मोहन गद्रे
एका हाऊसिंग सोसायटीत आंब्याचं मोठं झाड होतं. त्यावर एका खारुताईनं घर केलं होतं. खारीचं एक इवलंसं पिल्लू आता हळूहळू इकडे-तिकडे झाडावर फिरू लागलं होतं. एक दिवस सोसायटीच्या एका घरातील स्वयंपाकघरात स्वारी पोहचली. त्याला पाहून त्या घरातील मंडळींना खूप आनंद झाला आणि त्या घरातील लहान मुलं आणि मोठी माणसं त्याला खाऊ घालू लागली, नंतर त्या खाण्याची त्या पिल्लाला चटकच लागली. खारुताईच्या पिल्लाच्या आई-वडिलांनी त्याला समजावलं, शिजवलेलं अन्न आपण खाऊ नये, आपला आहार तो नाही. आपण फळं, धान्य, शेंगा अशा प्रकारचं अन्न खावं, तोच आपल्यासाठी योग्य आहार आहे. त्यानं हे लक्षात ठेवलं आणि आयतं अन्न मिळतं आणि त्या घरात कोणीही नाही याचा अंदाज घेऊन, स्वयंपाकघरातील टोमॅटो, शेंगा, शेंगदाणे यांचा फडशा पाडू लागलं.
हेही वाचा >>> बालमैफल: शब्दांची गंमत
पहिल्या पहिल्यांदा त्याच्या या उपद्वय़ापाचं त्या घरातील लोकांना कौतुक वाटलं. पण नंतर नंतर मात्र त्यांना याचा अधिकच उपद्रव वाटू लागला. कारण कढईत भाजून थंड करण्यासाठी ठेवलेल्या शेंगदाण्यामध्ये हे छोटुकलं आपला पराक्रम उरकून आलं, त्या घरातल्या बाईंना ते शेंगदाणे वापरता आले नाहीत. मग मात्र त्या घरातील लोकांनी याला धडा शिकविण्यासाठी एक युक्ती केली. एक दिवस उंदराचा पिंजरा लावला. त्यात भरपूर भुईमुगाच्या शेंगा ठेवल्या. रोजच्या सवयीप्रमाणे खारुताईचं पिल्लू आपली इवलीशी झुपकेदार शेपटी हलवत आलं आणि त्या इतक्या भुईमुगाच्या शेंगा पाहून त्याला आनंद झाला. त्या आनंदाच्या भरात भुईमुगाच्या शेंगा खाण्याच्या नादात पिंजऱ्यात अलगद अडकलं. पण ते कुटुंब फार प्रेमळ आणि दयाळू होतं. त्यांनी त्या पिल्लाला मारलं नाही. त्यांना माहीत होतं की इतकी शिक्षा फार झाली.
हेही वाचा >>> बालमैफल: आईची जादूई क्रीम
इकडे पिल्लाचे आई-वडील पिल्लाच्या चिंतेनं सैरभैर झाले आणि पिल्लू पिंजऱ्यात अडकल्यानं आई-बाबांच्या आठवणीनं बेचैन झालं. इतक्या शेंगा आजूबाजूला असून एकही फोडून खावीशी वाटेना. दुसऱ्या दिवशी त्या कुटुंबातील बाबांनी तो पिंजरा खारुताईच्या घराच्या झाडाजवळ नेऊन उघडला. त्याबरोबर खारुताईचं पिल्लू धावत जाऊन आपल्या आई-वडिलांना बिलगलं. त्याची आई त्याला म्हणाली, ‘‘एका मर्यादेपर्यंत तुझी त्यांच्या घरातील लुडबुड आवडत होती. त्यांना आनंद आणि कौतुकास्पद वाटत होती, पण ती लुडबुड उपद्रव करणारी ठरल्यावर त्यांनी तुला योग्य ती शिक्षा दिली. यापुढे हे लक्षात ठेव. ‘अति परिचयात अवज्ञा’ अशी परिस्थिती होते. तेव्हा आपण आपलं झाडावर खेळलं बागडलं, खाल्लं प्यायलं पाहिजे. मर्यादा सोडून वागलं की असं संकट आपण ओढवून घेतो. जा आता तुझ्या सवंगडय़ांबरोबर खेळून बागडून ये. खारुताईचं ते इवलंसं पिल्लू आपली झुपकेदार शेपटी हलवत आपल्या मित्रांसोबत, झाडावर इकडून तिकडे धावू, पळू लागलं.
gadrekaka@gmail.com