सा तवीच्या सर्व वर्गांमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकच लगबग सुरू होती. ७६व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शाळेने विद्यार्थ्यांसाठी ‘वर्ग-सजवा’ स्पर्धा आयोजित केली होती. प्रत्येक वर्गाला आपापली ‘थीम’ ठरवण्याची मुभा होती. एका वर्गाने ‘राज्यघटनेचे शिल्पकार’, दुसऱ्याने ‘संविधानातील बारकावे’ तर काहींनी ‘चित्ररथ- एकतेचे प्रतीक’, ‘पद्मा पुरस्काराचे मानकरी’, ‘सैन्यदलाचे शौर्य’ असे विविध विषय निवडले होते. पण ‘सातवी-ब’च्या वर्गाची थीम ठरतच नव्हती.
‘‘बाई, दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला विविध चित्ररथांकरिता थीम ठरवली जाते, ज्याप्रमाणे त्या-त्या राज्याला त्यांचा चित्ररथ तयार करायचा असतो. गेल्या वर्षीची थीम होती ‘भारत-लोकतंत्राची जननी’ आणि ‘विकसित भारत’.’’ वर्गातली एक हुशार विद्यार्थिनी इरा म्हणाली.
‘‘बरोबर!’’
या वर्षीचा विषयही खूप सुंदर आहे, ‘स्वर्णिम भारत- विरासत और विकास’! म्हणजेच ‘सुवर्ण भारत- वारसा आणि विकास’.
‘‘हो! वाचलंय मी!’’
‘‘आपण हीच थीम घेतली तर वर्ग सजवायला? काल बाबांशी बोलताना एकदम लक्षात आलं.’’ इराचे बाबा भारतीय नौदलात कार्यरत होते.
‘‘झक्कास कल्पना आहे! मुलांनो, स्वर्णिम म्हणजे सोनेरी… सोनेरी भारत. तो कसा होईल? तर वारसा आणि विकास याची सांगड घातली की. आधुनिकीकरण आणि विकास स्वीकारताना आपल्या समृद्ध वारशाचे जतन करण्याची भारताची वचनबद्धता अधोरेखित करणारा ‘स्वर्णिम भारत’! चला मग, डोकं खाजवा, विचार जागवा!’’ म्हणत मधल्या सुट्टीची घंटा झाल्यामुळे बाई वर्गाबाहेर गेल्या. पण डबे खाता-खाता वर्गाचं विचार-मंथन सुरूच राहिलं.
‘‘वारसा म्हणजे ‘सांस्कृतिक वारसा’. जसं अजिंठा-वेरूळ लेण्या, ताजमहाल, सांचीचा बौद्ध स्तूप, कोणार्क सूर्य मंदिर… आणि ‘नैसर्गिक वारसा’ म्हणजे सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, काजीरंगा राष्ट्रीय उद्यान, ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान वगैरे. अगदी भारतातल्या नद्या, संगीत, चित्रकला, लेखन, भाषा, सण, खाद्यापदार्थ हे या वारशाचे विविध पैलू! या सगळ्यांची माहिती लिहून काढून ठिकठिकाणी भिंतींवर चार्ट्स लावले तर?’’ इरानं सुचवलं.
‘‘भारीच! आणि विकास म्हणजे गेल्या ७५ वर्षांत झालेली देशाची प्रगती. जसं माहिती-तंत्रज्ञान क्षेत्र, कृषी, क्रीडा, आरोग्य, अंतराळ…’’ आरुष पुढे म्हणाला.
‘‘‘विकास’ या विषयासाठी सैन्यदल बेस्ट प्रतीक राहील. १९६२च्या लढाईत जेव्हा चायनाने आपल्यावर अचानकपणे हल्ला केला, तेव्हा आपल्या सैन्याकडे घालायला योग्य ते बूटसुद्धा नव्हते. आणि आता भारतीय सेना जगातली चौथी सगळ्यांत सशक्त सेना म्हणून गणली जाते.’’ प्रणव म्हणाला.
‘‘इतकंच नाही, आज किती तरी स्त्रिया सैन्यात प्रामुख्याने सहभागी आहेत. कॅप्टन शिवा चौहान सियाचेन ग्लेशियरवर तैनात पहिली स्त्री, पहिल्या फ्लाइट कमांडर शालीझा धामी, नौदलाच्या युद्धनौकेचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी प्रेरणा देवस्थळी… अशा किती तरी.’’ इरा अभिमानाने म्हणाली.
‘‘मग, एक करू या! स्वातंत्र्यापासून आतापर्यंत सैन्यदलातील स्त्रियांच्या फोटोंचा कोलाज आपण लावू शकतो व्हाइट-बोर्डवर! आणि हो! कर्तव्यपथावर सैन्यदलाचं आणि त्यांच्या कवायतींचं प्रदर्शन ‘फ्लायपास्ट’च्या वेळी होणाऱ्या विविध विमानांच्या, फायटर जेट्स आणि हेलिकॉप्टर्सच्या थरारक कसरती… त्यांचे फोटोपण लावू. ते मिळतील इंटरनेटवर!’’ श्रीया म्हणाली.
‘‘इरा, तुझ्या बाबांचेही काही फोटो दे नं! गेल्या वर्षीच त्यांना नौसेना मेडल मिळालंय नं? त्यापेक्षा त्या फोटोंचं तू एक प्रेझेन्टेशनच बनव जे आपण प्रोजेक्टरवर दाखवू. एरवी सर्वसामान्यांना नौदलाचं दैनंदिन जीवन समजणं अवघडच.’’ अद्वयने सुचवलं.
‘‘डन!’’ इति इरा.
‘‘आरुष, तुझी चित्रकला इतकी छान आहे तर ‘वारसा आणि विकास’ यांची सांगड घालणारं सुंदर चित्र काढ की बोर्डवर! मस्त वाटेल एकदम.’’ इराने सुचवताच सगळ्यांनी दुजोरा दिला.
म्हणता-म्हणता पुढील काही दिवसांत वर्ग सजू लागले. इराने लेखनाची बाजू पेलली होती तर श्रीयाने फोटो शोधून ठेवण्याची! प्रणवची ‘स्वर्णिम भारत’च्या थीमला न्याय देत सांस्कृतिक, प्राकृतिक, आधुनिक आणि विकसित चित्रांची आणि चिन्हांची जमवाजमव सुरू होती. इराने बनवलेल्या प्रेझेंटेशनला ‘फायनल-टच’ देण्यात कॉम्प्युटर लॅबमध्ये अद्वय ‘बिझी’ होता. वर्गातले सगळेच विद्यार्थी कुठल्या ना कुठल्या कामात गर्क होते.
‘‘इरा, एक सरप्राईज.’’ इरा लिहिण्यात तल्लीन असताना आरुष धावतच तिथे आला.
‘‘मिळाली तिकिटं? दिल्ली परेडची?’’ इरानं लगेचच ओळखलं. बरेच दिवस आरुषचं याबद्दल बोलणं सुरू होतंच.
‘‘येस्स! कालच. बाबांना ऑनलाइन मिळाली. तसंही आत्तेभावाच्या लग्नासाठी जायचंच होतं दिल्लीला!’’
‘‘आयुष्यात नं एकदा पाहायलाच हवी ही परेड. कसलं भारी वाटतं माहित्ये! मी दोन-तीनदा गेलेय. पण म्हणजे स्पर्धेच्या दिवशी तू नसणार, आरुष.’’ इति इरा. आता अद्वय, श्रीया, प्रणवही तिथे आले.
‘‘हो नं! मित्रांनो, ही सगळी तयारी करत असताना एक सुचलं. इराच्या बाबांसारख्या सैनिकांमुळे ‘स्वर्णिम भारत’ सुरक्षित आहे, पण त्याच्या वारशाचं जतन करणं आणि विकासामध्ये सहभागी होणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे!’’
‘‘जय हिंद!’’ इरा जोशात म्हणाली आणि सगळ्या विद्यार्थ्यांच्या ‘जय हिंद’ नाऱ्याने ‘सातवी-ब’ वर्ग घुमला.
mokashiprachi@gmail. com