तन्वीला सख्खा भाऊ  किंवा बहीण नाही. पण मिहीर- म्हणजे तिचा चुलत भाऊ  जवळच राहतो. सारखा ‘ताई-ताई’ करत तिच्या मागे पुढे असतो. त्यामुळे तन्वीलासुद्धा एकदम मोठं आणि जबाबदार असल्यासारखं वाटतं! गेल्याच आठवडय़ात मिहीरचा पाचवा वाढदिवस होता. मिहीरच्या बर्थडे पार्टीची थीम आणि ड्रेसकोड ठरवणं, डेकोरेशनसाठी मदत करणं, केकवर प्रिंट करायचं चित्र इंटरनेटवरून शोधून काढणं अशी अनेक कामं तन्वी स्वत:हून पुढाकार घेऊन करते. ती करत असलेल्या मदतीचं काका-काकूही भरभरून कौतुक करत असल्यामुळे तन्वीला काम करायला आणखी हुरूप येतो.

आत्तापर्यंत मिहीरच्या प्रत्येक वाढदिवसाला तन्वीने आई-बाबांकडून पैसे घेऊन गिफ्ट आणलं होतं. या वर्षी मात्र तिला स्वत: साठवलेल्या पैशांतून मिहीरला काहीतरी घ्यायचं होतं. काहीतरी ‘हटके’ घ्यावं म्हणून ती खूप विचार करत होती. मुलींना काही गिफ्ट द्यायचं असेल तर किती ऑप्शन्स असतात! मुलांना तर घडय़ाळ, स्टेशनरी, पुस्तकं, गेम्स हेच द्यावं लागतं.’’ तन्वी थोडीशी वैतागूनच आईला म्हणाली. तन्वीला मनासारखं ‘हटके’ गिफ्ट सुचत नाहीये म्हणून सगळी चिडचिड सुरू आहे हे आईच्या लक्षात आलं. ती म्हणाली, ‘‘तन्वी अशी चिडचिड करण्यापेक्षा प्रत्यक्ष दुकानात जाऊन बघूया. गेम्समध्येही किती व्हरायटी असते! मिहीरच्या वयाच्या मुलांसाठीही खूप ऑप्शन्स असतात. आपण जाऊन तर बघू या!’’ आईचं म्हणणं पटल्यामुळे तन्वी लगेच तयार झाली आणि दोघी त्यांच्या नेहमीच्या खेळण्यांच्या दुकानात गेल्या. तिथे मिहीरचा वयोगट आणि तन्वीचं गिफ्टचं बजेट सांगितल्यावर दुकानातल्या काकांनी काचेच्या कपाटातून वेगवेगळे खेळ काढायला सुरुवात केली. ‘हा नको’, ‘तो त्याच्याकडे आहे’ असं करता करता मनासारखं गिफ्ट मिळणं कठीण आहे असं आईलाही वाटायला लागलं. तेवढय़ात त्या काकांनी एक गेम काढला. त्याचं नाव होतं ‘हाय हो! चेरी-ओ’. तो गेम पाहताना तन्वीचे डोळे चमकलेले बघून आईने मनातल्या मनात त्या काकांना ‘थँक्स’ म्हणूनही टाकलं!

‘‘या गेमचं ‘हाय हो! चेरी-ओ’ हे नाव तर मस्तच आहे, पण हा खेळायचा कसा?’’ तन्वीने विचारलं. दुपारची वेळ असल्यामुळे दुकानात गर्दी कमी होती आणि दुकानदार काकांकडे वेळही भरपूर होता. काकांनी सांगितलं, ‘‘दोन, तीन किंवा चार जण मिळून हा खेळ खेळू शकतात. हे बघ यात एक स्पिनर असतो. एका चार्टवर चेरीच्या झाडांची चित्रं आणि त्यात चेरीज् ठेवायला छोटे खळगे असतात. वेगवेगळ्या रंगांच्या प्लास्टिकच्या चेरीज्ही आहेत बघ. सुरुवातीला सगळ्या चेरीज् या अशा झाडावर लावायच्या. मग ज्याची टर्न असेल त्याने स्पिनर फिरवायचा. स्पिनरवर सात ऑप्शन्स असतात. ‘एक चेरी घ्या’, ‘दोन चेरीज् घ्या’, ‘तीन चेरीज् घ्या’, ‘चार चेरीज् घ्या’, ‘डॉग’, ‘बर्ड’ आणि ‘स्पिल्ड बास्केट’ असे सात पर्याय असतात. डॉग आणि बर्ड हे पर्याय आले की आपल्याकडे जितक्या चेरीज् असतील त्याप्रमाणे एक किंवा दोन चेरीज् आपण पुन्हा झाडावर ठेवायच्या. ‘स्पिल्ड बास्केट’ हा पर्याय आला तर सगळ्याच्या सगळ्या चेरीज् पुन्हा झाडावर ठेवायच्या.’’

तन्वीला तर हा खेळ खूपच आवडला. तन्वीची आई म्हणाली, ‘‘नवीनच दिसतोय हा खेळ. तन्वी छोटी असताना तर हा आम्हाला माहीतही नव्हता!’’ काका हसत हसत म्हणाले, ‘‘अहो हा खेळ तर १९६० मध्ये पहिल्यांदा बाजारात आला. तन्वीच्या लहानपणी म्हणजे दहा-बारा वर्षांपूर्वी तर तो नक्कीच असणार! खरं सांगू का, आपण मोठी माणसं लहान मुलांइतकी चौकस नसतो. बऱ्याचदा आपल्याला माहीत असलेले गेम्सच विकत घेतो!’’ तन्वीच्या आईला त्यांचं म्हणणं पटलं. तेवढय़ात तन्वीने काकांना त्या गेमबद्दल आणखी माहिती सांगायला सांगितली. काका मान डोलवत म्हणाले, ‘‘हर्मन वर्नहार्ड (Hermann Wernhard) यांनी हा खेळ तयार केला. २००७ साली या खेळाचे नियम थोडे बदलले गेले आणि आता सुधारित आवृत्ती मिळते. खेळताना ज्याच्या सगळ्या चेरीज पहिल्यांदा गोळा करून होतील त्याने मोठय़ाने ओरडून ‘हाय हो! चेरी-ओ’ असं म्हणायचं असतं!’’

काकांचं वाक्य संपता संपता दुकानात आणखी काही चिंटूपिंटू मंडळी आली आणि ‘हे पाहिजे’, ‘ते घेऊया’ असा चिवचिवाट सुरू झाला. ते बघून आईने काकांना ‘हाय हो, चेरी ओ’ गिफ्ट पॅक करायला सांगितला आणि मिहीरसाठी मनासारखं ‘हटके’ गिफ्ट मिळाल्याच्या आनंदात तन्वीने पैसे देण्यासाठी आपली चिमुकली पर्स उघडली!

अंजली कुलकर्णी-शेवडे –  anjalicoolkarni@gmail.com

Story img Loader