श्री. ग. घन
छोटय़ा बालमित्रांनो, मी आज तुम्हाला एका व्यापाऱ्याची गोष्ट सांगणार आहे..
एक व्यापारी होता. त्याचा व्यापार दूरदूरच्या देशांमध्ये होता. त्याचा माल जहाजांमधून इतर देशांतून जात असे. एकदा काय झाले- खूप मोठे वादळ होऊन जोरदार पाऊस पडायला लागला. त्यात त्या व्यापाऱ्याची दोन्ही जहाजे समुद्रात गडप झाली. हा व्यापारी- ज्याचे नाव सुखीलाल होते- फार दु:खी झाला. सुदैवाने त्याच्या हाती लाकडाची एक मोठी पेटी लागली. सुखीलाल तिच्या मदतीने कसातरी किनाऱ्याला लागला.
पण आता पुढे काय? सुखीलालची दोन्ही जहाजे पाण्यात गडप झाली होती. सुखीलाल किनाऱ्यावर बसून रडत होता. आता माझ्याजवळ काही नाही. माझा देश, माझा परिवार माझ्यापासून दूर कोठे आहे, मला माहीत नाही. माझ्याजवळ अंगावरच्या वस्त्राशिवाय काही नाही. मी कोणत्या देशात आहे, माहीत नाही. मला कोणी ओळखत नाही. मी काय करू?
निराश होऊन त्याने जीव देण्याचे ठरवले. त्यासाठी सुखीलाल एका उंच जागेवर जाऊन समुद्रात उडी घेणार इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला..
‘‘थांब.’’
सुखीलालने मागे पाहिले.. एक संन्याशी त्याच्या जवळ येत होता. संतमहाराज सुखीलालच्या जवळ आले. त्याला त्यांनी प्रेमाने विचारले, ‘‘बेटा, तू काय जीवनाला इतका कंटाळलास- की जीवन समाप्त करतो आहेस? अरे, मानव जीवन फार अमूल्य आहे. त्याचा त्याग करू नकोस. मला तुझी समस्या सांग. मी उपाय सांगतो.’’
हे ही वाचा >> बालमैफल : जादूचे खत
सुखीलालने रडत रडत आपली कर्मकहाणी महाराजांना सांगितली.
‘‘महाराज, यावर तुम्ही काय उपाय सांगणार? मला आत्महत्या करू द्या.. माझ्याजवळ हाच शेवटचा मार्ग आहे.’’
संन्यासी म्हणाले, ‘‘नाही. हा शेवटचा मार्ग नाही. जा, समोरच्या राज्यात जा. काही काम कर. स्वत:च्या बुद्धीचा उपयोग कर.’’
सुखीलाल : ‘‘पण महाराज मला तिथे कोणी ओळखत नाही. माझ्याजवळ पैसा नाही..’’
संन्याशी : ‘‘तुझ्याजवळ अजून तुझी बुद्धी आहे. कोणतंही काम कर. पण तुला एका नियमाचे पालन करावे लागेल. कधी आणि कोणत्याही परिस्थितीत तू खोटं बोलायचं नाही. जा, एका वर्षांने आपण याच जागेवर पुन्हा भेटू.’’
सुखीलालने नवीन राज्यात प्रवेश केला. तेथील बाजार आणि जनता पाहत असताना त्याला फार भूक लागली. त्याने एका दुकानातून कोणी नाहीसे पाहून थोडे फुटाणे उचलले. तितक्यात दुकानदाराचे लक्ष गेले. दुकानदार ओरडून म्हणाला, ‘‘काय रे, चोरी करतोयस का? थांब, तुला फौजदाराकडेच नेतो.’’
फौजदाराने काहीही विचार न करता त्याला न्यायाधीशांसमोर उभा केला.
न्यायाधीश : ‘‘तू चोरी केलीस?’’
सुखीलाल : ‘‘हो महाराज. मी चोरी केली. मी चोर आहे.’’
न्यायाधीश : ‘‘याला उद्या फाशीची शिक्षा दिली जाईल.’’
कारागृहामध्ये त्याला शिपायांनी समजावले की, ‘‘तू सांग- मी चोर नाहीये. मला भूक लागली होती म्हणून फुटाणे घेतले.’’
पण सुखीलाल म्हणाला, ‘‘नाही. मी खोटे बोलणार नाही. मी फुटाणे चोरले आणि मी चोर आहे.’’
दुसऱ्या दिवशी राजाला ही सर्व हकीकत सांगण्यात आली.
हे ही वाचा >> बालमैफल: तू इथंच राहा..
न्यायाधीश : ‘‘महाराज, हा मनुष्य चोर वाटत नाही, पण तो खोटं बोलायला तयार नाही. फाशीचीही त्याला भीती नाही.’’
राजा : ‘‘याला मुक्त करा. सुखीलाल, तू आता स्वतंत्र आहेस. तू आजपासून या राज्यात स्वतंत्रपणे फिरायचे. राज्यात जे पाहशील ते मला सांगायचे. तुझ्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था राज्याकडून होईल. जा आता..’’
सुखीलाल दिवसभर राजधानीत हिंडत होता. रात्री राजाशी त्याची एकांतात भेट झाली.
राजा : ‘‘काय सुखीलाल, काय म्हणते आमची प्रजा आणि आमचे कर्मचारी?’’
सुखीलाल : ‘‘महाराज, स्थिती फार गंभीर आहे. प्रजा फार त्रस्त आहे. प्रजेची सर्व बाजूंनी लूट होत आहे. व्यापारी भरमसाठ किमतीत माल विकत आहेत. शिपाई आणि फौजदारांनी प्रजेस त्रस्त केले आहे. निरपराध माणसाला तुरुंगाचे भय दाखवून पैसा घेतला जात आहे.’’
राजा : ‘‘सुखीलाल, काय हे सत्य आहे?’’
सुखीलाल : ‘‘महाराज, मी कधीच खोटं बोलत नाही. मी फाशीची शिक्षा झाल्यावरही खोटं बोलून आपला जीव वाचवला नाही.’’
राजा : ‘‘ठीक आहे. उद्या गावखेडय़ांत जा आणि शेतकऱ्यांची भेट घे. मला त्यांची हकीगत सविस्तर सांग.’’
दुसऱ्या दिवशी सुखीलाल गावखेडय़ांत जाऊन आला. नियत समयी त्याची राजाशी भेट झाली. काही बोलायच्या आधीच सुखीलाल रडू लागला.
राजा : ‘‘अरे सुखीलाल, रडतोस कशाला? तुला कोणी काही बोलले का? मला सांग- मी बंदोबस्त करतो.’’
सुखीलाल : ‘‘नाही महाराज, कोणी काही बोलले नाही, पण शेतकऱ्यांची दुरवस्था पाहून मला फार वाईट वाटलं. महाराज, आज आपले अन्नदाते स्वत:च उपाशी मरत आहेत. त्यांची भयंकर पिळवणूक होत आहे. राज्याच्या कराच्या नावाखाली त्यांची जमीन आणि जनावरे अधिकारी घेऊन जात आहेत. तरुण मुलांना सैन्यात भरतीच्या नावाखाली दरोडेखोर बनविण्यात येत आहे. जमिनी ओसाड पडल्या आहेत. शेतकरी दुसऱ्या राज्यात पलायन करत आहेत.’’
राजा : ‘‘माझ्या राज्याची ही अवस्था? सुखीलाल, काय हे सर्व सत्य आहे?’’
सुखीलाल : ‘‘महाराज, ही घ्या तलवार. माझे तुकडे तुकडे करा. प्रत्येक अंगातून हेच सत्य बाहेर पडेल. महाराज, मी खोटे कधीच बोलणार नाही.’’
राजा : ‘‘राज्यात न्यायव्यवस्था कशी आहे? आणि आमच्या राजवाडय़ाविषयी तुझे काय मत आहे?’’
सुखीलाल : ‘‘आपले न्यायाधीश फार सज्जन, न्यायप्रिय आणि इमानदार आहेत. पण त्यांचे न्याय अमलात येत नाहीत. फौजदार लाच खाऊन खऱ्याचे खोटे करतात. आणि महाराज, सत्य आणि स्पष्ट बोलतो. कारण मला मृत्यूचे भय नाही. सगळ्यात मोठे गुन्हेगार आपण आहात. आपण कधी तपास केला नाही. आपण नेहमी स्वत:च्या मनोरंजनात आणि चाटुकाराचे ऐकत आलात. आपल्याविरुद्ध कारस्थान होत आहे. अजूनही काही केले नाही तर आपणास राज्य गमावावे लागेल. मला आज्ञा द्यावी.
राजा : ‘‘थांब सुखीलाल, मी आज आणि आतापासून सर्व व्यवस्था बदलतो आणि तुला माझ्या राज्याचा प्रधानमंत्री नियुक्त करतो. मी जरी गुन्हा केला, तरी मला पण नि:संकोचपणे शिक्षा कर.’’ सुखीलालने सर्व व्यवस्था बदलून त्यावर कठोर अंमल आणला. एक वर्ष पूर्ण झाल्यावर नियत समयी संन्याशी महाराजांना भेटायला गेला. त्याच्या पायावर डोके ठेवून सर्व हकीकत सांगितली.
मुलांनो, सत्याचा महिमा अपरंपार आहे. एक खोटे बोलण्यानंतर दहा वेळा खोटे बोलावे लागते. त्यापेक्षा एकदाच सत्य बोला. सत्याची वाट कधी सोडू नका, हीच शिकवण आपल्या थोर पुरुषांनी दिली आहे.
lokrang@expressindia.com