आज आपण गर्द झाडी असलेल्या चिखल-दलदलीच्या समुद्रकिनाऱ्यावर आहोत. थोडक्यात काय, आपण कांदळवन किंवा खारफुटींच्या प्रदेशात आहोत. खारफुटी खूपच वैशिष्टय़पूर्ण आहेत. जिथे इतर कोणतेच वृक्ष तग धरू शकत नाहीत अशा दलदलींमध्ये खारफुटी जोमाने वाढते. खारफुटी ही काही एक वनस्पती नाही बरं का! समुद्राच्या लाटांच्या थेट माऱ्यापासून सुरक्षित, दलदल असलेल्या, भरती-ओहोटीच्या रेषांदरम्यान वाढणाऱ्या वृक्ष आणि झुडपांच्या समूहाला खारफुटी या नावानं ओळखलं जातं. दंतमंजनामध्ये वापरली जाणारी मिसवाक ही खारफुटींशी संलग्न प्रजाती आहे.
खारफुटी अतिशय कठोर अधिवासांत वाढतात. इथे खारं पाणी असतं; पाण्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गाळ असतो; प्राणवायूदेखील कमी प्रमाणात असतो. या इतर झाडांकरता अस अधिवासांत रुजण्याकरता आणि वाढण्याकरता खारफुटींची मुळं वैशिष्टय़पूर्णपणे बदलली आहेत. या मुळांद्वारे खारफुटी खाऱ्या पाण्यामधून आणि हवेमधूनसुद्धा प्राणवायू मिळवू शकतात. काही खारफुटींची मुळं सुळ्यांच्या टोकासारखी जमिनीतून वर वाढतात आणि हवेतील प्राणवायू शोषून घेऊ शकतात.
खारफुटींना समुद्राच्या पाण्यातून अति प्रमाणात होणाऱ्या मिठाच्या पुरवठय़ाचा सामनादेखील करावा लागतो. सर्वप्रथम खारफुटी अतिरिक्त क्षार किंवा मिठाला आपल्यामध्ये येण्यापासूनच रोखतात; मीठ वगळूनच या खारफुटी पाणी शरीरात घेतात. मात्र चहुबाजूंनी खाऱ्या पाण्यातच वाढणाऱ्या खारफुटींकडे अनेक युक्त्या असतात बरं का.. काही खारफुटी हे मीठ पानांमध्ये साठवून ठेवतात. जेव्हा ही पानं गळून पडतात तेव्हा त्यांच्यासोबतच हे मीठदेखील झाडापासून वेगळं होतं. काही खारफुटींमध्ये पानांच्या खालच्या बाजूस छोटय़ा कणांच्या रूपानेही मीठ बाहेर टाकलं जातं.
खारफुटींचं किनारपट्टीवरचं अस्तित्व अतिशय महत्त्वाचं आहे. किनारपट्टीवरच्या माणसांच्या वस्त्यांना खारफुटी समुद्री वादळं, चक्रीवादळांपासून संरक्षण पुरवतात. भरतीच्या काळात अति प्रमाणात खारं पाणी खाडय़ांमध्ये येण्यापासून रोखतात. खारफुटींचं जंगल किनाऱ्याची धूप होण्यासही अटकाव करतात.
माझ्या छोटय़ा दोस्तांनो, तुम्हाला आवडणाऱ्या कितीतरी माशांच्या प्रजातींच्या चिमुकल्या पिलांकरता खारफुटीचं जंगल एक सुरक्षित आसरा आहे. अनेक मासे, समुद्री प्राण्यांची पिलं या खारफुटींच्या जंगलांमध्ये मोठय़ा शिकाऱ्यांपासून सुरक्षित राहून मोठी होतात.
माझ्या छोटय़ा वाचकांनो, खारफुटींचं जंगल कदाचित जमिनीवरच्या इतर जंगलांइतकं सुंदर दिसणार नाही, मात्र या वेगळ्या जंगलांमध्ये अनेक खास गुण आणि वैशिष्टय़ं दडलेली आहेत; त्यामुळेच खारफुटी महत्त्वाच्या ठरतात.
ऋषिकेश चव्हाण – rushikesh@wctindia.org
शब्दांकन : श्रीपाद