‘‘नफिसा, माझ्या दांडिया तयार आहेत का?’’ केशरी-पिवळय़ा रंगाची घागरा-चोली घातलेली अद्विका नफिसाच्या दुकानापाशी येऊन धडकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘हे काय! घुंगरूच लावतेय.’’ नफिसा दांडियाला घुंगरू बांधत म्हणाली. तिच्या अब्बूंचं नवरात्रीच्या दांडिया बनवण्याचं छोटंसं दुकान होतं. त्या भागांत अनेक जणांची अशी दुकानं होती. नवरात्र सुरू होण्याच्या काही महिने आधीच हे सगळे कारागीर विविध प्रकारच्या आकर्षक दांडिया बनवून किरकोळ व्यापाऱ्यांना विकायचे. एरवी मात्र जरी-काम, बुट्टी-काम, ओढण्यांवरचं नक्षीकामसारख्या कामांमुळे कारागीरांचा उदरनिर्वाह होत असे.

‘‘तू अजून तयार नाही झालीस? दांडिया सुरू होईल नं!’’ अद्विकाची अगतिकता.

‘‘हे काम झालं की होतेच तयार. झालं.. घे!’’ लाल-पिवळय़ा-हिरव्या आणि सोनेरी रंगांनी सजवलेल्या दांडिया पाहून अद्विका खूश झाली. तिने दोन-तीनदा त्या हलक्याने एकावर-एक वाजवून बघितल्या.

‘‘मस्त येतोय आवाज.. आता आवर लवकर.’’ अद्विकाने नफिसाला घाई केली.

आठवीतल्या नफिसा आणि अद्विका अगदी घट्ट मैत्रिणी; जवळजवळ लागून असलेल्या आपापल्या वस्तीत राहायच्या. शाळेतही एकाच वर्गात शिकायच्या, एकाच बाकावर बसायच्या. अद्विका यंदा पहिल्यांदाच दांडिया खेळणार होती. म्हणून गेले काही दिवस नफिसा तिला दांडिया खेळायला शिकवत होती. एरवी नफिसाच्या घरचे सगळेच दरवर्षी नवरात्री उत्सवाच्या दांडिया खेळामध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे.

‘‘कशी दिसतेय?’’ म्हणत थोडय़ाच वेळात नफिसा तयार होऊन आली. तिने गुलबाक्षी रंगाचा शरारा घातला होता. अद्विकाने ‘मस्त’ची खूण केली. दोघी मग जवळच्या मैदानाकडे चालत निघाल्या- जिकडे नवरात्रीचे नऊ दिवस गरबा आणि दांडिया खेळला जाणार होणार होता.

‘‘अद्विका, तुझ्या आईने शरारा एकदम भारी शिवलाय.’’ नफिसा कौतुकानं म्हणाली.

‘‘यंदा देवीच्या चोळी-साडय़ापण आईनेच शिवल्या आहेत.’’

‘‘हा! पण जरीकाम कुणाचंय त्यावर?’’

‘‘अर्थात, तुझ्या अम्मीचं.. आणि आरसाकाम तुझं.’’ दोघींनी एकमेकींना टाळी दिली.

‘‘अद्विका, एक विचारू? गेल्या आठवडय़ात त्या तारागल्ली रिक्षा स्टँडजवळ नक्की काय गं झालं होतं?’’

‘‘अगं, तो जयदेवभैया आहे नं.. आमच्या दोन घरं सोडून राहतो! पोरांबरोबर क्रिकेट खेळत असतो. तो माझ्या बाबांसारखाच रिक्षापण चालवतो. त्या दिवशी रिक्षा स्टँडवर पॅसेंजरसाठी लाइनमध्ये थांबलेला असताना गप्पांच्या नादात एका मित्राने धर्मावरून, रफिकचाचाविरुद्ध भडकवलं त्याला.’’

‘‘रफिकचाचा म्हणजे.. त्या रिक्षा स्टँडवर ज्यांची चहाची टपरी आहे..’’

हेही वाचा… कार्यरत चिमुकले..: नदीच्या गढूळ पाण्याची गोष्ट

‘‘बरोबर. एरवी तो तिथेच चहा पितो बरं. चाचा त्याच्यासाठी खास क्रीम-रोलपण आणून ठेवतात कधी-कधी. पण त्याच्या मित्राला चांगलंच माहीत होतं की हा गरम डोक्याचा जयदेवभैया नक्की भडकणार. मग काय, भैया आणि चाचाचं भांडण झालं. भैयाने चाचाच्या टपरीवर तोडफोड केली. आमचा बाबा जवळच होता. तो लगेच आला भांडण मिटवायला. ती गोष्ट आहे नं.. दोन मांजरांच्या भांडणामध्ये फायदा होतो माकडाचा. तस आहे बघ. ज्या मित्राने भैयाला भडकवलं, तो नामानिराळा झाला. पोलिसांनी रात्रभर लॉक-अपमध्ये ठेवल्यावर जयदेवभैयाचा जामीन करायला अब्बूच होते तुझे! मग आली त्याची अक्कल ठिकाण्यावर.’’

दोघी काही क्षण शांतपणे चालत राहिल्या. तोपर्यंत मैदान आलंच होतं. लोक अजून जमत होते. नफिसा आणि अद्विका देवीसाठी उभारलेल्या मंडपाच्या पायऱ्यांवर बसल्या. इतक्यात कॉलेजच्या मुला-मुलींचा एक मोठा ग्रुप तिथे आला.

‘‘नफिसा, सांगू शकशील यांच्यात कोण कुठल्या धर्माचं आहेत ते?’’

‘‘अशक्य आहे..’’

‘‘गंमत बघ नं नफिसा, दांडिया खेळायला बहुतेकांकडे आज दांडिया असतील तुमच्या बिरादरीमधल्या कारागिरांनी बनवलेल्या. सण आहे मुळात हिंदूंचा. तरी आनंदाने सगळे सहभागी होताहेत. असे सगळे एकत्र असले की किती छान वाटतं.. नाही तर उगाच आपलं कुणी तरी भडकवतं आणि हे तापट डोक्याचे लोक भडकतात नि शांतता भंग होते. मला वाटतं, अशा वेळी या लोकांची सारासार विचार करण्याची बुद्धी बंद होत असणार.’’

‘‘अद्विका, एका वर्षी घडलेला एक योगायोग सांगते. साधारण मार्च-एप्रिल महिन्यांत आमचं रमझान, तुमचं चैत्री नवरात्र आणि ख्रिश्चन धर्मीयांचं ‘लेंट’ हे सण एकत्र आले होते.’’

‘‘लेंट म्हणजे?’’

‘‘गुड फ्रायडे आणि ईस्टरच्या आधी ख्रिश्चन धर्मीय साधारण चाळीस दिवस उपवास करतात. त्या महिन्याला ‘लेंट’ म्हणतात. त्या वर्षी तीनही धर्माच्या या उपवास-पर्वाचे थोडेफार दिवस एकमेकांवर ‘ओव्हरलॅप’ झाले होते. थोडक्यात काय, तर आपल्या एरियामध्ये सगळय़ाच धर्माचे लोक एकत्र आपापल्या देवाची पूजा-अर्चा करत होते.’’

‘‘शेवटी काय गं, नमस्कार करण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी तो देव एकच आहे नं! हे समजलं असतं तर काय हवं होतं? नाही तर एकीकडे देवीची पूजा करायची, उपवास करायचे, अनवाणी चालायचं आणि दुसरीकडे स्त्रियांची मात्र विटंबना करायची.’’

‘‘मध्येच हे काय आता?’’

हेही वाचा… बालमैफल : चढे रंग मेंदीचा!

‘‘अगं, कालच आपल्या बाई मणिपूरमध्ये स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराबद्दल, सांगत होत्या नं? डोक्यातून जातच नाहीयेत ते विचार. तिथे तर नेहमी एकत्र राहणारे दोन गट भिडले आहेत. आणि हकनाक अपमानित होताहेत स्त्रिया.. अशा लोकांवर ईश्वर, अल्ला, येशू.. प्रसन्न वगैरे व्हायला चान्सच नाही. मग कितीही उपवास करा किंवा अनवाणी फिरा.’’

‘‘तुम्ही देवीला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणता नं? असे लोक खरोखरच महिषासुर राक्षस म्हणायला हवेत..’’

‘‘अगदी बरोबर. आणि हे ‘जात’ आणि ‘धर्म’ म्हणजे ‘शुंभ’ आणि ‘निशुंभ’ राक्षस! देवीने रणांगणात त्यांचा वध केला खरा! पण अजूनही किती तरी वाईट प्रवृत्ती समाजात आहेत. दसऱ्याच्या रावणदहनात निचरा व्हायला हवा त्यांचा! हे एका दिवसाचं काम नाहीये. पण आपण देवीकडे प्रार्थना नक्कीच करू शकतो- ‘या देवि सर्व भूतेषु शांतिरूपेण संस्थिता..’’’ अद्विकाने हात जोडून नमस्कार केला. नफिसानेही आपसूक डोळे मिटले.

इतक्यात लाऊडस्पीकरवर गाणं सुरू झालं, ‘ए ढोली तारो.. ढोल बाजे, ढोल बाजे, ढोल बाजे, ढोल.. ढमढम बाजे ढोल..’’

दांडियाचा खेळ सुरू झाला होता. काही क्षणांतच मैदानावर जमलेली गर्दी गाण्याच्या ठेक्यावर थिरकू लागली. नफिसा आणि अद्विकाही त्यांच्यात सामील झाल्या. माहौलही आता उत्साही बनला होता. खेळ जसजसा रंगात येत होता, तसतसे ताल, ठेका, सूर टप्प्याटप्प्याने वाढत होते आणि एकमेकांवर वाजून उठणारे दांडियांचे झंकार एकरूपतेची ग्वाही देत होते..

mokashiprachi@gmail.com

टेक्नॉलॉजी

विज्ञानाच्या पुस्तकात वाजले की हो बारा,
टेक्नॉलॉजी म्हणाली, आता थांबा ना हो जरा.

गणिताने विचारले, ८+ ५,
टेक्नॉलॉजी म्हणाली, कॅल्क्युलेटर बघ कळेल उत्तर आहे काय!

भूगोलाने विचारले, बिपरजॉयचा वेग काय,
टेक्नॉलॉजी म्हणाली, windy.com बघ मला माहीत नाय!

भाषेने विचारले, शब्दांच्या जाती किती?
टेक्नॉलॉजी म्हणाली, गुगल सर्च कर, मला मोजायची वाटते भीती!!

-शुभंकर योगेश पाठक- इयत्ता सहावी, विद्यानिकेतन, डोंबिवली

आजोळचे गाव

आजोळचे गाव माझे
आहे चिमुकले
भल्या मोठय़ा डोंगराच्या
कुशीत वसलेले

गावातल्या नदीची
काय सांगू बात
गाव सुखी करण्यात
तिचा मोठा हात

नदीत डुंबण्याचा
लागे जिवास छंद
स्वच्छंद बागडण्यात
आगळाच आनंद

गावच्या डोंगरावर
गावदेवीचे देऊळ
वाऱ्याने घंटानाद
रोज घुमतो मंजुळ

हिरवीगार झाडे
येथे पांखरांचे थवे
शेतशिवार फुललेले
रान गाणे गाते नवे

नाही परकाच कुणी
नाही कुणाचे गुपित
आपुलकीचा मळा
फुले गावच्या मातीत

येता आजोळी भेटाया
जाते मरगळ विरून
उत्साह, चैतन्य सारा
घेतो उरात भरून

-एकनाथ आव्हाड