मित्रांनो, आता श्रावण महिन्यापासून विविध उत्सव सुरू झाले आहेत. नागपंचमी, गणपती, नारळी पौर्णिमा, दसरा, दिवाळी, इत्यादी. मग आपल्या आवडत्या आरत्या म्हणणं, मस्त गोड-धोड पदार्थ फस्त करणं, गरबा खेळणं व नवे कपडे घालून भटकणं अशा कितीतरी धम्माल गोष्टी करता येतील. या सर्वच सणांतून आपल्याला निसर्गप्रेमाची शिकवणही मिळते.
भारतीय वेदिक परंपरेत सर्व प्राणी, वनस्पती व निसर्गाला देवाचंच रूप मानलं जातं. हाच संदेश आपल्या सणांमधून देण्यात येतो. साप माणसाचे मित्र आहेत. उंदीर जास्त झाले तर शेतीची खूप नासाडी करतात. त्यांना खाऊन साप आपली नेहेमीच मदत करतात. अशा सापांच्या रक्षणाचं महत्त्व आपल्याला कळावं म्हणून नागपंचमी साजरी केली जाते.
आपले लाडके गणपती बाप्पा सर्व गणांचे म्हणजे जीवांचे रक्षणकत्रे. बाप्पांचं डोकं हत्तीसारखं आहे, यावरून आपल्याला हे समजतं की त्यांची शक्ती व बुद्धी दोन्ही महान आहेत. जंगलातसुद्धा निसर्गाचं संतुलन राखण्यात हत्ती महत्त्वाची कामगिरी बजावतात. म्हणूनच बाप्पांचं रूप असलेल्या हत्तींना आपल्या देशात मारत नाहीत.
पूजेकरता आपण विविध झाडांची पानं-फुलं आणतो. त्यानिमित्ताने सर्व प्रकारची झाडं आपण टिकवून ठेवावी, हा त्यामागचा हेतू आहे. बाप्पांचं वाहन असलेल्या उंदरासारख्या छोटय़ा प्राण्याचंही निसर्गात स्थान आहेच.
आपले कोळी बांधव पावसाळ्यात मासेमारी करत नाहीत, कारण समुद्र खवळलेला असतो आणि त्या काळात माशांची पिल्लं जन्माला येतात. पिल्लांनाच आपण पकडून खाल्लं तर पुढच्या वर्षीपासून मासे मिळणारच नाहीत. पिल्लं मोठी झाली आणि समुद्र जरा शांत झाला की नारळी पौर्णिमा साजरी करून पुन्हा मासेमारी सुरू होते.
दसरा हा सण पावसाळा संपल्यावर येतो. चांगलं पीक येऊन भरपूर धान्य मिळालं म्हणून देवीच्या विविध रूपांची पूजा करून आभार मानले जातात. निसर्गदेवता याच देवीचं एक रूप आहे. उंदरांना खाऊन धान्याचं रक्षण करणाऱ्या घुबडांनाही लक्ष्मीचं वाहन मानलं जातं. थंडीत दिवस छोटे होऊन रात्री मोठय़ा होतात व अनेक झाडांची पानं गळतात. त्याआधी येणाऱ्या दिवाळीच्या सणात रंगीत आकाश कंदील व मातीच्या पणत्या लावून आणि सुंदर रांगोळ्या काढून थंडी पडण्यापूर्वीचा समृद्ध निसर्ग साजरा केला जातो.
बाप्पाच्या निसर्गातील कोणत्याही बाळाला त्रास होणार नाही अशा प्रकारे आपण सण साजरे केले पाहिजेत! शाडूच्या मातीच्या मूर्ती आणून, नसíगक साधनांपासून केलेली मखरं वापरून व जास्त आवाज न करणारे मोजकेच फटाके वाजवून आपण बाप्पांना नक्कीच प्रसन्न करू शकतो! ल्ल
निसर्गसोयरे – भारतीय उत्सव आणि निसर्ग
मित्रांनो, आता श्रावण महिन्यापासून विविध उत्सव सुरू झाले आहेत. नागपंचमी, गणपती, नारळी पौर्णिमा, दसरा, दिवाळी, इत्यादी.
आणखी वाचा
First published on: 18-08-2013 at 01:04 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian festivals and nature