, आठवतंय? तर आषाढ महिन्याच्या एकादशीला खूप लोक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जातात. त्यांना वारकरी असं म्हणतात. आपण वारी पाहिली नं टी.व्ही. वर? आणि आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असं म्हणतात. हे सण तसे एकामागोमाग येतात. म्हणून मावशीने अशा प्रकारे कार्यक्रम आखला आहे आणि तुला हे गाणं गायला सांगितलंय.’’ आजी म्हणाली.
‘‘चला रेणू, आता पटापट आवरून घ्या बघू. आपण आता गाण्याची थोडी प्रॅक्टिस करू. मीपण आवरून घेतो.’’ बाबा म्हणाले. बाबा तिला घरी तबल्यावर साथ करायचे.
रेणू तडक उठली. तिने पटापट आवरून घेतलं. बाबांनी तिच्याकडून दोन-तीन वेळा गाण्याची पुन्हा प्रॅक्टिस करून घेतली. रेणूलाही आता स्टेजवर गाण्याचा धीर आला. दुपारी तिने मावशीसाठी पटकन एक ‘थॅंक यू’ कार्डपण बनवलं.
संध्याकाळी योगिता मावशीच्या सोसायटीच्या हॉलमध्ये कार्यक्रम होता. क्लासमधली मुलं, त्यांचे पालक आणि काही प्रेक्षक जमले होते. रेणूचे आई-बाबा, आजी-आजोबादेखील कार्यक्रमाला आले होते. सगळ्या मुलांनी अगदी मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने गाणी सादर केली. ‘देव माझा विठू सावळा’, ‘गुरु परमात्मा परेषु’, ‘अवघा रंग एक झाला’ अशी अनेक सुंदर गाणी सादर झाली. रेणूही छान गायली. गाताना दोन-तीन ठिकाणी चुका झाल्या तिच्या, पण योगिता मावशी सगळ्याच मुलांना गाताना मदत करत होती आणि सांभाळून घेत होती. कार्यक्रम एकदम छान पार पडला. बाहेर पडणाऱ्या रिमझिम पावसाने आणि मातीच्या सुवासाने वातावरण अजूनच भक्तीमय झालं होतं. कार्यक्रमानंतर मावशीने सगळ्यांसाठी ‘स्नॅक्स’ मागवले होते. सगळ्या मुलांना छोटंसं बक्षीस देऊन तिने त्यांचं कौतुक केलं. सगळे गेल्यावर रेणू योगिता मावशीच्या जवळ आली.
‘‘मावशी मला तुला काहीतरी गंमत द्यायची आहे.’’ आजीने बनवलेला घरातल्या मोगऱ्याच्या फुलांचा गजरा आणि कार्ड तिने पाठीमागे लपवलं होतं.
‘‘काय गं?’’ मावशी थोडी वाकून म्हणाली. रेणूने मावशीला कार्ड आणि गजरा दिला आणि मावशीला वाकून नमस्कार केला.
‘‘आ२२२! हा२२२! मस्त आहे गं!’’ मावशी फुलांचा वास घेत म्हणाली.
‘‘तू माझी गुरू आहेस नं, म्हणून तुझ्यासाठी आणलंय, स्पेशल.’’ रेणू म्हणाली.
‘‘थॅंक यू.’’ मावशी हसत म्हणाली.
‘‘मावशी, मी तुला गुरुदक्षिणा काय देऊ गं?’’ रेणू एकदम म्हणाली. मावशीला काही कळेना. आईने तिला सकाळची घरात झालेली चर्चा थोडक्यात सांगितली. मावशीला हसू आलं.
‘‘काही नको बेटा. आजच्या गाण्यात तू म्हणालीस नं- ‘इवलेसे रोप लावले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी..’’ मावशी म्हणाली.
‘‘हो!’’- इति रेणू.
‘‘तुम्ही सगळीच मुलं, त्या मोगऱ्याची लहान-लहान रोपं आहात, ज्यांना आम्ही स्वरांच्या संस्कारांनी घडवतो. मोगऱ्यासारखी जेव्हा तुमची कला बहरेल नं, तेव्हा मला माझी गुरुदक्षिणा आपोआपच मिळेल.’’ असं म्हणत मावशी हसली आणि तिने रेणूला जवळ घेतलं..
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com
मोगरा फुलला
आज रविवार असूनही रेणू बरोब्बर सकाळी सहा वाजता उठली. तशी तिला उशिरापर्यंत झोपायची मुळी सवयच नव्हती.
Written by प्राची मोकाशी
आणखी वाचा
First published on: 17-07-2016 at 01:03 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart touching inspirational story for children