बालमित्रांनो, तुम्हाला जादूचे प्रयोग आवडतात का? जादूगार हातचलाखीने जादूच्या पोतडीतून विविध प्रकारच्या वस्तू काढून दाखवतो तेव्हा आपण थक्क होऊन पाहात राहतो. निसर्ग हा सर्वात मोठा जादूगार आहे. तो आपल्याला भरभरून देत असतो. आजूबाजूला नजर टाकली तर निसर्गाने केलेली रंगांची उधळण दिसते. विविधतेने नटलेल्या निसर्गातील मनमोहक फुले, हा आपल्या आजच्या कोडय़ाचा विषय आहे. फुलांच्या उमलण्याच्या वेळा, त्यांचा सुगंध, त्यांचे गुणधर्म, पाकळ्यांचे आकार, विविध प्रकारचे असतात. आजच्या कोडय़ात तुम्हाला फुलांची छायाचित्रे आणि त्यांची वैशिष्टय़े दिलेली आहेत. तुम्ही फुलांची नावे ओळखून चित्रांशी त्यांच्या जोडय़ा लावायच्या आहेत.
१) अंदाजे शंभर एक पाकळ्या असलेल्या या फुलाच्या नावातच कृष्ण आहे.
२) फटाक्याप्रमाणे आवाज करून बीजप्रसारण करण्याच्या या गुणधर्मामुळेच या वनस्पतीला इंग्रजीत ‘फायर क्रॅकर फ्लॉवर’ असे नाव मिळाले आहे.
३) वसंत ऋतूच्या आगमनाबरोबरच सर्व फांद्यांवर पाने कमी व सर्वत्र फुलेच फुले उमलल्यामुळे हा संपूर्ण वृक्षच तांबडय़ा रंगाने नटतो.
४) गाईच्या कानांसारखा आकार असल्यामुळे या फुलांना — म्हणतात.
५) ‘बहरला — दारी, फुले कां पडती शेजारी?’ हा प्रश्न सत्यभामा कृष्णाला का विचारते हे तुम्हाला माहिती आहे का?
६) ‘फुले वेचिता बहरू कळियांसी आला’. संत ज्ञानेश्वरांच्या सुप्रसिद्ध अभंगातील ओळ ही — या फुलाचे वर्णन आहे.
७) फारसा वास नसलेली ही विविध रंगांची फुले सायंकाळी उमलतात.
८) दिवाळीच्या सुमारास झेंडूच्या बरोबरीने ही हवीच.
९) निवडुंगाच्या कुळात जन्मलेले आणि रात्रीच्या वेळी उमलणारे फूल. खूप काळाने उमलणारे हे फूल पाहणे हा एक अवर्णनीय सोहळाच असतो.
१०) ही फुले महादेवाला प्रिय असल्याने त्याला शिवशेखर असेही म्हणतात.
११) रात्रीच्या वेळी आसमंत सुगंधित करणाऱ्या या फुलाचे इंग्रजीतील नाव आहे – क्वीन ऑफ द नाइट.
१२) बाराही महिने फुलणाऱ्या या फुलाला हिंदीत सदाबहार असेही म्हणतात.
उत्तरे –
१) ए – कृष्णकमळ २) औ – अबोली ३) अं – गुलमोहर ४) ऐ – गोकर्ण ५) इ – पारिजात ६) उ – मोगरा ७) ई – गुलबक्षी ८) आ – शेवंती ९) ऊ – ब्रह्मकमळ १०) ओ – धोतरा ११) अ – रातराणी १२) अ: – सदाफुली
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा