सुचित्रा साठे
‘‘आजी, कुठे गेली होतीस इतका वेळ? मी तुझी किती वाट बघत होते खेळायला!’’ शाळेला सुट्टी असल्यामुळे रमा जरा कंटाळली होती.
‘‘अगं, मी डॉक्टरकडे गेले होते. माझा डावा हात खूप दुखतोय ना.. डॉक्टरांनी त्याला गरम शेक दिला आणि मग माझ्याशी बोलता बोलता पुरणयंत्राचा दांडा कसा आपण गोल फिरवतो, तसा फिरवला. खूप दुखला गं.’’
‘‘हो का..?’’ रमाने काळजीचा सूर लावला.
आराध्य बाजूला काहीतरी वाचत होता. आजीच्या हाताकडे बघत तो म्हणाला, ‘‘बरं झालं आजी, डावा हात दुखतोय ते. उजवा हात असता तर तुला जेवायला, काम करायला किती त्रास झाला असता. फार उपयोगी असतो तो. त्याच्याशिवाय आपलं किती अडतं ना!’’
‘‘डावा म्हणून आपण त्याला हिणवतो. पण त्याला काही व्हायला लागलं की आपल्याला त्याचं महत्त्व जाणवतं. सकाळी उठल्याबरोबर स्वच्छतागृहात गेलं की सगळी भिस्त ‘डाव्या’ हातावरच असते ना!’’ आजीने डाव्या हाताला कुरवाळत डाव्या हाताच्या महत्त्वाच्या कामाची नोंद घेतली.
‘‘डाव्या हाताशिवाय आपण देवाला नमस्कार कसा करणार?’’ रमाने हजरजबाबीपणा दाखवला.
‘‘घडय़ाळाची जागा डाव्या हातावरच असते ना! म्हणजे वेळेचं भान आपण डाव्या हातामुळेच सांभाळू शकतो. परीक्षेच्या वेळेला तर सगळं लक्ष डाव्या हातावरच्या घडय़ाळाकडेच लागलेलं असतं. केवढं महत्त्वाचं काम त्याच्याकडे असतं. आजकाल मोबाइल वेळ दाखवतो. पण परीक्षेच्या वेळी त्याला जवळ ठेवता येत नाही.’’ आराध्यने समयसूचकता नोंदवली.
‘‘डाव्याचा काही उपयोग नसतो असं नाही. छोटं बाळ रांगायला लागतं किंवा पायावर उभं राहतं, चालायला शिकतं तेव्हा दोन्ही हातांवर ते अवलंबून असतं, बरं का!’’ आजीने पटकन् न लक्षात येणारी गोष्ट सांगितली.
‘‘अत्तर एका हातावर लावलं की दोन्ही हातांच्या पालथ्या मुठी एकमेकांवर घासल्याशिवाय सुगंधाची अनुभूती घेता येत नाही..’’ सुगंधाचा शौकिन असल्यामुळे आराध्यला ही गोष्ट पटकन् आठवली.
‘‘आजी, हे बघ, वहीवर लिहिताना किंवा कागदावर चित्र काढताना, ते रंगवताना डावा हात असा ठेवावाच लागतो. नाहीतर वाऱ्याने कागद उडतो.’’ रमाने प्रत्यक्ष अनुभव घेत प्रात्यक्षिकच दाखवलं.
‘‘आमच्या वर्गातील एक मुलगा ‘डावरा’ आहे. तो तर सगळ्या गोष्टी डाव्या हातानेच पटापट करतो. खातो पण किती भरभर गं आजी!’’ अपूर्वने शाळेतील आठवण सांगितली.
‘‘एरवी सारखा मी.. मी करत नाचणारा उजवा हात युद्धाच्या वेळी मागे असतो. धनुष्याला बाण लावताना डावा हात पुढे होतो. बंदुका चालवताना पण तसंच असतं बरं का!’’ आजीने माहिती पुरवली.
‘‘आता डाव्या हातात मोबाइल असतो गं आणि तो सतत कानाला चिकटून असतो.’’ रमाने खुशीत येऊन सांगितलं आणि ती बोलतच राहिली.
‘‘दादा, ताई तर दोन्ही हातांनी मोबाइलवर पटापट मेसेज टाईप करतात. आणि आजीची गंमत सांगू का? ती उजव्या हाताने एकेक अक्षर शोधत मेसेज टाईप करते. त्यामुळे तिला खूप वेळ लागतो. मग कंटाळून व्हॉइस मेसेज टाकून मोकळी होते, किंवा इमोजी टाकते.’’ आजीकडे बघत रमाने हळूच सांगितलं. रमाचे बोलणे सगळ्यांना हसवून गेले. आजीने रागावण्याचं नाटक करत डोळे मिचकावले.
‘‘मी बँकेत काम करत होते ना, तेव्हा हा डावा हात पटापट कामाच्या जाडजूड वह्य पुढे करायचा. हो.. आणि टेबलावरचा फोन खणखणला की फोन उचलण्याची जबाबदारी याच्यावरच असायची.’’ आजी हलकेच भूतकाळात शिरली.
‘‘आजी, गॅसवरचं गरम पातेलं चिमटय़ात धरून वाढायला येताना तू डाव्या हाताचाच उपयोग करतेस की!’’ आराध्य आजीला कामात मदत करत असल्यामुळे त्याच्या हे नेमकं लक्षात आलं.
‘‘नृत्य करताना तर दोन्ही हातांची गरज असते. आणि तू सांगतेस ना, की धावत धावत येऊन वाकत, उजव्या हाताने पायांना शोधत, हाताने स्पर्श केल्याची अॅक्शन.. असा नमस्कार करायचा नाही. त्यापेक्षा वाकून, दोन्ही हात जोडून दोन-तीनदा ते हलवत छान नमस्कार करायचा..’’ रमाने आठवणीने सांगितलं.
‘‘करून दाखव बघू..’’ आराध्य व अपूर्व दोघेही तिच्या मागे लागले.
‘‘मी नेहमी तसाच करते. हो की नाही गं आजी?’’ असं म्हणत तिने नकळत नमस्कार करून दाखवला.
‘‘स्वयंपाकघरातलं भाजी चिरणं, किसणं, कुटणं, मिक्सरला फिरवणं असं कुठलंही काम असू दे, डाव्या हाताची त्यात लुडबुड असतेच. वाहन चालवणं, शिवणकाम अशा कुठल्याही कामांत डावा हात मागे असल्याचा अभिनय करत मदतीचा हात पुढे करत असतो. दोघांची युतीच असते. डावा म्हणजे थोडा कमी योग्यतेचा आणि उजवा म्हणजे थोडा सरस, श्रेष्ठ अशा ‘उजव्या, डाव्या’च्या सूक्ष्मार्थाने उजवा बऱ्याचदा भाव खाऊन जातो. आपणच त्याला मोठेपणा देत असतो. उदा. नैवेद्य किंवा कोणीही काहीही दिलं तरी उजव्या हातात घेण्याचा आग्रह धरतो. एरवी दोघांमुळेच आपला कर्मयोग पार पडत असतो..’’ आजीने विस्तृत माहिती पुरवली.
‘‘एखाद्याचा अपघाताने उजवा हात तुटला किंवा बोटं तुटली, तर डावा हात सवयीने, सराईतपणे सगळी कामं अंगावर घेऊन एकटा पार पाडत असतो असंही दिसून येतं ना गं आजी.’’ आराध्य विचारपूर्वक सांगतो.
‘‘जेवताना डावा हातच पाणी पाजतो की गं आपल्याला.’’ अपूर्व पाणी पिता पिता लक्षात आणून देतो.
‘‘आणि आजकाल स्वेच्छाभोजन असलं की जेवणाची प्लेट सांभाळण्याची सर्कस यालाच करावी लागते..’’ रमाला एकदम आठवलं. म्हणजे ‘डाव्या हाताचा फारसा उपयोग नसतो, तो काहीच करत नाही’ या म्हणण्याला काही अर्थ नाही. उजव्या हातावर अनेक गोष्टींची जबाबदारी असते. त्याचा पुढाकार असतो. पण डाव्या हाताच्या ‘हात’भारामुळेच ती कामे उजवी ठरतात, होतात, हे मात्रं खरं. म्हणजे तो काही अगदी फुकटचं खात नाही. ‘विना सहकार नाही उद्धार’ या नियमाचं योग्य पालन होत असतं. एका हाताने टाळी थोडीच वाजणार आहे? ‘आता पुरे!’ या अर्थाने आजीने हळूच दुखऱ्या हाताला उचलत हात वर केले, पण तो झटक्यात खाली आला. त्यामुळे हातावर हात ठेवत ती मुकाट बसून राहिली. दोन्ही हातांनी टाळी वाजवण्यात बच्चे कंपनी मात्र रंगून गेली.
suchitrasathe52@gmail.com