‘‘हा राजगड किल्ला.. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी. राज्याभिषेकानंतर त्यांनी ही राजधानी रायगडाला स्थलांतरित केली. या किल्ल्यावरून सिंहगड आणि तोरणादेखील दिसतात.’’ उदय दादा सोसायटीमधील काही सातवी-आठवीमध्ये शिकत असलेल्या मुला-मुलींचा ग्रुप घेऊन राजगड किल्ल्याच्या ट्रेकवर आला होता. निमित्त होतं शिवाजी महाराजांच्या जयंतीचं. मुलंही भरपूर उत्साहात होती, कारण सगळी पहिल्यांदाच राजगड चढणार होती.
‘‘दादा, कुठल्या रस्त्याने चढू या? मी गुगल केलं होतं. बरेच रस्ते आहेत.’’ चमूमधल्या तंत्रस्वामी सोहमचा प्रश्न.
‘‘चोर दरवाजातून पद्मावती माचीपर्यंत गुंजवणे गावातून जाणारा.. साधारण तीनेक तास लागतील आणि पुन्हा खालीही उतरायचंय वेळेत.’’ दादाने जाहीर केलं. सगळे लगेचच ट्रेकला लागले. सगळ्यांच्या पाठीवरच्या सॅकमध्ये पिण्याचं पाणी आणि थोडे खाण्याचे पदार्थ होते. काही अंतर पार करून झाल्यावर सगळे एका ठिकाणी विसावले. गडाभोवतालचा परिसरही डोळे दिपवणारा होता. सह्यद्रीच्या पर्वतरांगा सुरेख दिसत होत्या. ज्यांच्याकडे कॅमेरे होते त्यांनी पटापट फोटो टिपले.
‘‘दादा, शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला ना?’’ सीमाने उत्सुकतेनं विचारलं.
‘‘अगदी बरोबर. त्यांचे वडील शहाजीराजे हे आदिलशहाच्या सेवेत होते. महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना स्वत:च्या बळावर, अनेक अवघड प्रसंगांना सामोरं जाऊन केली. त्यांना मार्गदर्शन करायला अर्थात जिजामाता आणि त्यांचे गुरू दादोजी कोंडदेव होतेच. पण निव्वळ सोळाव्या वर्षी, मूठभर मावळ्यांसह त्यांनी रायरेश्वराच्या देवळात आपली करंगळी कापून, शिवलिंगावर रक्त वाहून हिंदवी स्वराज्य स्थापण्याची शपथ घेतली. इतक्या लहान वयात विचारांनी बघा किती प्रगल्भ होते ते!’’
‘‘म्हणजे आमच्याहून थोडेच मोठे. ग्रेट! ते इतके अवघड गड रातोरात कसे चढत असतील? आपल्याला तर आत्ताच दम लागलाय.’’ सई पाणी पीत म्हणाली.
‘‘मला तर त्यांची ‘अफझलखान भेट’ वाचायला जाम आवडतं. तो किती धिप्पाड होता तरी महाराजांनी कसलं चकवलं त्याला!’’ हे सांगताना मुक्ताच्या चेहऱ्यावरचे आश्र्चयाचे भाव लपत नव्हते.
‘‘शक्तीपेक्षा युक्ती बरेचदा श्रेष्ठ ठरते. शत्रू बलाढय़ असो किंवा जिंकायला अवघड असो, महाराजांनी त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांना साथ देणाऱ्या मावळ्यांवरचा विश्वास कधीच ढळू दिला नाही. आमच्या मेनेजमेंटच्या लेक्चर्समध्ये आमचे एक सर महाराजांना ‘मेनेजमेंट गुरू’ म्हणतात आणि नेहमी अफझलखानच्या वधासाठी केलेल्या त्यांच्या ‘प्लानिंग’चं मेनेजमेंटच्या दृष्टिकोनातून उदाहरण देतात. जेव्हा महाराजांना समजायचं की शत्रू बलाढय़ आहे आणि सद्य:परिस्थितीत त्याला हरवणं शक्य नाही, तेव्हा ते तिथून तात्पुरती माघारही घ्यायचे आणि पुन्हा नव्या जोमाने आणि ताकदीने ते त्याचा सामना करायचे.’’ दादाने माहिती दिली.
‘‘महाराज एकदम ‘सेक्युलर’ होते नं?’’ ईशाने भारीच प्रश्न विचारला.
‘‘म्हणजे धर्मनिरपेक्ष! बरोबर. त्यांची थोरवी यातच होती की त्यांनी सगळ्याच धर्माना समान मानलं. त्यांच्या राज्यात कुठल्याही जातीचा किंवा धर्माचा माणूस अगदी नि:संकोचपणे वावरू शकायचा. मुळात ते जात-लिंग-धर्मभेद मानीत नव्हते. केवळ पात्रतेच्या जोरावर ते योग्य माणसांची योग्य पदांवर नियुक्ती करायचे. त्यांच्या सैन्यदलात आणि नौदलात अनेक मुसलमान अधिकारी होते. जेव्हा ते आग्य्राला औरंगजेबाच्या भेटीला गेले तेव्हा त्यांची सोबत मदारी मेहतर नावाच्या एका मुसलमान मुलाने केली होती. मुघलांनी तेव्हा आपली बरीच देवळं उद्ध्वस्त केली, पण महाराजांनी कधीच कुठल्याही मशिदीला धक्का लावला नाही. धर्मग्रंथांचा कधी अवमान केला नाही. त्या काळी स्त्रियांवरही खूप अत्याचार व्हायचे, पण शत्रूला हरवल्यावरसुद्धा महाराजांनी त्यांच्याकडील स्त्रियांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. पण आज साडेतीनशे वर्षांनंतरही जात-धर्म-लिंग या बेडय़ांतून आपला समाज मुक्त झालेला नाही.’’
‘‘आजही स्त्रियांवर अत्याचार होतच आहेत की! मग खरंच आपण महाराजांच्या विचारांचं अनुकरण करतोय का?’’ ईशा तावातावाने म्हणाली.
‘‘नाहीच करत आहोत. महाराजांचे नुसते फोटो लावून किंवा शिवजयंतीला लाउड स्पीकरवरून त्यांची गाणी वाजवून त्यांचे विचार जिवंत नाही राहणार!’’ इतक्यात दिनेशने चिप्सचं रिकामं पाकीट रस्त्यावर टाकलं. उदय दादाने ते बरोब्बर बघितलं.
‘‘पाहा, आपली संस्कृती असलेल्या या किल्ल्यांचं आपण किती छान जतन करतोय! किल्ल्यांवर होणाऱ्या पाटर्य़ा, पिकनिक्स आणि मागे राहणारा ढीगभर कचरा याबद्दल काय बोलणार? ज्याचं त्याला कळलं पाहिजे.’’ दादाने ते पाकीट उचलून स्वत:च्या सॅकमध्ये ठेवलं. ते पाहून दिनेश ओशाळला.
‘‘दादा, अजून सांग नं महाराजांबद्दल.’’ वेदश्री विषय बदलत म्हणाली.
‘‘महाराज एक द्रष्टे नेते होते, मुत्सद्दी होते. त्यांच्यासाठी प्रत्येक मावळा आपल्या प्राणांची आहुती द्यायला नेहमीच तयार होता. कोंढाणा, म्हणजे आज आपण ज्याला सिंहगड म्हणून ओळखतो, तो जिंकताना तानाजी मालुसरेंनी किंवा पावनखिंड लढताना बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या राजाप्रतिची निष्ठा दाखवून दिली. आजही सीमेवर आपले जवान देशासाठी प्राणांची आहुती देत आहेत. पण त्यांना प्रेरणा द्यायला खरंच आज कुणी शिवाजी महाराज आहेत का?’’
‘‘त्यांना मुघल ‘दख्खन का चूहा’ म्हणायचे नं?’’ मधुराने विचारलं.
‘‘महाराष्ट्र हा गडांचा प्रदेश आहे. मुघलांना अशा प्रदेशाची फारशी माहिती नव्हती हे महाराजांनी बरोबर ताडलं. अखंड मावळ प्रदेश मग महाराजांनी पिंजून काढला. अनेक गड बांधले, काही काबीज केले. डोंगराळ प्रदेशाचा फायदा घेऊन त्यांनी मुघलांना आणि आदिलशाहला रोखण्यात यश मिळवलं. डोंगराळ भागांतून ते कसा हल्ला करायचे किंवा शत्रूचा डोळा चुकवून कसे धूर्तपणे सटकायचे ते कुणालाच कळत नसे. म्हणून त्यांना ‘दख्खन का चूहा’ म्हणायचे. त्याचप्रमाणे त्यांनी आरमाराचं महत्त्वही चोख जाणलं होतं. त्यांच्या आरमारात जहाजं बनवण्यासाठी आणि त्यांच्या दुरुस्तीसाठी तीनशेहून अधिक कारखाने होते. अनेक गलबतं होती, समुद्रातील किल्ले होते- ज्यांच्या साहाय्याने ते तीनशे मैलांच्या सागरी किनारपट्टीची राखण करायचे. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हणतात. त्यांच्या स्मरणार्थ लोणावळा इथे INS Shivaji Naval Station स्थापित केलं आहे. रामदास स्वामी त्यांना ‘सर्वज्ञ’ म्हणायचे.’’ गप्पागोष्टी करत आता बराच वेळ झाला होता. पुढचा रस्ता सगळ्यांना खुणावत होता.
‘‘कवी भूषण यांनी त्यांच्या शिवराजभूषण या कवितेत महाराजांचं किती समर्पक वर्णन केलंय ऐका :
तेज तम अन्स पर, कन्ह जिमि कंस पर,
त्यों म्लेंच्छ बंस पर, सेर सिवराज है!’’
अर्थात, कृष्णाने जसा त्याच्या अत्याचारी कंसमामाचा वध केला, त्याचप्रमाणे एक आशेचा किरण बनून महाराजांनी औरंगजेबाच्या आणि इतर म्लेंच्छांचा म्हणजेच आदिलशाह, निजाम वगैरेंच्या अत्याचारांमुळे सर्वत्र पसरलेल्या अंध:काराचा नाश केला आणि म्हणून ते ‘शेर शिवराज’ ठरले.’’ उदय दादा उठत म्हणाला.
महाराजांच्या गोष्टी ऐकून ‘‘जय भवानी, जय शिवाजी’’ असा जयघोष करत गडाचा पुढचा टप्पा सर करण्यासाठी सर्वानी कुच केली..
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com