विद्या डेंगळे

कंटाळा सर्वांनाच येतो तसा एका रेल्वे स्टेशनजवळच्या कावळ्यालाही आला. सीतापूर स्टेशनातच एक मोठं हिरवंगार कडुलिंबाचं झाडं होतं. सीतापूर स्टेशन शांत, सुंदर रिकामं रिकामंच असायचं. धिम्या गतीच्या काही गाड्याच तिथं थांबायच्या. स्टेशनच्या एका बाजूला जरा दूर सीतापूर गाव होतं. बाहेर २-४ सायकल रिक्षा उभ्या असायच्या, तर एखाद-दुसरी केळीवाल्यांची हातगाडी असायची. बरेच गप्पिष्ट इकडे-तिकडे गप्पा मारत बसलेले असायचे. स्टेशनच्या दुसऱ्या बाजूला सर्वत्र शेती होती. बरीच वर्षं कावळा त्या झाडावर बसून गाड्यांची ये-जा बघत असायचा. गाडीतून फेकून दिलेलं अन्न पोटभरीसाठी कावळ्याला मिळायचं, त्यामुळे कावळा उपाशी कधी राहिला नाही. गाडी गेली की स्टेशनवर शुकशुकाट पसरायचा. या रटाळ आयुष्याला कावळाही कंटाळला होता.

कावळे दाम्पत्याला नुकतीच पिल्लं झाली होती आणि ती बऱ्यापैकी मोठी झाली होती. पिल्लांची आई अजून त्यांच्याभोवती घोटाळायची. कावळा मधेच कावकाव करत कंटाळून स्टेशनवर चक्कर मारून दुसऱ्या क्रमांकावरच्या फलाटावरच्या झाडावर जाऊन दुसऱ्या बाजूने येणाऱ्या गाडीची वाट पाहत बसायचा.

एक दिवस तो असाच दुसऱ्या फलाटावर बसला होता आणि तेवढ्यात गाडी आली. गाडी सीतापूर स्टेशनात दोनच मिनिटे थांबली. आठ-दहा लोक त्यातून उतरले आणि थोडेच गाडीत चढले. गाडीला हिरवा सिग्नल मिळाला आणि जोरात भोंगा वाजवत गाडी सुटली. गाडी जशी हळूहळू स्टेशन सोडू लागली तसा कावळा झाडावरून उडून गाडीच्या टपावर जाऊन बसला. एक सेकंद त्याने मागे वळून त्याच्या कुटुंबाकडे पाहिलं, पण त्याला कोणीच दिसलं नाही. गाडीने थोडा वेग घेतला तसा कावळा टपावरून एका खिडकीच्या गजावर बसला. आत बसलेली बाई घाबरून किंचाळलीच, पण कावळा उडायचंच विसरला. मान वळवत आत डोकावू लागला तशी आत बसलेली मुलंही ओरडू लागली. तेव्हा कुठे कावळ्याला आठवलं की आपल्याला उडता येतं. तोपर्यंत त्याला डब्यातल्या माणसांना आणि मुलांना बघून मजा वाटत होती.

तो पटकन उडाला आणि जाऊन दुसऱ्या

डब्यातल्या खिडकीत बसला. तिथे सगळे झोपले होते म्हणून कोणी किंचाळलं नाही. वाऱ्यामुळे त्याचे डोक्यावरचे केस हलकेच उडत होते. पंखांवरची पिसंही भुरभुरत होती. मस्त मज्जा येत होती. त्या डब्यातली माणसं गाढ झोपली होती ते पाहून कावळा डब्यात शिरला. काही घोरत होते. कावळ्याला त्या आवाजाची गंमत वाटली. लोकांनी थोड्याच वेळापूर्वी खाऊन टाकलेल्या ताटातला चिकनचा तुकडा त्याने उचलून गडप केला आणि तो चालत चालत डबा कसा असतो ते पाहायला निघाला.

‘‘बाप रे! किती हे सामान!’’ कावळ्याच्या मनात आलं. खाली सामान, वर सामान, सामानच सामान. तो एका बर्थ खालच्या मोठ्या बॅगेवर जाऊन बसला. त्याच्या मोठ्या टोकदार चोचीने तो ती बॅग उघडायचा प्रयत्न करू लागला. त्या आवाजाने त्या बर्थवरचा माणूस जागा झाला आणि चोर चोर करून ओरडू लागला. कावळा घाबरून बॅगेमागे लपला. तिथे अंधार होता त्यामुळे तो कोणाला दिसला नाही. आपली बॅग तिथेच पाहून तो माणूस पुन्हा कूस वळवून झोपला आणि लगेचच घोरू लागला.

सगळं सामसूम झालेलं पाहून कावळा काळ्या पोशाखातल्या टीसीसारखा रुबाबात डब्यातून फिरू लागला. एक-दोन लोक जागे होते, पण एक पेपर वाचत होता तर दुसरा खिडकीतून बाहेर बघत होता, त्यामुळे त्यांचं कावळ्याकडे लक्षच गेलं नाही. आता मात्र कावळ्याला कंटाळा आला. त्याला डब्याबाहेर बेसिनमध्ये पाणी टपटप पडताना दिसलं आणि तो बेसिनवर चढून वाकडी मान करून पाणी पिऊ लागला. पाणी पिऊन तो खाली उतरला, पण त्याला पटकन उडून बाहेर जायला मार्ग सापडेना. तो फडफडत दोन दरवाजांच्या मध्ये फिरत राहिला. इतक्यात समोरून खराखुरा टीसी आला आणि त्याला कावळ्याची अडचण समजली. त्याने एक जाडजूड दार उघडून कावळ्याला उडायला मदत केली.

कावळा धडपडत उडाला. तोपर्यंत गाडीने चांगलाच वेग घेतला होता, त्यामुळे चालत्या गाडीत त्याला पुन्हा चढता येईना. बराच वेळ उडाल्यावर त्याला एकदाचं एक झाडं सापडलं. कावळा त्या झाडावर जाऊन निवांत बसला. त्या झाडावर इतर पक्षी नव्हते. गाडी निघून गेल्यामुळे कावळा हिरमुसला होऊन एका फांदीवर बसला. बराच वेळ शांत बसल्यावर त्याला झाडाखाली हालचाल जाणवली म्हणून वाकडी मान करून त्याने खाली पाहिलं तर त्याला कावळ्याचीच दोन छोटी पिल्लं झाडाखाली घाबरून बसलेली दिसली. छोटीशी ती पिल्लं थरथरत होती. कावळ्याने इकडेतिकडे नजर टाकली, पण त्याला काही त्या पिल्लांचे आईवडील दिसले नाहीत. तो पटकन झाडावरून उतरून पिल्लांकडे जाणार इतक्यात त्याला समोरून एक साप सरपटत येताना दिसला. तो साप तसा फार मोठा नव्हता, पण त्याचं लक्ष त्या दोन पिल्लांवर होतं आणि म्हणूनच ती पिल्लं थरथरत होती. क्षणभर कावळा त्या सापाशी दोन हात करायला घाबरला. त्याला त्याच्याच पिल्लांची एकदम आठवण झाली आणि त्याने त्या सापावर झडप घातली. सापानेही फणा काढला. कावळा मोठा हुशार! त्याने सापावर मागून हल्ला केला. मागून त्याला त्याच्या तीक्ष्ण चोचीने टोचू लागला. सापही चोच लागल्यामुळे वळवळू लागला आणि थोड्याच वेळात निपचित पडला.

सापाला त्याच स्थितीत सोडून कावळ्याने पिल्लांना पंखाखाली घेतले. कावळ्याला त्या पिल्लांना सोडून जाणाऱ्या त्यांच्या आईवडिलांचा चांगलाच राग आला होता. तो सबंध झाडात फिरून त्यांचं घरटं कुठे दिसतं का शोधू लागला. त्याला घरटं सापडलं, पण पिल्लांचे आईवडील काही दिसले नाहीत.

तो रागारागाने पुन्हा पिल्लांजवळ गेला आणि पाहतो तर काय! पिल्लांचे आईवडील पिल्लांना गोंजारत होते. मेलेल्या सापाचं थोडंथोडं मांस ते पिल्लांना भरवत होते. ते पाहून मात्र कावळ्याचा राग पळाला. त्याला त्याच्या पिल्लांची पुन्हा आठवण झाली. इतक्यात दुरून कावळ्याला रामपूरहून सीतापूरकडे जाण्याऱ्या गाडीच्या भोंग्याचा आवाज ऐकू आला आणि कावळा तिथून उडाला.

गाडीला लाल सिग्नल मिळाला आणि गाडी थांबली. कावळा पटकन टपावर बसला. गाडी सुरू झाली ती थेट सीतापूरलाच थांबली. टपावर बसून आल्यामुळे कावळा विस्कटलेल्या केसाने सीतापूरला गाडीच्या टपावरून उतरला आणि त्याच्या झाडाच्या फांदीवर जाऊन बसला. लगेचच त्याची पिल्लं आणि त्यांची कावळ्यावर रागावलेली आई त्याच्याभोवती बसून त्याच्या साहसाच्या गोष्टी चोची उघड्या टाकून कौतुकाने ऐकू लागले. कावळ्याच्या हृदयात पुढे खूप दिवस चालत्या गाडीचा ‘डोडोश्काऽऽऽ देन डोडोश्काऽऽऽ देन’ असा आवाज घुमत राहिला.

त्याला त्याच्या कंटाळ्यावर एक मस्त उपाय सापडला. त्याने ठरवलं, पुढच्या वेळी रामपूरहून दक्षिणेकडे जाण्याऱ्या गाडीतून फलाट क्रमांक एकवरून जायचं. तिथं नक्कीच काही तरी वेगळं बघायला मिळणार! आणि कावळ्याने कंटाळ्याला रामराम ठोकला!

vidyadengle@gmail.com