‘असं त्रिशंकूसारखं जगण्यापेक्षा एका जागी स्थिर राहावं ना! तुमची तब्येतही आता बरी नसते.’’  ऋताची आई फोनवर तिच्या बाबांना समजावत होती. फोन संपताच ऋता म्हणाली, ‘‘आई, कसले गं एकेक ढासू शब्द वापरतेस? आता हे त्रिशंकू काय?
आई म्हणाली, ‘‘त्रिशंकू म्हणजे काय ते मी सांगते. पण तुझ्या या ‘ढासू’चा अर्थ मात्र तुला सांगता आला पाहिजे बरं!  
इक्क्ष्वाकू कुळातील राजा त्रिशंकू याने वसिष्ठांकडे सशरीर स्वर्गात जाण्याची इच्छा प्रगट केली. त्याला वसिष्ठांनी असमर्थता दर्शविली. तेव्हा त्याने वसिष्ठाच्या मुलांना विनंती केली. वडील जे करू शकत नाहीत ते करण्यास पुत्रही तयार होईनात. अतिआग्रह केल्यावर चिडून त्यांनी ‘चांडाळ हो’ असा शाप दिला. आणि हाहाकार झाला. सर्व प्रजा राजाला सोडून गेली. त्रिशंकू काळा झाला. आभूषणे लोखंडाची झाली. पण तरी तो शांत राहिला. नंतर तो विश्वामित्रांपाशी गेला. त्याला सर्व हकिगत सांगितली आणि इच्छाही सांगितली. त्यांनी ‘तू चांडाळाच्या रूपात स्वर्गात जाशील,’ असे सांगितले. राजाने यज्ञाची तयारी केली. सर्व ऋषींना विश्वामित्रांनी आवाहन केले.  विश्वामित्रांच्या क्रोधाला घाबरून ऋषी तयार झाले आणि यज्ञ पूर्ण करून त्रिशंकूला स्वर्गात  पाठविले. पण इंद्राने त्याला स्वर्गात येण्यास मनाई केली. कारण विचारता इंद्र म्हणाला, ‘‘तुला गुरूंचा शाप आहे. देवलोकात तुला स्थान नाही.’’  पण विश्वामित्रांनी त्याला स्वर्गात पाठविण्याचे वचन दिले होते. म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी पुन्हा सृष्टी निर्माण केली. नक्षत्रं निर्माण केली आणि त्यात त्याला स्थान दिले. ना स्वर्गात, ना पृथ्वीवर अशी त्याची स्थिती झाली. म्हणून तेव्हापासून जेव्हा एखाद्याला कुठेच निश्चित स्थान नाही अशी अस्थिर स्थिती निर्माण होते तेव्हा ‘त्रिशंकू अवस्था’ म्हणतात.  
ऋताला त्रिशंकूचा अर्थ तर कळला, आता ढासूचा सांगण्यायोग्य अर्थ ती शोधू लागली.                                 
 मेघना फडके – meghanamphadke@rediffmail.com  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा