बालमित्रांनो, आपण मागच्या लेखामध्ये उंबराच्या झाडाच्या फुलाची तसेच फळाची माहिती घेतली होती. मला खात्री आहे, की तुम्हा सर्वाना ती निश्चितच आवडली असेल. तुम्ही या लेखामध्ये सुचविल्याप्रमाणे अगदी सहज शक्य असणारे प्रयोग करून बघितले पाहिजेत. यामुळे तुमच्या ज्ञानात सहजगत्या भर पडू शकेल व अगदी हसत-खेळत निसर्गातील नवलाईची माहिती कळेल.
यावेळीही आपण एका वैशिष्टय़पूर्ण फळाची माहिती घेऊयात. हे फळ आपण नेहमीच खातो व आपल्याला हे फळ खावे म्हणून डॉक्टरही नेहमी सांगतात. ओळखलं का? अहो, मी सफरचंदाबद्दल बोलत आहे. आहे की नाही हे आपल्या परिचयातील फळ! परंतु यातील गंमत मात्र आपल्यापकी अनेक जणांना माहीत नसेल. या लेखात आपण या फळाची माहिती करून घेऊयात.
आपण नेहमी म्हणतो, की अमुक एक फळ खाता येते, तर अमुक एक खायचे नसते, इत्यादी. कारण सर्वच फळे ही संपूर्णपणे खाल्ली जात नाहीत.  काही फळांतील गर खाल्ला जातो, तर काही फळांमधील आवरण. तर काही फळांच्या बाबतीत मात्र याहून वेगळी गंमत असते. यातील मूळ फळ हे खाताच येत नाही. मात्र या मूळ फळांचे आवरण हे खाण्याच्या योग्यतेचे असते. हे समजून घेण्याकरिता आपण प्रथम फळांची रचना समजून घेऊयात.
साधारणत: फुलांच्या परागीभवनानंतर फळधारणेला सुरुवात होते. फळांमध्ये तीन प्रकारची आवरणे असतात. सर्वात बाह्य आवरण, मधले आवरण व सर्वात आतील आवरण. या सर्वसाधारण रचनेमध्ये अनेक प्रकारचे बदल असू शकतात. काही फळांमध्ये बाह्य आवरण हे मऊ / अगदी पातळ / मांसल / अत्यंत टणकदेखील असू शकते. याचप्रमाणे हे बाकीच्या दोन आवरणांच्या बाबतीतदेखील असू शकते. परंतु एक मात्र नक्की, की ही तिन्ही आवरणे कोणत्या तरी स्वरूपांत असल्याशिवाय त्याला खरे फळ म्हणता येत नाही. याशिवाय यामध्ये बिया वेगवेगळ्या स्वरूपात असतात. आता सफरचंदाच्या बाबतीत काय आहे ते बघूया. जेव्हा आपण सफरचंद कापून त्याचे बरोबर दोन तुकडे करतो त्यावेळी फळांच्या केंद्रभागी कडक असा भाग असतो. आपण सफरचंद खाताना हा भाग नेहमी फेकून देतो. पण खरं तर वरील व्याख्येनुसार हा जो भाग आपण फेकून देतो, तेच तर खरे फळ आहे. या भागामध्येच वर नमूद केलेल्या फळाचे तिन्ही भाग पाहावयास मिळतात. परंतु गंमत म्हणजे फळांचे हे मुख्य भाग खाण्यायोग्य नसतात. म्हणूनच आपण सफरचंदाचा मधला भाग बियांसकट टाकून देतो. मग असा प्रश्न पडतो, की जो भाग आपण खातो तो काय आहे? मुख्य फळ- जे केंद्रस्थानी आहे व त्याच्या सभोवताली फळाचा मांसल भाग विस्तारलेला असतो. म्हणजेच फुलामध्ये बीजांडकोषाच्या भोवती असणारे आवरण- जे इतर फळामध्ये निघून जाते, ते या ठिकाणी तसेच राहते व मुख्य फळ न वाढता या आवरणाचीच वाढ होत जाते. या प्रकारे मुख्य फळ हे बंदिस्त होऊन जाते.
हे समजून घेण्याकरिता एक सफरचंद घ्या व त्याचे बरोबर मधोमध दोन भाग करा. या तुकडय़ांचे नीट निरीक्षण करा. बघा बरं आपल्याला यातील मूळ फळ पाहता येते का? शेजारी जी आकृती दिली आहे त्याप्रमाणे हे भाग दिसतात का? खरे तर यासारखी आणखीही काही फळे आहेत. ती याप्रमाणे ओळखता येऊ शकतील का? तुम्हाला शक्य असेल तर काजूचे फळ अवश्य बघा व निरीक्षण करून मला कळवा. याशिवाय आपण जी नेहमी फळे खातो (उदा. केळं, पेरू, द्राक्षे, चिकू, नारळ, टोमॅटो, वांगे इत्यादी) त्यांतील कोणते भाग आपण खातो व कोणते टाकून देतो, याची यादी आपल्याला तयार करता येईल. या वैशिष्टय़पूर्ण अभ्यासाची मांडणी तुम्हाला एखाद्या तक्त्यावरदेखील करता येऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा