तीन दिवस शाळेला सुट्टी होती. मस्त धमाल करता येईल म्हणून वैष्णवी खूश होती. पण त्याहीपेक्षा आणखी एक कारण तिच्या आनंदाला होतं, ते म्हणजे शंतनू दादा घरी येणार होता. शंतनू, वैष्णवी, वेदव्रतचा फार लाडका होता. तो आला की खूप मजा यायची. या वेळेला दादा येणार होता तो मुलांना सहलीला घेऊन जाण्यासाठी. नेहमीची गर्दीची ठिकाणं टाळून शंतनू मुलांना ‘संजय गांधी नॅशनल पार्क’मध्ये घेऊन जाणार होता. शनिवारी सकाळीच कोणीही न उठवताच वैष्णवी आणि वेदव्रत अगदी वेळेवर उठले. आईने कॉफीचा थर्मास, सॅडविचेस, पराठे आणि भरपूर सुका नास्ता असलेली सॅक आधीच तयार ठेवली होती. टॉर्च, वही, पेन, ओडोमॉस असं सगळं जंगल सफरीचं आवश्यक सामान घेऊन स्पोर्टशूज आणि जंगलाच्या रंगाशी मिळतेजुळते कपडे घालून मुलं जंगल सफरीला तयार झाली. ठरल्या वेळी सगळे निघाले. परी, सुषमा, ऋजुता, राधा, यश अशी इतर दोस्तमंडळीही होतीच बरोबर. भल्या सकाळी निघाल्यामुळे लोकलला गर्दी नव्हती. सगळ्यांना अगदी आरामात खिडकीजवळच्या जागा मिळाल्या आणि धमाल- मस्तीला सुरुवात झाली. गाणी, नकला, जोक्स मुलांना नुसतं उधाण आलं होतं. ‘ब्लू है पानी पानी’पासून सुरू झालेली त्यांची अंताक्षरी ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी..’ पर्यंत खूप वेळ चालली. यशने तर चक्क एक हिंदी गाणं संस्कृतमध्ये म्हणून दाखवलं.
अशी मजा करीत करीतच मुलं पार्कमध्ये पोहोचली. पाऊस पडतच होता. भिजायचं असल्यामुळे छत्र्या आणलेल्याच नव्हत्या. फक्त खाऊ आणि पाण्याच्या बाटल्या एवढंच काय ते सांभाळायचं होतं. त्यामुळे सगळेच जण सुटसुटीत फिरायला मोकळे होते. शंतनू दादाने पार्कच्या गेटजवळच्या ऑफिसमध्ये जाऊन परवानगीचे सोपस्कार पूर्ण केले आणि सगळे जंगलाच्या वाटेला लागले.
रिमझिम पडणारा पाऊस आणि सभोवती गर्द झाडी, मधेच ऐकू येणारे पक्ष्यांचे आवाज, सगळं कसं एकदम झक्कास होतं. ए रवी भरपूर दंगा करणारी बच्चेकंपनी भवताल निरखण्यात अगदी रंगून गेली होती. लांबवरून वाहत्या पाण्याचा आवाज येत होता. झुडपांना लागलेल्या कोळ्यांच्या जाळ्यांमध्ये अडकलेले इवले पाण्याचे थेंब हिऱ्यासारखे चमकत होते. वाटेत लागणाऱ्या छोटय़ा झऱ्यांचे तुषार अंगावर घेत चालताना वेगळाच आनंद वाटत होता. हिरव्या रंगाच्या अनेक छटांनी जंगल नुसतं फुलून आलं होतं. आपण मुंबईसारख्या शहरात आहोत यावर विश्वासच बसत नव्हता. सगळे हळूहळू, पण उत्सुक पावलांनी पुढे चालले होते. जमिनीलगत वाळक्या पानांवर भूछत्रं उगवली होती. ती इतकी सुरेख होती की त्यांना हात लावायचा मोह आवरता येत नव्हता.
‘‘उगवलेली सगळीच भूछत्रं म्हणजे मशरूम्स काही खाण्यायोग्य नसतात. काही सुरेख, रंगीबेरंगी मशरूम्स तर चक्क विषारी असतात.’’ दादाने जाताजाता माहिती दिली. वाटेत वाकडय़ा शेंगांची, भगव्या फुलांची मुरुड शेंगेची झुडपं म्हणजे इंडियन स्क्रू प्लँटस् दिसत होती. आजीच्या बटव्यातील मुरुड शेंग इथे पाहून राधाला फार गंमत वाटली. तिच्या छोटय़ा भावाच्या बाळगुटीत आजी हीच शेंग उगाळून देत असे.
पावसाळ्यात उगवणारी ‘सीतेची आसवं’ सगळीकडे भरपूर उगवली होती. जांभळ्या फुलांची ती तुर्रेदार वनस्पती जंगलाच्या सौंदर्यात भरच घालत होती. मुलं सगळं निरखत पुढे पुढे चालत होती. एवढय़ात एका झाडापाशी जाऊन दादा थांबला आणि म्हणाला, ‘‘हा आहे भुत्या.’’
‘‘भुत्या.’’ ऋजुता जोरात ओरडलीच. ‘‘हो, भुत्या म्हणजे घोस्ट ट्री. रात्रीच्या अंधारात आपल्या पांढऱ्या खोडामुळे हे झाड एखाद्या भुतासारखंच दिसत.’’ दादाने माहिती दिली. पांढऱ्या शुभ्र खोडाचं, फांद्यांचा पसारा मिरवणारं ते झाड सुषमाला खूप आवडलं. तिने त्याबरोबर आपले एक-दोन सेल्फी काढून घेतले. मिहीरने ही नवी माहिती आपल्या डायरीत नोंदवून घेतली.
थोडं पुढे गेल्यावर शंतनू अचानक थांबला. त्याने मुलांना नीट निरखून पाहायला सांगितलं. दोन मोठय़ा झाडांच्या फांद्यांना जोडून विणलेलं एक भलं थोरलं कोळ्याचं जाळं होतं. जाळ्याच्या मध्यभागी हिरवट- पिवळ्या रंगाचा कोळी मजेत झोपला होता. एखादी लफ्फेदार सही करावी तशी जाळ्यावर पांढरी नक्षी होती. हा होता ‘सिग्नेचर स्पायडर’. मुलांनी त्याचे वेगवेगळ्या कोनांतून भरपूर फोटो काढले.
तोवर दादा बराच पुढे गेला होता. सगळे धावतच तिथवर पोहोचले. दादाने हातात काठी घेतली होती. मुलं जवळ आल्यावर त्याने सगळ्यांना गोल उभं केलं आणि जमिनीवरचं घरटं दाखवलं. वारुळात राहणाऱ्या मुंग्यांची मोठी मोठी घरं म्हणजे ‘अॅन्ट हिल्स’ ताडोबाच्या जंगलात मिहीरने पाहिली होती. पण हे सपाटीवरचं मुंगीचं घर मजेदार होतं. मातीच्या छोटय़ा भिंतींची वर्तुळाकार नक्षीच होती ती. ‘‘हे आहे हारवेस्टर अॅन्टचं घरं’’ दादा सांगू लागला. ‘‘ही मुंगी आपल्या शरीरातून पाझरणाऱ्या द्रवाचा उपयोग करीत मातीचं हे असं घरटं तयार करते. यात अनेक प्रकारचं धान्य आणि बिया साठवते. कधी अन्नाची खूप चणचण जाणवली तर आदिवासी लोक या मुंगीच्या घराचा शोध घेतात. कारण आपल्या या छोटय़ाशा घरात ही मुंगी चक्क दोन-चार किलो धान्य साठवते.’’
‘‘ही तर चक्क सीड बँकच झाली की!’’ परी म्हणाली.. सगळ्यांनाच परीचं म्हणणं पटलं.
सकाळपासून बरंच चालून झालं होतं. आता पोटात कावळे ओरडायला लागले होते. सर्वाना एकत्र बसता येईल असं ठिकाण सापडताच दादा थांबला. छोटय़ा ओहळाचं पाणी एका ठिकाणी जमा झालं होतं. त्यातच मधे मधे बसता येतील असे रुंद खडक होते. बसायला ही जागा सोयीची होती.
मुलांनी पटापट उडय़ा मारत जागा पटकावल्या. भराभर डबे उघडले, कॉफीचे मग भरले. खडकावर बसून पाण्यात पाय सोडून मजेत वनभोजन सुरू झालं. पाण्यावर चालणारे काळसर कीटक आपल्या पायांची नक्षी उमटवत होते. राधा बराच वेळ त्याकडे पाहात होती. शेवटी हातातला पराठय़ाचा शेवटचा तुकडा संपवत तिने शंतनू दादाला त्या कीटकांबद्दल विचारलंच. ‘‘ते आहेत वॉटर स्पायडर, म्हणजे पाणकोळी. जमिनीवर आणि पाण्यात असे ते दोन्हीकडे राहू शकतात.’’ दादा म्हणाला.
पाण्याच्या बाहेर राहणारे कोळी माहितेयत, पण पाण्याच्या आत हे कसे राहत असतील, वेदव्रतला प्रश्न पडला होता. ‘‘अरे तीच तर खरी मजा आहे. हे कोळी पाण्याच्या बुडबुडय़ांबरोबर आपलं जाळं विणतात आणि त्या बुडबुडय़ालाच आपलं घर बनवतात. पाण्याखाली मग त्या घरात ते मजेत राहतात.’’ दादाने एवढं सांगताच सगळेच पाण्यात डोकावू लागले. बराच वेळ मग त्या कोळ्यांची घरं शोधण्यात आणि डान्स पार्टी पाहण्यात गेला.
आता चार वाजत आले होते. घरी परतायला हवं होतं. दिवसभर हिंडता हिंडता बरीच माहिती मिळाली होती. गोळा केलेल्या झाडांच्या नमुन्यांनी पिशव्या भरल्या होत्या. सायन्सच्या पुस्तकात वाचतो, पाहतो त्यापेक्षा निसर्ग अधिक सुंदर आहे याची जाणीव मुलांना झाली होती. गंमत म्हणजे काहीही पाठ न करता सगळी नावं, वैशिष्टय़ं मुलांना जशीच्या तशी आठवत होती.
वैष्णवी त्यावर फिल्ड रिपोर्ट लिहिणार होती. राधा हरबेरिअम्स् बनवणार होती. वेदव्रतला शाळेच्या अंकात लेख लिहावासा वाटत होता. तर परी घरी जाऊन पाहिलेल्या झाडा-कीटकांची अधिक माहिती यूटय़ूबवर शोधणार होती. मनातल्या मनात असे अनेक बेत करीत मुलं घरी परतत होती.
मैत्रेयी केळकर mythreye.kjkelkar@gmail.com