राजश्री राजवाडे काळे
अस्मी अजूनही तशी फुगलेलीच होती. तिचा मूड बदलावा म्हणून खरं तर खास तिच्यासाठी तिच्या आवडीचे मोमोजही मागवले होते तिच्या आई-बाबांनी, पण छे! रुसुबाई ती रुसुबाईच! त्याचं असं झालं होतं की, आज संध्याकाळी तिच्या डान्स क्लासच्या ताईने क्लासला येणाऱ्या आठ-दहा मुलींची छोटीशी पार्टी ठेवली होती. व्हॉट्सअॅप मेसेजमधल्या आमंत्रणामध्ये म्हटलेलंच होतं, ‘छान छान ड्रेस घालून या, मस्त मज्जा करू, मग जेवूनच घरी जायचं रात्री नऊ वाजता.’ आता हे पार्टीचं आमंत्रण म्हणजे काय अस्मीसारख्या छोटय़ा मुलींच्या उत्साहाला उधाणच येतं. पण पंचाईत अशी झाली होती की नेमकं दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता अस्मीचा गणिताचा पेपर होता आणि संध्याकाळी तिची मानसी मावशी तिची गणिताची प्रॅक्टिस घ्यायला येणार होती. आणि दुसऱ्या दिवशी गणिताचा पेपर आहे म्हटल्यावर पार्टीला जाणं शक्यच नव्हतं. त्या डान्स क्लासच्या इतर मुली दुसऱ्या शाळेतल्या असल्यामुळे त्यांची परीक्षा नव्हती आणि त्या सगळय़ा मात्र जमून मज्जा करणार होत्या. म्हणून अस्मीच्या आवडीचे मोमो मागवले होते, पण त्यावरही तिचं उत्तर तयार, ‘‘मला काही खायला जायचं नव्हतं त्या पार्टीत, छान तयार होऊन सगळे मज्जा करणार म्हणून जायचं होतं.’’ अस्मीचं हे उत्तर ऐकून आईलादेखील वाईट वाटलं आणि ती म्हणाली, ‘‘कितीही केलं तरी समाधान नाहीच मुळी.’’ अशा तऱ्हेने घरात शांतता!!
मानसी मावशी आली तेव्हा तिला लगेच जाणवलंच की कुछ तो गडबड है। मानसी मावशीला सगळं समजल्यावर ती सहजपणे म्हणाली, ‘‘त्यात काय इतकं होतं असं..’’ मानसी मावशीचं हे उत्तर ऐकून अस्मी रागावून म्हणाली, ‘‘तुला काय जातंय मावशी असं म्हणायला, माझी पार्टी मिस झाली.’’ अस्मीसाठी पार्टीला जाणं हा महत्त्वाचा इव्हेंट होता ना शेवटी, मानसी मावशीच्या ते लक्षात आलं आणि ती म्हणाली, ‘‘अगं, होतं असं, म्हणजे मला म्हणायचं होतं की आपल्या आयुष्यात पुढे पुढे तर असे कितीतरी प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला एक कोणतीतरी गोष्ट निवडावी लागते. साधं नवीन ड्रेस घेतानाच बघ ना, हा घेऊ की तो घेऊ? असा प्रश्न पडतो, पण म्हणून तुला आई-बाबा आवडतील ते सगळे ड्रेस घेऊन देतात का दुकानातले? नाही ना, आइस्क्रीम खाताना चॉकलेट आइस्क्रीम खाऊ की कुकी अँड क्रीम? पण म्हणून दोन्ही मिळतं का? नाही ना. हे सगळं ऐकून अस्मी आता मात्र विचारात पडली होती. मग मानसी मावशी तिला अजून समजावून सांगत म्हणाली, असा चॉइस करायची वेळ आली की तू तुला या त्यातल्या अजून जास्त काय आवडतं ते निवडतेस, बरोबर?’’ हे ऐकून मात्र अस्मी पुन्हा नाराजीने म्हणाली, ‘‘पण ऑफकोर्स मला गणिताच्या अभ्यासापेक्षा क्लासची पार्टीच आवडणार ना.’’ ती असं म्हणाली मात्र तिचं तिलाच हसू आलं. चेहऱ्यावर अर्धा राग आणि अर्ध हसू असं ठेवत ती रुसवा तसाच ठेवायचा प्रयत्न करत होती. मानसी मावशीच्या ते लक्षात आलं आणि तिला जवळ घेत मावशी म्हणाली, ‘‘येडूबाई, पण तरी त्याक्षणी महत्त्वाचं काय त्याप्रमाणे निवड करायची असते आणि एकदा निवड केली की जे मिळणार नसतं त्यासाठी रडत तर नाहीच बसायचं. आणि तू आत्ता पार्टीला जाऊन, उशिरा झोपणार आणि मग उद्या सकाळी सकाळी गणिताच्या पेपरला जाणार हे तुझं तुला तरी पटतंय का? नाही ना, आणि मी सांगत्ये ते तुला अगदीच पटत नसेल तर मीदेखील मागच्या महिन्यात तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीला रुसूनच बसायला हवं होतं.’’ मावशीचं हे वाक्य ऐकून अस्मीला काही कळेना. अस्मीच्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह पाहून मावशी म्हणाली, ‘‘तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीच्या वेळेस, माझ्या सगळय़ा फ्रेंड्स मूव्हीला गेल्या होत्या. मजा केली त्यांनी, पण मी चॉइस केला तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीचा, कारण ते महत्त्वाचं होतं ना.’’ मावशीचा हा चॉइस ऐकून अस्मीला एकदमच भारी वाटलं. मावशी पुढे म्हणाली, ‘‘आता, चॉइस इज युअर्स, उद्याची परीक्षा की पार्टी?’’ हे ऐकून अस्मी गणिताचं वही-पुस्तक आणायला पळालीसुद्धा!! Shriyakale1@gmail.com