स्वॉलिया चाँद सनदी
आपण जे पाहतोय ते आपल्या मुलालाही दिसावं असा विचार करून मुलाला आपल्या कडेवर घेणारी आई असते, व आपण जे पाहतोय त्याच्या पलीकडचंही आपल्या मुलाला दिसावं असा विचार करून मुलाला आपल्या खांद्यावर घेणारा बाप असतो. आईचा विचार केला की मनात प्रेमाची भावना निर्माण होते. आणि मनात जेव्हा ‘गरज’ शब्द येतो, तेव्हा माझ्या मते मनामध्ये एकच आणि एकच चित्र निर्माण होतं आणि ते म्हणजे ‘बाबा.’
बोलायचं झालं तर, गरज पूर्ण करण्यासाठी बाबांचा विचार मनात येणं खरं तर चुकीचं आहे. बाबा माझ्यासाठी देवदूत आहेत, ज्यांच्या छोटय़ाशा पगारातूनही माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात. मी पाहिलंय बाबांना दु:खातही हसताना. ऊन, वारा, पावसात माझ्यासाठी झिजताना. बाबा मला म्हणतात, ‘‘माझा हात घट्ट धर.’’ मी त्यांना म्हणते, ‘‘बाबा, माझा हात घट्ट धरा.’’ हे शब्द सारखेच आहेत. फरक फक्त एवढाच आहे, मला माहीत आहे की बाबांनी धरलेला हात कोणत्याच संकटामध्ये सुटणार नाही. फक्त ‘बाबा’ म्हटलं की त्यात नातं तयार होतं, पण ‘माझे बाबा’ म्हटलं की त्या नात्यामध्ये आपुलकी निर्माण होते. माझ्याकडून जेव्हा चुका होतात, तेव्हा बाबांचे हात माझ्यासमोर येतात; पण ते मारण्यासाठी नाही, तर प्रेमानं डोक्यावरून कुरवाळून मला समजवण्यासाठी. प्रत्येकाला ओढ असते ती आईची. कारण आई आपल्या सगळय़ा चुका पाठीशी घालते आणि बाबा म्हटलं की चेहऱ्यावर भीतीचे भाव निर्माण होऊ लागतात. पण माझं असं नाही, कारण बाबांच्या ओरडण्यातून निर्माण होणारं निच्छल प्रेम मला ओळखायला येतं. म्हणून माझे बाबा माझ्यासाठी देवदूत आहेत. माझ्या बाबांना पाहिल्यावर माझ्या मनात भीती नाही, तर आनंद निर्माण होतो. कारण बाप जरी कठोर असला तरी त्याच्या मनात मायेचा ओलावा असतो, हे मात्र खरं! माझे बाबा हे जगावेगळे नाहीत, परंतु माझ्यासाठी माझ्या जीवनाचा एक अविभाज्य अंग आहेत. माझ्या बाबांकडून मी बऱ्याच गोष्टी शिकले. माझे बाबा माझ्या जीवनाचा आरसा बनले. त्यांनी नेहमी मला चुकीची वाट सोडायला लावून योग्य वाट दाखवली. कर्तृत्व आणि नेतृत्व या दोन गोष्टी मला माझ्या बाबांनी शिकवल्या आणि कर्तृत्व आणि नेतृत्व स्वत:ला कमवायला लागतात ते कोणाकडून उसनं मिळत नाही, ही शिकवण मला त्यांनी दिली. माझे बाबा नेहमी माझे गुरू राहतील आणि बाबा माझ्या जीवनाचा आरसा बनून जीवनाच्या प्रत्येक वळणावर मला मार्गदर्शन करतील..
बाबा..
माझ्या मनाचा ध्यास तू,
जीवनाचा आस तू
माझा आधार तू
मला जिवंत ठेवणारा श्वास तू..
(इयत्ता- दहावी, आंतरभारती विद्यालय, इचलकरंजी.)