‘‘रिया, ये ना बागेत लवकर!’’ रियाच्या मावसबहिणीने- अनयाने रियाला घराबाहेरच्या बागेतून हाक मारली. रिया तिच्या मावशीच्या घरी वीकेंडला राहायला आली होती. पण एका लग्नाला जायचं म्हणून रविवारी सकाळीच तिचे बाबा तिला न्यायला आले होते.
‘‘बाबा, मी बागेत उमललेलं गुलाबाचं फूल बघून येते. मग आपण लगेच निघू या,’’ असं म्हणत रिया सुसाट बाहेर पळाली.
‘‘सावकाश जा..’’ असं कुणी सांगेतो रियाचा पाय घसरला आणि ती जिन्यावरून धाडकन् पडली. तिचा रडण्याचा आवाज ऐकून घरातले सगळेच धावले. बाबांनी रियाला हळूहळू उभं करण्याचा प्रयत्न केला; पण ती उभी राहायलाच तयार होईना. शेवटी बाबांनी तिला कडेवर उचलून घरात आणलं. त्यांनी रियाला कुठे काही लागलंय का, ते नीट पाहिलं. सुदैवाने तिला फारसं लागलेलं नव्हतं. एव्हाना अनयाही घरी आली.
‘‘खूप दुखतंय का?’’ अनयाने काळजीच्या स्वरात विचारलं. हे ऐकताच थोडी शांत झालेली रिया पुन्हा रडायला लागली.
‘‘अनया, काही नाही झालेलं. ती थोडी घाबरलीय, इतकंच. जा, तिच्यासाठी तिचा फेव्हरिट ज्यूस घेऊन ये.’’ मावशी वातावरणातला तोल सावरत म्हणाली.
‘‘रिया, तू आता पाचवीला जाणार ना? मोठी मुलं अशी रडतात का?’’ म्हणत अनयाच्या बाबांनी रियाला चॉकलेट दिलं.
एवढे सगळे लाड झाल्यावर रिया शांत झाली. बाबा तिला घेऊन घरी जायला निघाले. जाताना अनयाने तिला बागेतलं गुलाबाचं फूल आणून दिलं. पण रियाचं त्याच्याकडे फारसं लक्ष नव्हतं.
‘‘बाबा, तुम्ही बाईक नाही आणलीत?’’ आजूबाजूला बाईक शोधत रियाने विचारलं.
‘‘नाही! म्हटलं, चालत जाऊ आणि चालत येऊ . असं कितीसं लांब आहे आपलं घर?’’ बाबा म्हणाले.
‘‘आपण रिक्षेने जाऊ या?’’- इति रिया.
‘‘इतक्या कमी अंतराला रिक्षा मिळते का? जाऊ हळूहळू चालत!’’ बाबांनी तिची समजूत घालत म्हटलं.
‘‘पण माझा पाय दुखतोय.’’ रिया रडक्या स्वरातच म्हणाली.
‘‘थोडंसंच तर लागलंय. लक्ष नको देऊस. आपोआप बरं वाटेल तुला.’’ – बाबा.
इतकं पडल्यावरसुद्धा बाबा आपल्याला चालत नेणार म्हटल्यावर रिया मनात धुसपुसू लागली. तिला रडूही येत होतं. पण बाबांनी तिच्याकडे मुद्दामच लक्ष दिलं नाही.
तशी रिया ‘रडूबाई’ म्हणूनच प्रसिद्ध होती. थोडं काही मनाविरुद्ध झालं की तिला लगेच रडू यायचं. कुठे थोडं दुखलंखुपलं की लागल्याच बाई रडायला! तिच्या मैत्रिणी तर तिला ‘क्राय बेबी’ म्हणूनच चिडवायच्या.
आई-बाबा तिला अनेक प्रकारे सांगायचे की- रडून काहीच साध्य होत नाही. थोडी सहनशक्ती, थोडी जिद्द असायलाच हवी. पण रियावर या सांगण्याचा काहीएक परिणाम होत नसे.
रिया आणि तिचे बाबा घरी चालत निघाले. रविवार सकाळ असल्यामुळे रस्त्यात फारशी वर्दळ नव्हती. रस्त्यावरून एक मुलगी स्केटिंग करत चालली होती. संरक्षण क्षेत्राच्या परिसरातला रस्ता असल्यामुळे रस्त्याला मुळीच खड्डे नव्हते.
‘‘वॉव! बाबा, ती मुलगी कित्ती मस्त स्केटिंग करतेय!’’ रिया तिचं रडणं एकदम विसरली.
‘‘हो ना?’’ बाबा इतकंच म्हणाले. कारण गेल्या वर्षी बाबांनी रियाचं नाव शाळेत स्केटिंगच्या कोचिंगकरिता नोंदवलं होतं. पण ही पठ्ठी ‘चाकांवर चालायला लागेल आणि मी पडेन..’ या भीतीने क्लासला गेलीच नाही.
एवढय़ात त्या स्केटिंग करणाऱ्या मुलीचा पाय सटकला आणि ती पडली. तिचं तोंड आणि नाक जोरात जमिनीवर आदळलं.
रियाचे बाबा त्या मुलीच्या मदतीला धावले. त्यांनी तिला सरळ केलं आणि फुटपाथवर बसवलं. तिच्या नाकाला आणि गुडघ्यालाही चांगलंच खरचटलं होतं. ती भयंकर कळवळत होती. पण डोळे घट्ट मिटून, ओठ दाबून ती वेदना सहन करत होती. तिने हाताच्या मुठी आवळून धरल्या होत्या.
मागून बाईकवरून येणारे त्या मुलीचे बाबा एव्हाना तिथे पोहोचले होते. ते धावतच तिच्याजवळ आले. त्यांनी तिला फुटपाथवरच आडवं झोपवलं. तिच्या मुठी सैल केल्या. मॉìनग वॉककरिता आलेल्या लोकांची गर्दीही आता त्या मुलीभोवती जमली होती. रिया हे सगळं पाहत नुसतीच उभी होती. ती खूपच घाबरली होती.
‘‘रिया, तुझ्याकडे पाणी आहे ना?’’ बाबांनी विचारलं. रियाने बॅगेतून वॉटर बॉटल काढली आणि त्या मुलीला पाणी देऊ केलं.
‘‘ती नाही प्यायची पाणी- प्रॅक्टिसच्या मधे!’’ त्या मुलीचे बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. ती मुलगी हळूहळू शांत होत होती. इतक्या वेळात ती एकदाही रडली नव्हती. ती जमिनीचा आधार घेत फुटपाथवर उठून बसली. दोन्ही पाय पुढे-मागे करून आपल्याला कुठे काही दुखतंय का, हे तिने नीट पाहिलं. अंगावरची धूळ झटकली. डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या बाबांचा हात धरून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागली. पायात स्केट्स असल्यामुळे तिचा थोडा तोल जात होता.
‘‘आरोही, दुखत असेल तर आपण घरी जाऊ या. उद्या पुन्हा येऊ प्रॅक्टिसला.’’ त्या मुलीचे बाबा म्हणाले.
‘‘मी मदत करतो तुला बाईकवर बसायला.’’ रियाचे बाबा आरोहीला मदत करायला पुढे सरसावले. पण ती काहीच बोलली नाही. हळूहळू स्वत:चा तोल सावरत ती व्यवस्थित उभी राहिली. तिने तिच्या बाबांचे हात सोडले, तीन-चार पावलं सुटं चालून पाहिलं आणि पुढच्या क्षणाला स्केट्सवर झपझप करत ती दृष्टीआडही झाली. तिथे उपस्थित सगळ्याच लोकांनी तिची ही जिद्द पाहून उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवल्या.
‘‘काय धीराची आहे तुमची आरोही!’’ रियाचे बाबा आरोहीच्या बाबांना कौतुकाने म्हणाले.
‘‘पुढच्या आठवडय़ात राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा आहेत तिच्या! गेल्या वेळची तिची स्पर्धा डेंग्यूमुळे हुकली होती. त्यामुळे यंदाची चॅम्पियनशीप चुकवायची नाहीये तिला. जिंकणं-हरणं ही पुढची गोष्ट.’’ आरोहीचे बाबा बाईकचा स्टॅंड काढत म्हणाले.
‘‘कितवीला आहे आरोही?’’
‘‘सहावीला.’’
‘‘लहान आहे हो! पण तरी एकदाही रडली नाही.’’
‘‘एरव्हीही ती रडत वगैरे नाही. सहनशील आहे पोर.’’ आरोहीचे बाबा बाईक स्टार्ट करत म्हणाले.
‘‘ही खरी जिद्द! ती इतकी सुसाट गेलीये.. तुम्ही तिला गाठणार कसे?’’
‘‘आमचा हा नेहमीचा रस्ता आहे. ठरलेल्या जागी बरोबर थांबेल ती!’’
‘‘तिला स्पध्रेकरिता ऑल द बेस्ट.’’
आरोहीच्या बाबांनी रियाच्या बाबांना ‘थँक यू’ म्हणत ‘शेक हॅंड’ केला आणि तेही पटकन् गेले. तिथे जमलेले लोकही आता पांगले.
रिया आणि तिचे बाबा घरी जायला निघाले.
‘‘बाबा, आपण हे गुलाब आरोहीला द्यायला हवं होतं.’’ रियाला तिच्या हातातल्या गुलाबाची आठवण झाली.
‘‘का गं?’’ बाबांनी आश्चर्याने विचारलं.
‘‘माझ्याहून फारशी मोठी नाहीये, पण खूप शूरवीर आहे ती!’’ रिया हळू आवाजात म्हणाली.
‘‘मग? आपण काही शिकलो का तिच्याकडून?’’
‘‘होय बाबा.’’ रियाने मान वर करून बाबांकडे पाहिलं. त्या पाच-दहा मिनिटांत पाहिलेली आरोहीची जिद्द रियाच्या मनावर नक्कीच खोलवर परिणाम करून गेली होती.
प्राची मोकाशी mokashiprachi@gmail.com