पहिला तास संपल्याची घंटा झाली, तशा नाईकबाई आपलं हजेरी बुक घेऊन वर्गातून बाहेर पडल्या. आज त्या जरा रागातच होत्या. त्या तशाच मुख्यध्यापिकांच्या केबिनमध्ये शिरल्या आणि हातातला पिशव्यांचा गठ्ठा दाखवत म्हणाल्या, ‘‘पाहा मॅडम, आपण एवढय़ा सूचना देऊनसुद्धा आज मला नववी ‘अ’ मधून या एवढय़ा प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त कराव्या लागल्या.’’
‘‘हं , म्हणजे मुलांचे हे उद्योग अजून चालूच आहेत तर!’’ दातार मॅडम म्हणाल्या. होळी आणि रंगपंचमीच्या आधी मुलांच्या दप्तरातून या अशा पिशव्या नेहमीच जप्त होत असत. याशिवाय या दिवसात आणि एरवीही वर्षभर मुलं शाळा सुटल्यावर वॉटरबॅगमधल्या पाण्याने एक तर रंगपंचमी खेळत किंवा ते पाणी चक्क आवारात ओतून देत असत. या सगळ्या प्रकारामुळे शाळेच्या परिसरात फार चिखल होई आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच होत असे. या बाबतच्या अनेक तक्रारी मॅडमकडे या आधीही आल्या होत्या. त्याबरोबरच शाळेसमोरच्या कचरापेटीची समस्याही सतावत होतीच. मुलांना शिक्षा करून किंवा महानगरपालिकेकडे तक्रार करून मार्ग काढण्यापेक्षा काहीतरी वेगळा उपाय योजावा असं मॅडमना वाटत होतं. त्यासाठी त्यांनी शिक्षक आणि सेवक वर्गाची तातडीने सभा घेतली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रार्थना झाल्यावर दातार मॅडमनी सगळ्या मोठय़ा वर्गाना एक एक करून मैदानावर बोलावून घेतले. मुलांना कळेना, आज तर पी.टी चा तास नाही, मग का बरं बोलावलं असेल मैदानात? बहुतेक आज सगळ्यांना ओरडा बसणार असेल. मुलं आपापसात असंच आणि यावरच कुजबुजत होती. मैदानात आल्यावर मुलांना रांगेनं बसवलं गेलं. वर्गशिक्षिका बाजूलाच उभ्या होत्या. भिरभिरत्या डोळ्यांनी मुलांच्ां निरीक्षण सुरू होतं. मैदानात एका कोपऱ्यात झाडांची वेगवेगळी रोपं ठेवली होती. मातीही होती. सुकलेलं शेणखत होतं. मॉस स्टीक होत्या, बराचसा पालापाचोळा, उसाची चिपाडं होती. एका अंगाला बागकामाचं साहित्य आणि जुन्या प्लॅस्टिकच्या बाटल्या होत्या. बांबूच्या टोपल्या, तुटके बांबू असं बरंचसं निरुपयोगी सामानही दिसत होतं. हे सर्व पाहून मुलांचं कुतुहल वाढलं. त्यांची उत्सुकता फार न ताणता दातारमॅडमनी बोलायला सुरुवात केली,
‘‘तुम्हा सर्वाना असं अचानक मैदानावर बोलावलं याचं फार आश्चर्य वाटलं असेल ना? पण तसंच एक कारण आहे, म्हणून आपण सगळे इथे जमलो आहोत. आज आपण आपली शाळेची बाग तयार करणार आहोत. तुम्हाला पाण्याशी खेळायला आवडतं ना? पाणी फवारणं, शिंपडणं यातील गंमत तुम्हाला हवी असते. आता हे सगळं आपल्याला रोजच करायचय. त्याची मजा घ्यायची आहे. इथे कोपऱ्यात बाग कामाचं सर्व साहित्य, रोपं, माती वगैरे आणून ठेवली आहे. तुमच्यापैकी प्रत्येकाने एक एक झाड लावायचं आहे. वर्गशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वर्गाने बाग तयार करायची, तिला रोज आपल्या वॉटरबॅगमधलं उरलेलं पाणी शिंपडायचं. या कामातला आनंद घेताना फक्त एकच गोष्ट पाळायची- ती म्हणजे शिस्त मोडायची नाही, वस्तूंची नासाडी करायची नाही.’’ बाईंचं बोलणं चालू असतानाच मुलांमध्ये आनंदाची लहर पसरली होती. मातीत हात घालून काम करणं किंबहुना असं काही वेगळं करणंच मुलांना खूप आवडणारं होतं. मुलं उत्साहाने कामाला लागली. स्काउट-गाईडची मुलं आणि वर्गशिक्षक यांच्या मदतीने मुलांनी बागेची नेटकी आखणी केली. नववीच्या मुलांनी छोटे वाफे करून मोसमी फुलझाडं लावली. काही औषधी वनस्पती लावल्या. सातवीच्या वर्गानी बांबूच्या टोपल्यांमध्ये भाज्यांच्या बिया पेरल्या. या टोपल्या आडव्या कमानींवर टांगून त्याची बागेच्या वरतीच एक टांगती बाग तयार झाली. सहावीच्या वर्गानी तुटके बांबू आणि प्लॅस्टिकच्या निरुपयोगी बाटल्या यांच्यात खाचा करून शोभेची रोपे लावली. भिंतीलगत जाळीच्या कमानीवर त्यांची रचना करून त्यांनी आपली भिंतीवरची बाग सजवली. पाचवीतली छोटी मुलं तर फारच उत्साहात होती. त्यांनी प्लॅस्टिकच्या टाकाऊ पिशव्या आणि डब्यात रोपं लावली. दहावीच्या वर्गातील मुलांनी बागेत सुंदर तळी तयार केली. मातीत छोटे खड्डे करून त्यावर प्लॅस्टिकचे टाकाऊ बॅनर पसरून त्यांनी त्यात पाणी साठवण्याची व्यवस्था केली. अशा तऱ्हेने तयार झालेल्या तळ्यांमध्ये त्यांनी कमळाचे वेल लावले. बघता बघता देखणी बाग तयार झाली. शाळा सुटताना नियमितपणे मुलं आपलं वॉटर बॅगमधलं पाणी झाडांना घालू लागली. टांगत्या, भिंतीवरच्या आणि तळ्यातल्या बागेची रचना केल्यामुळे थोडं पाणी सगळ्या बागेला पुरत होतं. बागेच्या या टप्प्याटप्प्याच्या रचनेमुळे पाण्याची बचतच होत होती. आपल्या पहिल्या प्रयोगाला आलेलं हे यश पाहून दातारमॅडमचा मुलांवरचा विश्वास दृढ झाला.
आता सोडवायची होती ती कचऱ्याची समस्या. यासाठी बाईंनी चक्क मुलांचीच सभा घेतली. मुलांनी अनेक उपाय सुचवले. शेवटी कचऱ्यातून खत निर्माण करण्याचा प्रयोग करायचे ठरले. वाढत्या बागेला मातीची गरज होतीच, तीही यामुळे भागणार होती. मुलंच ती, पुन्हा एकदा उत्साहाने कामाला लागली. शाळेसमोरील कचराकुंडीत जमा होणारा कचरा मुख्यत्वे लग्नाच्या जेवणावळीतील उरलेल्या अन्नाचा होता. मुलांनी शाळेसमोर असलेल्या लग्नकार्यालयाच्या व्यवस्थापकांची भेट घेतली आणि त्यांना ओला आणि सुका कचरा वेगळा साठवण्याची विनंती केली. शाळेच्या कॅन्टिनमधलाही ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी स्वतंत्र कचरापेटय़ा ठेवल्या. ओला कचरा आता वाया न जाता त्यापासून उत्तम गांडूळखत तयार होऊ लागलं. मॅडमनी त्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या व्यक्तींना शाळेत बोलावलं होतं. मुलांनी हाही उपक्रम यशस्वी केला.
शिक्षेने जे घडलं नसतं ते प्रेरणेने घडलं. पर्यावरणाचा अभ्यास, पाणी बचत, परिसर स्वच्छता याबरोबरचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांचा आनंद साधला गेला. मुलांची ऊर्जा सकारात्मक कार्याकडे लावल्यास ती परिवर्तन घडवू शकते याचा दातारमॅडमना पुन्हा एकदा प्रत्यय आला.
मुलांच्या उत्साही सहभागाने आणि बाईंच्या कल्पकतेने दोन्ही समस्यांवर कायमस्वरूपी उत्तर सापडलं होतं. शाळेभोवतालचा स्वच्छ परिसर आणि शाळेची बाग शाळेच्या सौंदर्यात भर घालत होती.
मैत्रेयी केळकर mythreye.kjkelkar@gmail.com
शाळेची बाग
पहिला तास संपल्याची घंटा झाली, तशा नाईकबाई आपलं हजेरी बुक घेऊन वर्गातून बाहेर पडल्या.
Written by मैत्रेयी केळकर
आणखी वाचा
First published on: 31-07-2016 at 01:05 IST
मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inspirational story for kids