‘‘ए… सोड… सोड माझं पेन आहे ते…’’ प्रसाद अथर्वच्या हातातलं पेन खेचत म्हणाला.
‘‘नाही. माझ्या बाबांनी ते सिंगापूरहून आणलंय. कळलं. ते माझं आहे.’’ अथर्व म्हणाला.
‘‘नाही. ते माझं आहे. हात लावशील ना तर बघ…’’
‘‘माझं पेन मला दे, नाहीतर…’’
अथर्व प्रसादच्या अंगावर धावत गेला. प्रसाद त्याच्या हातातलं पेन सोडायला तयार नव्हता. अथर्व आपल्या अंगावर धावत येतोय म्हटल्यावर प्रसादने त्याला जोरात ढकलून दिलं. अथर्व जोरात जाऊन बेंचवर आदळला. प्रसाद खूपच चिडला होता, त्याने अथर्वपाशी जाऊन त्या कंपासबॉक्समधलं पेन घेतलं आणि अथर्वच्या हातावर भोसकलं. अथर्व जोरात ओरडला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अथर्व पुन्हा तिरमिरीत उठला आणि प्रसादला ढकलणार तोच, प्रसादने सगळी शक्ती एकवटून त्याला पुन्हा बेंचवर ढकलून दिलं. आता मात्र अथर्वच्या डोक्याला चांगलंच लागलं. थोडंसं रक्त दिसू लागलं. अथर्व आणि प्रसादच्या भोवती गोळा होऊन मुलं मारामारी पाहत होती. तेव्हाच क्लास टीचर पाठक मॅडम तासासाठी वर्गात आल्या. त्यांना जे काही सुरू आहे ते लक्षात आलं. त्यांनी दोघांची मारामारी सोडवली आणि अथर्वला फर्स्ट एड घेण्यासाठी जा म्हणाल्या, तर प्रसादला वर्गाबाहेर उभं केलं. प्रसादला खूप राग आला होता. अथर्व जेव्हा फर्स्ट एडसाठी जात होता, तेव्हा प्रसाद रागाने अथर्वकडे पाहत होता. प्रसाद त्याच रागाने म्हणाला, ‘‘मी सोडणार नाही तुला. बघून घेईन.’’
पाठक मॅडमनी हे ऐकलं आणि त्या प्रसादला ओरडल्या. ‘‘तू काय गुंड आहेस? बिहेव विथ युअर लॅंग्वेज! आई-बाबा हे शिकवतात घरी?’’
प्रसादला पाठक मॅडमचाही खूप राग आला होता. पण तो तसाच रागाने त्यांच्याकडे पाहत होता. पाठक मॅडम म्हणाल्या, ‘‘संपूर्ण तास संपेपर्यंत ओणवा उभा राहा. मी तुला प्रिन्सिपल मॅडमकडेच नेते. अथर्व नाऊ यू गो.’’ अथर्व निमूटपणे निघून गेला. पाठक मॅडम क्लासमध्ये तासासाठी गेल्या, पण प्रसादच्या मनातला राग खदखदत होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा