स्कूल बस सोसायटीच्या गेटवर थांबली. जयनं बसबाहेर टुणकन् उडी मारली आणि धावतच तो सोसायटीत शिरला. आज शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे तो दुपारीच घरी आला होता. सकाळपासून धोधो पडणारा पाऊस आता थांबला होता.
सोसायटीतल्या रस्त्यावर भरपूर पाणी साचलं होतं. तसं ते दरवर्षी साचायचं. त्या साचलेल्या पाण्यात खेळायला जयला जाम मजा यायची. साधारणपणे अर्धा रस्ता पार केल्यानंतर जयला थोडय़ा अंतरावर त्या पाण्यात काहीतरी हलताना दिसलं. ‘पावसाच्या साठलेल्या पाण्यात कुठलाही प्राणी, जनावर असू शकतं’ हे आईनं त्याला अनेकदा बजावलं होतं, त्याची त्याला आठवण झाली. तो जरा घाबरला. थांबला. पण मग ‘बघू या थोडं जवळ जाऊन’ असं स्वत:शीच पुटपुटत तो पुढे सरसावला.
हलणारं ‘ते काहीतरी’ एका पक्ष्याचं पिल्लू होतं, पाण्यात गटांगळ्या खात होतं. जयनं वर पाहिलं. कदाचित झाडावरून पडलं असावं, असं जयला वाटलं. ते बुडू नये म्हणून जयनं पटकन् त्याला आपल्या ओंजळीत उचलून घेतलं, तसं ते शहारलं. उडायचा आटोकाट प्रयत्न करू लागलं. पण त्याला नीट पंखही फडफडवता येत नव्हते. जयनं अलगदपणे त्या पक्ष्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि अजून वेळ न दवडता तो धावतच पक्ष्याला घेऊन घरी आला.
‘‘कुठून आणलं हे?’’ जयच्या हातात पक्षी पाहून आईनं आश्चर्यानं विचारलं. आईचा आवाज ऐकून ताईही बाहेर आली. कॉलेजला सुट्टी असल्यामुळे ती आज घरीच होती.
‘‘कस्सलं गोड आहे नं पिल्लू!’’ जयला बूट काढायचे होते म्हणून ताई त्या पक्ष्याला हातात घेत म्हणाली.
‘‘आई, ते साचलेल्या पाण्यात सापडलं, गटांगळ्या खात होतं. बुडलं असतं बिचारं.’’ जय म्हणाला.
‘‘अरे बापरे! बरं झालं घरी आणलंस त्याला. नाहीतर मांजरानं वगैरे खाऊन टाकलं असतं.’’ आई विचार करत म्हणाली. त्या पक्ष्याला घरी आणून आपलं काही चुकलं नव्हतं हे ऐकून जयला एकदम हायसं वाटलं.
‘‘काय करायचं आता याचं?’’ जयनं कळकळीने विचारलं.
‘‘त्याच्या पंखाला जखम झालेली दिसतेय!’’ ताई त्याला निरखत म्हणाली.
‘‘ताई, तू त्याला बाल्कनीमध्ये घेऊन ये. तिथेच ठेवू त्याला. जय, तुझे नवे पावसाळी बूट आणलेत नं, तो बॉक्स घेऊन ये बरं. मी आंब्याच्या पेटीमधलं थोडं वाळलेलं गवत आणि कापूस घेऊन येते.’’ आई म्हणाली. जय बॉक्स घेऊन बाल्कनीमध्ये आला. आईसुद्धा गवत आणि कापूस घेऊन आली.
आईनं वरचं झाकण काढून बॉक्समध्ये गवत पसरलं, भरपूर कापूस ठेवला. छान मऊमऊ बिछाना तयार झाला. ताईनं अलगद त्या पक्ष्याला बॉक्समध्ये ठेवलं. ते लगेच उडण्याचा प्रयत्न करू लागलं. पण त्याला जमेना. तोपर्यंत आई एका वाटीमध्ये थोडं दूध घेऊन आली. ताईनं कापसानं त्या पिल्लाला थेंबथेंब दूध पाजलं. खरं तर ते खूप घाबरलं होतं. पण मग हळूहळू पिऊ लागलं. पोटात थोडं अन्न गेल्यामुळे त्याला आता तरतरी आली. ते अगदी बारीक आवाज करू लागलं. जय हे सगळं खूप निरखून बघत होता.
‘‘हे उडत का नाहीए अजून?’’ जय कुरकुरला.
‘‘प्रयत्न करतंय ते, पण जमत नाहीए त्याला. बहुतेक ते नुकतंच उडायला लागलं असणार आणि त्या नादात जखमी होऊन खाली पडलं असणार!’’ आईनं अंदाज बांधला.
‘‘जय, तिथे त्याच्यासारखा इतर कुणी पक्षी दिसला का रे?’’ ताईनं विचारलं.
‘‘नाही गं.’’ जय खांदे उडवत म्हणाला.
‘‘मला तर हा मुनिया वाटतोय. बघ नं, त्याच्या पंखांवर किती सुंदर पांढरे ठिपके आहेत आणि एक लालसर रंगाची झाकही दिसतेय.’’ ताईला पक्ष्यांबद्दल थोडीफार माहिती होती.
‘‘त्याला काही होणार तर नाही नं?’’ जयनं शंका व्यक्त केली. याचं उत्तर खरं तर कुणाकडेच नव्हतं.
‘‘आपण लक्ष ठेवू नं त्याच्यावर! डोंट वरी.’’ ताईने जयला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.
‘‘त्याला आपण मुन्नू म्हणायचं का? की झंप्या?’’ जयनं लगेच नावं सुचवली.
‘‘मुन्नू मस्त नाव आहे!’’ ताई म्हणाली.
‘‘जय, भूक नाही का लागली अजून? आम्ही पण थांबलोय जेवायचे.’’ आई नामकरणाचा समारंभ उरकता घेत म्हणाली.
‘‘हो! खूप भूक लागलीये!’’ जय पोटावरून हात फिरवत म्हणाला.
‘‘चला मग, युनिफॉर्म बदलून या! मी पानं घेते.’’ आई म्हणाली. तोपर्यंत ताईनं माळ्यावरून एक मोठी जाळीदार टोपली काढली आणि मुन्नूच्या बॉक्सवर पालथी ठेवली.
शाळेचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे अभ्यासाला अजून सुरुवात झाली नव्हती. मग दुपारभर जय मुन्नूचं निरीक्षण करत बसला. तो कसा दिसतो, कसा बघतो, मान कशी वळवतो, कसा ओरडतो.. सगळंच. मुन्नू पंख फडफडवण्याचा, उडण्याचा खूप प्रयत्न करत होता, पण अजूनही त्याला ते नीटसं जमत नव्हतं.
संध्याकाळी जयचे मित्र-मैत्रिणी त्याला खेळण्यासाठी बोलवायला आले, पण तो मुन्नू समोरून ढिम्म हलायला तयार नव्हता. उलट त्याला त्याच्या मित्र-मैत्रिणींनाच घरी बोलावून मुन्नू दाखवायचा होता. पण ताईनं त्याला समजावलं की इतकी माणसं पाहिली तर मुन्नू अजून घाबरेल. म्हणून जय त्यांना काहीच बोलला नाही. बाबा ऑफिसमधून आल्यावर मात्र त्यांना सगळं घडलेलं सविस्तर सांगण्याचा कार्यक्रम झाला.
‘‘काय जयराव? सहावीचा पहिला दिवस कसा होता?’’ बाबांनी चहा घेत शाळेबद्दल चौकशी केली. इतका वेळ विसरलेली शाळा जयला अचानकपणे आठवली.
‘‘छान होता.’’ तो म्हणाला.
‘‘वर्गशिक्षिका कोण आहेत?’’ इति बाबा.
‘‘गेल्या वर्षीच्याच साठेबाई.’’ जय म्हणाला.
‘‘ते इंग्रजीचं पुस्तक मिळालं का दुकानात?’’ बाबांनी विचारलं.
‘‘नाही. आलं नाहीये अजून.’’ जय म्हणाला.
‘‘बरं, बरं.’’ बाबा म्हणाले.
‘‘बाबा, आपण मुन्नूसाठी पिंजरा आणू या?’’ जयने अचानकपणे विचारलं.
‘‘नाही हं, जय! पक्षी वगैरे नाही पाळायचे!’’ आई पटकन म्हणाली. तिला पक्षी, प्राणी घरी पाळायला मुळीच आवडायचं नाही.
‘‘पण का? निधीकडे मांजर आहे, आर्यकडे कुत्रा आहे, त्या ओमकडेसुद्धा फिश टँक आहे. मग मी का नाही पाळायचं मुन्नूला? बाबा, प्लीज.’’ जय हट्ट करू लागला.
‘‘आई बरोबर म्हणतेय जय. पाळलेले प्राणी किंवा पक्षी अगदीच बिचारे वाटतात रे! कुत्री, मांजरं थोडं तरी इथे-तिथे फिरू शकतात. पण तेही मर्यादेतच. मासे आणि पक्षी तर अगदीच अडकल्यासारखे होतात, म्हणून नको.’’ बाबांचं म्हणणं ऐकून जय चिडला आणि पाय आपटतच त्याच्या खोलीत निघून गेला. थोडय़ा वेळाने ताई तिथे आली.
‘‘आइस्क्रीम?’’ तिने बाउल जयच्या पुढय़ात धरला.
‘‘चक्.’’ जयने बाउल ढकलला.
‘‘मी केलंय.’’ ताई हसून म्हणाली. जयनं तिच्याकडे पाहिलं आणि बाउल घेतला.
‘‘मुन्नूने काही खाल्लं?’’ जयनं काळजीनं विचारलं.
‘‘थोडं धान्य ठेवलंय त्याच्या बॉक्समध्ये. बघू खातोय का!’’ ताई म्हणाली. जय आइसस्क्रीम खाऊ लागला.
‘‘जय, सुट्टीतलं आठवतंय नं, आपण दहा-पंधरा मिनिटं आपल्या बििल्डगच्या लिफ्टमध्ये कसं अडकलो होतो ते!’’ ताई पुढे म्हणाली.
‘‘हो! आठवतंय.’’ जय म्हणाला.
‘‘तेव्हा तुझा जीव कसा घाबराघुबरा झाला होता.’’ ताईनं आठवण करून दिली.
‘‘मग? बंद दरवाजा, बाहेरचं काही दिसत नव्हतं, लाइट बंद, घामाघूम व्हायला होत होतं. घाबरणार नाही?’’ जय त्या विचारानंच अस्वस्थ झाला.
‘‘पण मी होते की तुझ्याबरोबर! आणि आपण मदतही मागितली होती. तोपर्यंत वेळ घालवायला म्हणून तुझ्यासाठी आपण नुकतंच आणलेलं चॉकलेट्स, चिप्स वगैरे मी तुला देतच होते. पण तुला या कशानंच बरं वाटत नव्हतं.’’ – इति ताई.
‘‘ती काय चॉकलेट खायची वेळ होती का? मी तर नुसतं देवाचं नाव घेत होतो.’’ जय चिडून म्हणाला.
‘‘म्हणजे तुला अगदी असहाय वाटत होतं, बरोबर? आणि नंतर मग लिफ्ट सुरू झाल्यावर कसं वाटलं?’’ ताईनं विचारलं.
‘‘एकदम बरं! सुटलोऽऽऽ असं झालं. पण तू हे सगळं का विचारतेयस?’’ जय कुरकुरला.
‘‘आता तुझ्या जागी मुन्नूचा विचार करून बघू. तो आज जखमी आहे, असहाय आहे. मग आपण त्याच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा, की त्याला मदत करायची? चांगलं खाऊ -पिऊ घालू, पण पिंजऱ्यात ठेवून तो आनंदी राहील का? आणि मुळात आपल्या मजेसाठी दुसऱ्याचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा आपल्याला कुणी हक्क दिला? तुला थोडा वेळ अडकून राहावं लागलं तर तू किती कासावीस झालास. आज मुन्नू तुझ्यासारखाच अडकलाय. त्याच्या मित्रांपासून खूप लांब आहे. तुला तुझ्या माणसांपासून तोडलं तर?’’ ताईनं जयला एक विचार देण्याचा प्रयत्न केला.
‘‘पण मग तू ती टोपली का उपडी ठेवलीस त्याच्या बॉक्सवर?’’ जयचा प्रश्न.
‘‘अरे, तात्पुरती. तो बरा व्हायच्या आधीच घाबरून उडून जाऊ नये म्हणून. नंतर ती काढून टाकायची आपण. घेऊ दे की पुन्हा त्याला आकाशात उंच भरारी.’’ ताई समजावत म्हणाली.
‘‘पण जमेल त्याला?’’ जयची शंका.
‘‘एका लहानशा जखमेनं जर त्यानं उडण्याचीच भीती मनात घेतली तर कसं चालेल? त्याला उडावं तर लागेलच नं? आपलंही असंच असतं की! तुला गणित अवघड जातं. गेल्या वर्षी सहामाहीला तुला कमी मार्क्स मिळाले. पण फायनलला चांगला अभ्यास करून छान मार्क्स मिळवलेस नं? गणिताची भीती मनात घेऊन बसला असतास तर?’’ ताई म्हणाली. जय विचार करत होता. ताई त्याच्याकडे शांतपणे पाहत होती.
‘‘ताई, तुझं म्हणणं पटलंय मला. मी असा हट्ट पुन्हा कधी करणार नाही. सॉरी.’’ जय थोडय़ा वेळानं म्हणाला.
‘‘मग नक्की सोडून द्यायचं नं मुन्नूला?’’ ताईनं मिश्कीलपणे विचारलं.
जय धावत बाल्कनीमध्ये गेला. मुन्नू टोपलीमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या पंखाची जखम बहुतेक बरी झाली होती. पण आता रात्रही खूप झाली होती. अंधारात तो हरवून जाईल, पुन्हा त्याला काहीतरी इजा होईल, म्हणून सगळ्यांनी त्याला सकाळी सोडून द्यायचं ठरवलं.
दुसऱ्या दिवशी लख्ख उजाडलं होतं. जय उठल्या उठल्या बाल्कनीत गेला. मुन्नूचा बाहेर पडण्याचा प्रयत्न सुरूच होता. जयने स्वत:हून टोपली उघडली, तसं मुन्नूनं त्याचे पंख फडफडत बाल्कनीबाहेर उंच भरारी घेतली आणि घरासमोरच्या झाडावर किलबिलाट करत मुक्तपणे खेळू लागला..
प्राची मोकाशी – mokashiprachi@gmail.com
घे भरारी
स्कूल बस सोसायटीच्या गेटवर थांबली. जयनं बसबाहेर टुणकन् उडी मारली आणि धावतच तो सोसायटीत शिरला.
Written by प्राची मोकाशी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-06-2016 at 00:24 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heart touching inspirational story for children with moral