मेघना जोशी joshimeghana231@yahoo.in
‘‘तेच ते नको सांगू मला परत परत..’’ कान्हा आईच्या अंगावर वस्सकन् ओरडला. तसा आईचा चेहरा पडलाच. पण कान्हा म्हणत होता तेही बरोबरच होतं. कान्हा आणि त्याची बहीण बकुळ.. खूप शहाणी आणि हुशार मुलं होती. पण हल्ली ती दोघंही फारसं कुणाच्यात मिसळायला कबूल नसत. त्याचं कारण आईला चांगलंच माहीत होतं. त्याचं कारण होतं त्यांचा रंग. ते गोरे नव्हते ना! जातील तिथे या ना त्या कारणाने त्यांच्या गोरे नसण्याचा उल्लेख व्हायचा. कोणी म्हणायचं, ‘‘आई-बाबा दोघेही कसे लख्ख आहेत हो.. आणि ही मुलं अशी कशी?’’ तर कुणी म्हणायचे, ‘‘रंगावर जाऊ नका बरं.. गुण बघा पोरांचे..’’ आता सहावीत आणि आठवीत असणाऱ्या, बुद्धीने तल्लख अशा त्या दोघांना यातला भाव बरोब्बर कळायचा. आणि मग समोरच्याच्या या बोलण्यावर कसं व्यक्त व्हावं, ते मात्र कळायचं नाही. त्यामुळे ते दोघंही राहायचे वैतागत, नाहीतर चिडचिडत.
आजही तसंच झालं. शेजारच्या ध्रुवकडे वाढदिवसाला गेलेल्या कान्हाला असाच काहीतरी अनुभव आला होता आणि तो आल्यापासून धुसफुसत होता. त्यावर आईने नेहमीप्रमाणे कृष्णाचं आणि विठोबाचं उदाहरण दिल्यावर कान्हा एकदम वैतागलाच. म्हणाला, ‘‘तेच ते नको सांगूस परत परत. आणि हे जे दोन्ही देव आहेत ना, ते गरीब आणि साध्याभोळ्या माणसांचे आहेत. ते याच रंगाचे असतात.. आमच्या! ध्रुव श्रीमंत आहे. त्याचा रंग वेगळा आहे.’’
आठवीतल्या कान्हाला आता चांगलीच समज आलेली आहे. तो प्रतिवादही करू शकतो हे आईच्या लक्षात आले आणि ती गप्प बसली. ती गप्प बसली, तरी गप्प झाली नव्हती.
त्याच रात्री थंडी पडली तसा तिने स्वत:चा काळा खास ड्रेस कपाटातून काढला. जानेवारी महिना असल्याने काळ्या साडय़ा आणि बाबांचे काळे शर्ट्सही कपाटातून बाहेर पडले. आणि एकदा पहाटे चहा पिताना मुलांना ऐकू जाईल एवढय़ा आवाजात आई-बाबांचं काळ्या कपडय़ांचा थंडीतील उपयोग यावर थोडंसं बोलणं झालं. कान्हा आणि बकुळ यांनी ते ऐकलं होतं, पण त्यासंदर्भात कोणी काही बोललं नाही.
त्यानंतर एकदा बातम्या पाहताना कोणत्यातरी संदर्भाने आकाशातल्या पांढऱ्या ढगांकडे पाहत कपाळाला हात लावणारा शेतकरी पाहून आजी म्हणाली, ‘‘काय चाटायचंय का त्या पांढऱ्याफटक रंगाला? काय करायचेत हे पिठ्ठं ढग? तो काळाशार मेघ येईल तेव्हाच नंदनवन फुलेल आणि बहरेल हो..’’ हे आणि असं बरंच काहीबाही बोलत होती आजी.. आणि कान्हा बकुळसह आजीच्या चेहऱ्याकडे पाहत होता डोळे विस्फारून.
नंतर फोनवर कोणाशी तरी कोणत्या तरी रेसिपीबद्दल बोलताना आई काळ्या मिठाबद्दलही बोलत होती. पांढरी साखर आणि शुभ्र मीठ हे शरीरासाठी विषासारखे असतात म्हणे. पण काळं मीठ तब्येतीसाठी खूप चांगलं असतं.. असं काहीसं बोलणं चाललं होतं. त्यातच आजोबांनी कुंडीतल्या झाडांसाठी काळी माती आणली. कारण त्यात जास्त पोषकद्रव्यं असतात म्हणे!
आता कुठंतरी कान्हाला वाटू लागलं, की आपल्या ‘तेच तेच सांगू नकोस मला परत परत..’ या बोलण्यामुळे सगळे दुखावलेत बहुतेक. म्हणून काळा रंग का चांगला, हे परत परत दाखवून देतायत. यावर एकदा आपण बोलावं.. त्यासाठी आजोबा ठीक.. ते कमी लेक्चर देतील असं वाटून एकदा आजोबांपाशी त्याने हा विषय काढलाच.
‘‘आजोबा, माझ्या काळेपणाबाबत कुणी काही बोलल्यावर मी चिडतो, तसं मी चिडू नये म्हणून ढग, मीठ, माती यांच्या रंगांची उदाहरणं तुम्ही सगळे मुद्दामहून देताय ना?’’ यावर आजोबा हसले आणि म्हणाले, ‘‘ते सहजच घडलं असेल. कारण मला तरी त्याचा एवढा बाऊ करावंसं वाटत नाही. सगळेच रंग महत्त्वाचे असतात. जरी पांढऱ्या ढगाला महत्त्व नसलं तरी पांढरा कापूस मात्र ‘पांढरं सोनं’ म्हणून ओळखला जातो. सारा निसर्ग तर निळा, पिवळा, तांबडा, हिरवा असा बहुरंगी आहे. निळा समुद्र आणि हिरवी वनराई यांत डावं-उजवं काही आहे का, सांग बरं? तसंच आहे. प्रत्येक माणूस त्याच्या त्याच्या रंगामुळे त्याच्या त्याच्या जागी बहुमोल आहे. बरं, यातही कोणाला निळा समुद्र आवडतो, तर कुणाला हिरवा डोंगर, तर कोणाकोणाला बोडका तपकिरी डोंगरही आवडतो. त्यामुळे आपलं मोठेपण आपल्या रंगावर अवलंबून नसून आपण आपल्याला किती आवडतो यावर अवलंबून असतं, एवढंच.’’
आजोबांचं हे बोलणं ऐकत असतानाच कान्हाने सहजच समोर पाहिलं तर आई, आजी आणि आत्या साडय़ांचं कपाट उघडून बसल्या होत्या. संक्रांतीसाठीच्या काळ्या, पांढऱ्या आणि तिरंगी काठ असणाऱ्या अशा सगळ्या साडय़ांबाबत रंगतदार चर्चा करत तिघीही हसत-खिदळत होत्या..