सुट्टी संपून शाळा सुरू झाली आहे व त्याचबरोबर मस्त पाऊससुद्धा पडू लागलाय. उन्हाळ्याने सुकलेला निसर्ग पुन्हा एकदा हिरवागार व तजेलदार झालाय. ज्येष्ठ व आषाढ महिन्यांत धोधो पावसात सृष्टीची अनेक सुंदर रूपं आपल्याला आजूबाजूला दिसतात. सर्वात प्रथम आपल्या ‘डराव डराव’ संगीताने बेडूकमामा लक्ष वेधून घेतात! शहरांत आता त्यांची संख्या कमी झाली आहे; पण पोपटी, हिरवे, काळपट असे विविधरंगी बेडूक अजूनही काही ठिकाणी दिसतात. गावाकडे व रानांत झाडावर राहणाऱ्या बेडकांसहित इतर असंख्य जाती दिसतात.
मुसळधार पावसाबरोबर गुलमोहराची फुलं खाली पडून जमिनीवर छान शेंद्री रंगाचा सडा तयार होतो. सर्व झाडांच्या पानांवरील धूळ धुतली गेल्याने ती स्वच्छ व रसरशीत दिसू लागतात. भिजलेले पक्षी दाट पानं असलेल्या फांद्यांवर किंवा इमारतींच्या वळचणीला अंग चोरून बसलेले असतात. जोराचा पाऊस सुरू होण्यापूर्वी काळ्या ढगांच्या पाश्र्वभूमीवर पांढरे शुभ्र बगळे उडताना उठून दिसतात. ओल्या मातीवर गांडुळं व कठीण कवच असलेल्या गोगलगायी अचानक प्रगट होऊन हळूहळू पुढे सरकू लागतात. झाडांच्या खोडांवर किंवा ओल्या पालापाचोळ्यावर अळंबी (कुत्र्याच्या छत्र्या) उगवलेल्या दिसतात. बाहेरील िभतींवर हिरव्या मखमली शेवाळाचं आवरण तयार होतं.
ओढे व नद्या खळाळत काठोकाठ भरून वाहू लागतात. काही ठिकाणी त्यांचं फेसाळणाऱ्या गार पाण्याचे हजारो तुषार उडवणाऱ्या धबधब्यात रूपांतर होतं. जंगलात तेरडा, सोनकी, भारंगी व रानहळदीसारखी असंख्य रंगीबेरंगी पावसाळी फुलं आपलं स्वागत करतात. जागोजागी नाजूक पानांचे नेचे खडकांच्या भेगांमध्ये उगवतात. पानगळ झालेल्या सर्वच झाडांना एव्हाना नवीन पानं आलेली असतात. पावसाने थोडी विश्रांती घेतली की पक्षी किलबिलाट करू लागतात. पिवळाजर्द हळद्या, निळाशार खंडय़ा व शेंद्री सूर्यपक्षी हिरव्या रंगावर मण्यासारखे शोभून दिसतात. काही ठिकाणी मोरांनी आपला सुंदर पिसारा फुलवलेला असतो. सह्य़ाद्रीतील पठारांवर अजून एक-दोन महिन्यांत शेकडो जातीच्या फुलांचे गालिचे अंथरलेले दिसतील. दर सात वर्षांतून एकदा फिकट जांभळी कारवीची फुलं तर सबंध डोंगर उतार रंगवून टाकतात!
खिडकीतून बाहेरील पावसाची मजा तर अनुभवता येतेच, पण ट्रेकिंगला जाऊन भिजत भिजत रानातील निसर्ग जवळून बघण्यात वेगळीच गंमत असते. मात्र, पायात चांगली पकड घेणारे शूज किंवा सँडल घालायला विसरू नका, कारण सगळीकडे निसरडं झालेलं असतं. सोबत हवी एखादी मोठी व्यक्ती, अंगावर रेनकोट किंवा छत्री व सॅकमध्ये थोडा खाऊ.
धोधो पावसात
सुट्टी संपून शाळा सुरू झाली आहे व त्याचबरोबर मस्त पाऊससुद्धा पडू लागलाय. उन्हाळ्याने सुकलेला निसर्ग पुन्हा एकदा हिरवागार व तजेलदार झालाय.
First published on: 14-07-2013 at 01:01 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rain