शांतिसदन नावाचं एक घर होतं. त्या घरात आई-बाबा, नेहा, अथर्व आणि आजी रहात होते. आजी नेहमी आपल्या खोलीत पोथी वाचत किंवा जप करीत बसे. सकाळच्या वेळेस सुनेला कुठे भाजी bal06चिरून दे, कणीक मळून दे अशी बारीक कामे ती करायची.
आई-बाबा सतत भांडत असायचे. दोघांनाही कामावर जायचं असल्यामुळे घाईच असायची. बाबा नेहमी ‘आज भाजी अळणी झाली आहे.’ ‘भात चिकट झाला आहे,’ अशी तक्रार करायचे. आईला राग यायचा आणि मग दोघांची भांडणं व्हायची. बाबा कोणतीच गोष्ट वेळेवर करायचे नाहीत. पेपर वाचला की तो तिथेच टाकायचा. ओला टॉवेल कॉटवरच भिरकवायचा. कपाट नेहमी उघडंच ठेवायचं. ऑफिसला जाताना ‘मोजे कुठे आहेत?’ ‘रुमाल कुठे आहे?’ म्हणून ओरडा करायचे. आईलाही कामाला जायचं असल्यामुळे तिलाही घाईच असायची. मग अनेकदा दोघांची जुंपायचीच. अशी कितीतरी कारणं होती की त्यामुळे त्यांची सारखी भांडणं होत.
नेहा, अथर्वचंही तेच होतं. आंघोळीला आधी कुणी जायचं याच्यावरून भांडण. नेहाला कार्टुन बघायचं असलं, तर अथर्वला पिक्चर बघायचा असायचा. कॉम्प्युटरवरूनही दोघांची खूप भांडणं व्हायची. संपूर्ण घरच सकाळी, संध्याकाळी, रात्री भांडत असायचं.
सोसायटीत ‘शांतिसदन’ हे घर भांडणारं घर म्हणून प्रसिद्ध होतं. एकटी आजी कधी भांडायची नाही. सगळ्यात शेवटी आंघोळ करायची. सगळ्यांच्या शेवटी जेवायची. आपल्या खोलीत देवाचं नाव घेत बसायची.
एकदा आजीचा भाऊ आला. तो आजीला म्हणाला, ‘‘अक्का, माझ्या नातवाची मुंज आहे. चल माझ्याकडे. तिथे महिनाभर राहा.’’ आजी आपल्या भावाकडे गेली.
मुंजीच्या आधी दोन दिवस आई-बाबा, नेहा, अथर्व सगळेच आजीच्या भावाकडे गेले. घराने विचार केला की, बरी संधी मिळाली आहे. हीच वेळ आहे पळून जाण्याची. आणि घर खरंच पळून गेलं.
दोन दिवसांनी आई-बाबा, नेहा, अथर्व घरी आले. घरी येऊन बघतात तर काय? घरच नाही. घर पळून गेलंय. शेजारी-पाजारी चौकशी केली. ते म्हणाले, ‘‘दोन दिवस झालेत, तुमचं ‘शांतिसदन’ काही दिसत नाहीये.’’
सगळे काळजीत पडले की, ‘‘आता काय करायचं?’’
शेजारचे कुलकर्णी काका म्हणाले, ‘‘आता पोलिसांत तक्रार द्या.’’
आई-बाबा, नेहा, अथर्व तक्रार द्यायला निघाले. पोलिसांना वाटलं, चोरीची तक्रार करायला आले आहेत.
पोलिसांनी विचारलं, ‘‘घर किती दिवस बंद होतं? काय काय चोरीला गेलं? पैसे दागिने सर्व गोष्टींची तक्रार द्यावी लागेल.’’
बाबा म्हणाले, ‘‘चोरी झालेली नाही. घरफोडी झालेली नाही. आमचं घर पळून गेलंय.’’
पोलिसांना आश्चर्य वाटलं. ‘‘काय, घर पळून गेलंय? अशी पहिलीच तक्रार आहे. ठीक आहे. घराचा रंग कोणता आहे. दार कुठे आहे- पूर्वेकडे की पश्चिमेकडे. साधारण तुमचा संशय काय आहे.’’
बाबा म्हणाले, ‘‘रंग पिवळा-चॉकलेटी आहे. नाव- शांतिसदन. दार पूर्वेकडे आहे. दाराचा रंग चॉकलेटी आणि पिवळा आहे.’’
‘‘ठीक आहे. आम्ही शोध घेऊ. तक्रार नोंदवून घेतली आहे. तुम्ही आता जाऊ शकता,’’ पोलिस म्हणाले.
आई-बाबा, नेहा, अथर्व सर्वाना काळजी लागली, आता जायचं कुठे?
आई-बाबा, नेहा, अथर्व गेटपाशीच बसून राहिले. तेव्हासुद्धा ते एकमेकांशी भांडतच होते. रात्रीचे दहा वाजले आणि पोलीस आले. ते म्हणाले, ‘‘सापडलं तुमचं घर, पलीकडे बाग आहे तिथे झाडाखाली रडत बसलंय. चला आमच्याबरोबर.’’
पोलीस, आई-बाबा, नेहा, अथर्व सगळे बागेत आले. पोलिसांनी घराला दंडुका उगारीत दरडावून विचारलं, ‘‘तू पळून आलायस ना!’’
डोळे पुसत घर म्हणालं, ‘‘हो, मी पळून आलोय. ऐका मी का पळून आलोय. माझ्या भिंतींच्या विटेविटेत भांडण आहे. माझ्या छताचीही तीच गत आहे. भांडणामुळे मला अगदी नको नको झालंय म्हणून मी पळून आलोय. सांगा पोलीसदादा अशा भांडणाऱ्या माणसांचा कंटाळा येणार नाही का? इतके दिवस मला आजीची काळजी वाटत होती म्हणून मी गप्प बसलो होतो. आजी घरात नाही म्हटल्यावर मी पळून आलो.’’
पोलीस उजव्या हातांनी डाव्या हातावर दंडुका मारीत म्हणाले, ‘‘घराचं बरोबर आहे. तुम्ही काय करायचं ठरवलं आहे?’’ आई-बाबा, नेहा, अथर्व सर्वानी आपली चूक कबूल केली. ते पोलिसांना म्हणाले, ‘‘आम्ही यापुढे आता भांडणार नाही. चुकलं आमचं.’’
सर्वजण घरी आले. घरही घरी आलं. दुसऱ्या दिवसापासून बाबांचा तक्रारी स्वभाव कमी झाला. आईनेही करवादणं बंद केलं. नेहा जर टी. व्ही. बघत असेल तर अथर्व कॉम्प्युटर गेम खेळायचा. आणि अथर्व टी. व्ही. बघत असेल तर नेहा ड्रॉइंग काढत बसायची. घर आता शांत शांत झालं होतं.
शुभदा सुरंगे

Story img Loader