‘‘मकू, हे तुझ्यासाठी सरप्राइज!’’ मकूसाठी- म्हणजे मयंकसाठी आणलेलं खास गिफ्ट त्याला देत आशीषदादा म्हणाला. आशीषदादा म्हणजे मकूचा चुलतभाऊ . काही वर्षांपूर्वी रिसर्च करण्यासाठी तो अमेरिकेला गेला होता. सध्या तो भारतामध्ये सुट्टीवर आला होता.
मकूने बॉक्स उघडला. गिफ्ट पाहून त्याचे डोळे एकदम चमकलेच.
‘‘रोबो? भारी!’’ मकू जवळजवळ ओरडलाच.
आशीषदादाने रोबोला ‘चार्ज’ केलं आणि त्यानंतर पाठीमागचं बटण दाबून त्याला ‘स्टार्ट’ केलं. रोबो हळूहळू उभा राहिला. बॉक्समध्ये तळहाताएवढा दिसणारा तो रोबो आता एकदम हातभर लांब झाला. ३६० अंशांमध्ये त्या रोबोने सगळ्या दिशांकडे बघत आपली मान फिरवली. तेव्हा ‘कर्र्र’ असा हलका आवाज आला. मकूला गंमत वाटली.
‘‘मी हर्ष. मी आपली काय मदत करू शकतो?’’ रोबो मराठीतून बोलायला लागला. ते ऐकून मकू तर उडालाच.
‘‘हर्ष, मस्त नाव आहे रे दादा!’’
‘‘हर्ष एक ‘लìनग रोबो’ आहे. तुझ्या वयाच्या मुलांसाठी मी हा एक ‘लìनग एड’ म्हणून विकसित केलाय. तुझ्या अभ्यासामधला कुठलाही प्रश्न तू त्याला विचार. तो त्याचं बरोब्बर उत्तर देईल. एक नमुना म्हणून आणलाय मी हा तुझ्यासाठी!’’ दादा म्हणाला.
मकूने हर्षला दोन-तीन गणितं घातली, इतिहासातले काही प्रश्न, सायन्समधले सिद्धांत विचारले. हर्षने सगळ्यांची अचूक उत्तरं दिली. हर्षची हुशारी पाहून मकू एकदम थक्क झाला.
‘‘दादा, त्याला आपलं बोलणं कसं कळतं?’’
‘‘स्पीच रेकग्निशनमुळे.’’ दादाने सोप्या शब्दांत या टेक्नॉलॉजीचा अर्थ समजावला.
‘‘मला जाम आवडलाय हर्ष. मी याचा नक्की उपयोग करेन.’’ मकू म्हणाला.
मकूला मग हर्षबरोबर खेळण्याचा नादच लागला. शाळेतून घरी आला की तो हर्षला ‘एक्सप्लोअर’ करत बसायचा; त्याची विविध ‘फंक्शन्स’ शिकत बसायचा. हळूहळू तो रोबो वापरण्यात एकदम सराईत झाला. अभ्यासामधलं काही अडलं की तो हर्षला विचारायचा. दररोज सकाळी हर्ष मकूला शाळेला जाण्यासाठी एका घडय़ाळाच्या गजराप्रमाणे उठवूही लागला. मकूने शाळेचं अख्खं वेळापत्रक हर्षमध्ये ‘फीड’ करून ठेवलं होतं. हर्ष आता मकूचा मित्रच बनला होता जणू..
एक दिवस सुट्टीच्या दिवशी दुपारी मकू त्याच्या मित्राकडे जायला निघाला. त्याच्या सॅकमधे अर्थात हर्ष होताच.
घरापासून थोडय़ा अंतरावर मकूला रस्त्याच्या कडेला, एका झाडाखाली एक आजोबा दोन प्रवासी बॅगा घेऊन उभे दिसले. ते खूप गांगरलेले दिसत होते. त्यांचा पेहरावही जरा वेगळा होता- पांढराशुभ्र शर्ट, पांढरी लुंगी आणि कपाळावर आडवं पांढरं गंध. ते लगबगीने इकडे-तिकडे नजर फिरवत होते, कपाळावरचा घाम पुसत होते. मकूला काय करावं समजेना. अनोळखी माणसांशी बोलायचं नाही असं आई नेहमी म्हणते. पण आजोबा सज्जन दिसत होते. म्हणून धीर करून मकू त्यांच्याशी बोलायला गेला.
‘‘आजोबा, तुम्ही असे का उभे आहात?’’ मकूने विचारलं. आजोबांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांना ऐकू आलं नसेल म्हणून त्याने मोठय़ा आवाजात पुन्हा प्रश्न विचारला. तरीही आजोबा काहीच बोलेनात. मराठी समजत नसावं असा विचार करून त्याने आजोबांना पुन्हा तेच हिंदी आणि इंग्लिशमध्येही विचारून पाहिलं, पण तरीही त्यांना काहीच सांगता येईना.
‘‘तामिळ, तामिळ.’’ म्हणत आजोबांनी शेवटी उत्तर दिलं. आजोबांना फक्त तामिळ येत होतं. ‘अरे बापरे! आपल्याला कुठलं तामिळ यायला?’ मकूला काय करावं, काहीच सुचेना. एवढय़ात त्याला हर्ष आठवला. आशीषदादाने सांगितलं होतं की, हर्ष जवळजवळ सगळ्या भारतीय भाषांमधून आणि इंग्लिशमधून संभाषण करू शकतो. त्याने सॅकमधून हर्षला बाहेर काढलं आणि ‘ऑन’ केलं.
‘‘हर्ष, मला तुझी मदत हवी आहे.’’
‘‘होय मकू.’’
‘‘तुझ्या बरोब्बर समोर एक आजोबा उभे आहेत.’’ मकूच्या सांगण्याप्रमाणे हर्षने पाहिलं आणि आजोबांवर त्याची कॅमेऱ्याची नजर रोखली.
‘‘होय. आजोबा. दिसले मला.’’
‘‘आजोबांना फक्त तामिळ येतं. तुला तामिळ येतं का?’’
‘‘मला इंग्लिश, हिंदी, मराठी, तामिळ, तेलगू.’’ हर्षने मकूचा ‘तामिळ’ शब्द बरोब्बर पकडला आणि आपल्याला येतात त्या सगळ्या भाषांची ‘लिस्ट’ सांगायला सुरुवात केली.
‘‘तुमचं नाव काय’ हे तामिळमध्ये आजोबांना विचार.’’ मकूने सांगितल्याप्रमाणे हर्षने भाषांतर करून विचारलं. आजोबा हे सगळं बघून थबकलेच.
‘‘कृष्ण्मूर्थी. मी हरवलो आहे’’, असं त्यांनी तामिळमध्ये सांगितलं. हर्षने त्याचं मराठीमध्ये लगेच भाषांतर केलं.
मकूने मग ‘ते कुठून आले’, ‘कसे हरवले’, ‘कुठे जायचंय’ हे प्रश्न हर्षला तामिळमध्ये विचारायला सांगितले. आजोबांनी सगळ्याची नीट उत्तरं दिली.
आजोबा चेन्नईहून पहिल्यांदाच मुंबईला त्यांच्या पुतण्याकडे आले होते. स्टेशनवर त्यांचा पुतण्या त्यांना घ्यायला येणार होता, पण त्यांची चुकामूक झाली होती.
‘‘अंकल, फोन नंबर?’’ मकूने आजोबांना एक हात कानाला लावून आणि दुसऱ्या हाताने फोन फिरवण्याची खूण करत विचारलं.
‘‘इल्ला. मोबाइल ‘डिस्चार्ज’.’’ मकूला अर्थ लागला.
‘‘अरे हो! त्यांच्याकडे पत्ता असेलच की! हर्ष, तामिळमध्ये ‘घर’ म्हणजे?’’
‘‘वीड.’’ हर्षने उत्तर दिलं.
‘‘अंकल, वीड?’’ मकूने कसंबसं आजोबांना विचारलं आणि हातांनी ‘कुठे’ची खूण केली. आजोबांच्या प्रश्न लक्षात आला. त्यांनी जवळ असलेला पत्ता वाचून दाखवला. पण मकूला ती जागा नक्की ठाऊक नव्हती. त्याने हर्षला तो पत्ता त्याच्या ‘जी.पी.एस.’ यंत्रणेद्वारे शोधायला सांगितला. हर्षमध्ये बरेचशे नकाशे आधीपासूनच ‘स्टोअर’ केलेले होते. त्यामुळे तिथे इंटरनेट नसतानाही त्याने अचूक पत्ता सांगितला.
‘‘हा बंगला तर आपल्या घरापासून तीन-चार गल्ल्या सोडूनच दिसतोय.’’ मकूच्या हावभावांवरून त्याला पत्ता सापडलाय हे आजोबांनाही समजलं.
‘‘अंकल, वान्गो.’’ मकू आजोबांची एक बॅग उचलत म्हणाला. हर्षने त्याला ‘या’ साठी तामिळ शब्द सांगितला होता.
तिघांची वरात आजोबांच्या पुतण्याच्या बंगल्यापाशी पोहोचेपर्यंत त्यांचा पुतण्याही पाठीमागून गाडीमधून आला. तो आणि आजोबा यांच्यात तामिळमध्ये संभाषण झालं. थोडय़ा वेळाने आजोबा हर्षकडे बोट दाखवत त्यांच्या पुतण्याला काहीतरी कौतुकाने सांगत होते. त्यांचं बोलणं झाल्यावर तो पुतण्या मकूकडे वळला आणि त्याने मकूला शेकहँड केला.
‘‘आय एम विजयन. थँक यू सन.’’ पुतण्या मकूला म्हणाला. मकूच्या दुसऱ्या हातामध्ये असलेल्या हर्षकडे तो उत्सुकतेने पाहू लागला.
‘‘अंकल, थॅंक हर्ष. ही हेल्प्ड..’’ मकू हर्षकडे बोट दाखवत म्हणाला.
‘‘हर्ष? ऑफ कोर्स! अंकल बोलले मला सगळं. हर्ष, तू रियली हीरो हा-ए-स. अदरवाईज ते लॉस्ट झाले असते.’’ विजयन अंकल तुटक-तुटक मराठीमधून म्हणाले. त्यांनी मग हर्षबरोबरसुद्धा शेकहँड केला.
थोडय़ा वेळाने आजोबांचा आणि विजयन अंकलचा निरोप घेऊन मकू घरी जायला निघाला. मित्राकडे जायला आता बराच उशीर झाला होता.
‘‘मकू, हीरो म्हणजे मी सलमान खान की शाहरुख खान?’’ हर्षने ‘हीरो’ हा शब्द पकडून मधेच विचारलं. यावर मकूला पोटभरून हसू आलं.
‘‘अरे, हीरो कसला? तू तर पंडित आहेस.. पंडित.. भाषापंडित..’’ मकू आनंदाने म्हणाला.
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com