डॉ. नंदा हरम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘आर्या हे बघ, मी तुझ्याकरिता गंमत आणली आहे.’’ आर्या मात्र आजीकडे लक्ष द्यायला तयार नव्हती. आर्याच्या चेहऱ्यावरच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत आजी पुन्हा तिला म्हणाली, ‘‘आधी माझी गंमत बघ. तुझी नाराजी अश्शी पळून जाईल.’’

आर्या मनात म्हणाली, ‘‘आजी एवढं म्हणतेय बघू तरी काय आणलं ते..’’ आणि तिने डोळे मिटून घेतले.

आजीने तिला हात पुढे करायला सांगितला. हातावर आजीने वस्तू ठेवताच मूठ मिटल्यावर आर्याच्या लक्षात आलं की हा तर मेंदीचा  कोन.. ‘माझी मनकवडी आजी’ म्हणत ती आनंदाने आजीला बिलगलीच.

आर्या डोळे मोठ्ठे करत आश्चर्याने म्हणाली, ‘‘तू कुठून आणलास कोन?’’

आजी म्हणाली, ‘‘आणला नाही, मी बनवला.’’

आर्याला आणखीच आश्चर्य वाटलं. ‘‘आजी, तू कधी आणलीस ही रसायनं?’’

आजी म्हणाली, ‘‘अगं वेडाबाई, तुला कुणी सांगितली की ही रसायनं असतात म्हणून?’’

आर्या म्हणाली, ‘‘मग आजी, यामुळे आपल्या हातावर रंग कसा येतो?’’

‘‘आर्या बेटा, सारं सांगते तुला. आपण आधी मेंदी काढायला घेऊ या का?’’ आजी म्हणाली.

‘‘हो आज्जी. तू कित्ती चांगली आहेस गं..’’ आर्या जरा लाडातच आली होती.

‘‘पुरे, पुरे..! मस्का लावू नकोस हं मला.’’

हेही वाचा >>> कार्यरत चिमुकले..: नदीच्या गढूळ पाण्याची गोष्ट

एवढय़ात आजोबा आत आले आणि त्यांनी विचारलं, ‘‘कोण कुणाला मस्का लावतंय?’’

‘‘आजोबा, बसा तुम्ही. आजी मेंदीविषयी सगळं सांगणार आहे मला. तुम्हाला आवडेल ऐकायला?’’ आर्याने आजोबांनाही गप्पांमध्ये सामील करून घेतलं.

‘‘हो.. का नाही? मीही ऐकतो तुझ्याबरोबर.

‘‘आजी सांग ना आता.’’ आर्याला भलतीच घाई झाली होती.

‘‘आर्या, मी अलिबागला गेले होते ना मैत्रिणीकडे तिकडून मेंदीची पानं आणली.’’

‘‘आज्जी, थांब थांब. पानं हिरव्या रंगाची असतात, मग मेंदी लाल कशी रंगते गं?’’

आपल्या ५ – ६ वर्षांच्या चिमुरडय़ा नातीचं फार कौतुक वाटलं आज्जीला. ‘‘हुश्शार गं माझी बाई! आर्या, या मेंदीच्या पानांमध्ये एक रसायन असतं, ते रसायन म्हणजेच तो नैसर्गिक रंग असतो. ही मेंदीची पानं चुरडली म्हणजे त्याची पूड केली की ते रसायन त्यातून मुक्त होतं. मेंदीची पेस्ट बनवताना त्यात लिंबाचा रस घालायचा. आता ही मेंदी जेव्हा आपण आपल्या हातावर काढतो ना, तेव्हा आपल्या त्वचेमध्ये प्रोटीन्स असतात, त्यातील केरॅटिनशी त्याची अभिक्रिया होते.

‘‘बाप रे.. आज्जी.. किती कठीण नावं आहेत!’’

‘‘आर्या, तू असं लक्षात ठेव, मेंदीतील रसायनाची आपल्या त्वचेतील प्रोटीनशी गट्टी होते. तो मैत्रीचा बंधच जणू आपल्याला लाल रंगात दिसतो.’’

‘‘आज्जी, हा रंग येण्याकरिता मेंदी किती वेळ ठेवायला लागते गं?’’

‘‘बाळा, कमीत कमी चार ते सहा तास.’’

‘‘आणि आज्जी.. मेंदी काढून झाल्यावर आपण त्याच्यावर लिंबाच्या रसात साखर घालून कापसाने लावतो ना? ते कशाला?’’

‘‘हे बरं माहीत तुला! अगं, मेंदी सुकली की ती पडायला लागते ना. साखरेच्या चिकटपणामुळे ती पडत नाही.’’

आर्याच्या चेहऱ्यावर अजून काही प्रश्नचिन्हं नाचताना दिसत होती. म्हणून आज्जीच म्हणाली, ‘‘आर्या, काही शंका आहे का मनात?’’

‘‘आज्जी, काही दिवसांनी मेंदीचा रंग हळूहळू कमी होऊन निघून कसा जातो? मैत्रीचे बंध कसे तुटतात?’’

‘‘अगं, हे मैत्रीचे बंध अगदी वरवरचे असतात. त्वचेचं सगळय़ात बाहेरचं आवरण असतं ना, त्यातल्या प्रोटीनबरोबर रसायनांची क्रिया होते. हे आवरण जसं निघायला लागतं तसा रंग नाहीसा होतो.’’

हेही वाचा >>> बालमैफल: ओमचा गणू

‘‘आज्जी, आणखी एक प्रश्न! माझी मैत्रीण श्वेता आहे ना, तिने विकत आणलेला कोन काळय़ा रंगाचा दिसतो. तू बनविलेला हिरव्या रंगाचा दिसतो. तो कशामुळे?’’

‘‘आर्या.. अगदी बारीक निरीक्षण आहे तुझं! बऱ्याच वेळा बाजारात जे कोन मिळतात, त्यात कृत्रिम रसायनं घातलेली असतात, लवकर आणि गडद रंग यावा म्हणून. या रसायनांमुळे त्वचेला अ‍ॅलर्जी होऊ शकते. म्हणून मी तुझ्याकरिता स्वत: मेंदीची पानं आणून कोन बनवला.’’

‘‘पण आज्जी, मेंदीच्या पानातही रसायनच आहे ना, ज्याच्यामुळे मेंदी रंगते. मग त्याचा त्रास होत नाही का?’’

‘‘आर्या.. छान विचार करतेस हं, शाब्बास! मेंदीच्या पानातील रसायन (लॉसोन) हा नैसर्गिक रंग असल्यामुळे त्याची अ‍ॅलर्जी सहसा होत नाही. रंग यावा म्हणून इतर रसायनं घालतात, त्यामुळे अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता जास्त असते.’’

आजोबा म्हणाले, ‘‘अरे व्वा! बोलता – बोलता दोन्ही हातांना मेंदी काढूनही झाली. आता तू जेवणार कशी?’’

‘‘आज्जी आहे ना.. भरवते ती मला.’’

‘‘मज्जा आहे बुवा. चला, आता मी फक्कडसा चहा करतो. आजी दमली असेल मेंदी काढून..’’ आजोबा म्हणाले.

‘‘थँक यू आजी! माझी बेस्ट आज्जी  म्हणत आजीला पापी देऊन आर्या पसार झाली.

 nandaharam2012@gmail.com

मराठीतील सर्व बालमैफल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interesting story for kids story of grandmother moral story of grandmother zws